▼

Wednesday, 23 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

राज्यात पावसाअभावी परिस्थिती गंभीर झाली असून, शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, पीकं पूर्णपणे करपलेली आहेत, पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

दरम्यान, मुख्यमंत्री आज धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातही दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

****

कागदोपत्री आणि नातेसंबंधांवर आधारित प्रक्रिया सोडून, कर प्रशासन, डेटा-आधारित आणि डिजिटल प्रणालींकडे वळत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. तंत्रज्ञान, प्रशासन आणि लोक ही या वर्षीच्या ब्रिक्स कर सत्रातून उदयास आलेली तीन व्यापक क्षेत्र असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

****

११ वा जागतिक आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. ‘निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद’ अशी यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी यानिमित्त देशातल्या नागरिक, आयुर्वेदिक चिकित्सक आणि वैद्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्राचीन वैद्यकीय उपचार पद्धतीचा स्वीकार करून निरोगी, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केलं.

आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना मंत्री जाधव यांनी, निरोगी आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेद सर्वंकष दृष्टिकोन देतो, असं नमूद केलं. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहा महत्त्वपूर्ण अहवाल, मार्गदर्शक तत्त्वं आणि डिजिटल उपक्रमांचं लोकार्पण करण्यात आलं.

****

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज आठ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये या योजनेचा शुभारंभ केला होता. ही जगातली सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना बनली आहे. प्रत्येक भारतीयाला उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळावी या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाजमांध्यमांवर म्हटलं आहे. आज सहा कोटींहून अधिक लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांचा वार्षिक आरोग्य विमा लाभ मिळत आहे. आतापर्यंत ४ कोटी ५४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज एका रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावलं.

सॉफ्ट टेनिसमध्ये भारताच्या जय मीणाने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलं. आज झालेल्या उपान्त्य फेरीत जयला जपानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला.

नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्पर्धेत माहेश्वरी सिंह, परिनाज धालीवाल आणि राइजा ढिल्लों यांच्या संघाने आणि पुरुषांच्या अनंतजीत, भवतेग आणि मेराज यांच्या संघाने कांस्य पदकं जिकंली.

कबड्डीमध्ये भारतीय महिला संघाने दुसऱ्या फेरीत इराणचा ३७-२३ असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानसोबत होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी पदक विजेत्या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे.

****

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे ३० टक्के मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोहिमेत राज्यातल्या दोन कोटी सहा लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावं वगळली असून, सुमारे एक कोटी २२ लाख २४ हजार मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयंनोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्र ग्राह्य धरली जावी, तसंच बीएलओचं काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावे अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केल्या आहेत.

****

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खिद्रापूर शाखेत शिपाई अभयसिंह रजपूत याने तब्बल ४० लाखांचा अपहार केल्याचं निदर्शनास आलं. रजपूत याने लिपिक, कॅशियर आणि शाखा मॅनेजरच्या यूजर कोडचा वापर करून सुमारे दहा ग्राहकांच्या ठेवींवर डल्ला मारुन, स्वतःच्या पत्नीच्या खात्यावर ठेवीच्या रकमा जमा करून उचल केली. चौकशी केली असता २०२१ पासून त्याने असे व्यवहार केल्याचं स्पष्ट झालं आहे.

****

No comments:

Post a Comment