▼

Wednesday, 23 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      दुष्काळामुळे पिकांचं सरसकट नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही;लातूर-धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून पीक पाहणी

·      उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अकोला तसंच बुलडाणा जिल्ह्यात शेतपिकांचा आढावा

·      पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीचे विभागीय आयुक्तांकडून निर्देश

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत आज चार पदकांची कमाई-भारोत्तोलनात मीराबाई चानूला रौप्यपदक

****

दुष्काळी परिस्थितीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

लातूर जिल्ह्यात यंदा केवळ ५० टक्के पाऊस झाला, पावसाअभावी जिल्ह्यात सोयाबीनसह इतर खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं. निलंगा तालुक्यात जाऊ आणि खरोसा इथं दुष्काळामुळे कपरलेल्या पिकांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, आपल्या नुकसानाची माहिती देताना, शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले. या शेतकऱ्यांना धीर देताना, मुख्यमंत्री म्हणाले –

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

लातूर पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यात करजखेडा शिवारातील पिकांची तसंच साठवण तलावाची पाहणी केली. पाण्याअभावी वाळलेलं पीक आणि पाण्याचा थेंबही नसलेला साठवण तलावामुळे या भागातल्या दुष्काळाची दाहकता दिसून आली. कळंब तालुक्यातील मलकापुर इथंही मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिसिथितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती देत, आपलं सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सोलापूर जिल्ह्यातही धानोरे आणि कारंजा परिसराची मुख्यमंत्र्यांनी पावसाअभावी वाळलेल्या शेतपिकांची पाहणी करून, शेतकऱ्यांना धीर देत, रबी हंगामासाठी मदतीचं आश्वासन दिलं. या भागातला दुष्काळ संपवण्यासाठी राज्यशासन करत असलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले –

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दुष्काळाबाबतची अधिसूचना काढतांना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचं सुतोवाच शिंदे यांनी केलं. ते म्हणाले -

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि अडचणींची चौकशी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

****

सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका येत्या रविवारी २७ सप्टेंबर रोजी सुरू राहतील, असं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलं आहे. बँक संघटनांनी या महिन्याच्या २८ ते ३० तारखेपर्यंत पुकारलेल्या तीन दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रविवारी सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संलग्न शाखा पूर्ण वेळ कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान, या संघटनांनी नियोजित संप मागे घेण्याचे आवाहन, सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात ते आज एका बैठकीत बोलत होते. या बैठकीस सह आयुक्त मंजुषा मिसकर तसंच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

****

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथं जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. निवडणूक प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा तालुका अध्यक्ष माधव भाउसाहेब बिरादार यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणे, तसंच राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

****

जालना शहरालगतच्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, असं आवाहन जालना शहर महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे. या जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळे पाणी प्रदूषण टाळण्यासाठी याठिकाणी मूर्ती विसर्जनास मनाई करण्यात आली आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच वापर करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

किसान सभा आणि शेतमजूर संघटनेच्या वतीनं आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने भरीव मदत द्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शासनाने विलंब न करता नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत, रोजगार आणि आवश्यक सवलती द्याव्यात अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या सुधारित आराखड्याला अंतिम मंजुरी मिळालेली नसताना, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कथितरीत्या भूखंड विक्री, भाडेपट्टा करार आणि विनापरवानगी बांधकामे केल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत. याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पणन संचालक संजय कदम यांनी दिले आहेत.

****

धाराशिव शहरात आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आज ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात आलं. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी आणि पारधी समाजातील नागरिकांना, आदिवासी प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केलं.

****

जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतानं चार पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. सॉफ्ट टेनिसमध्ये भारताच्या जय मीणाने कांस्य पदक जिंकलं. आज झालेल्या उपान्त्य फेरीत जयला जपानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणाझ धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्कीट प्रकारात कांस्यपदक जिंकलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघालाही कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत भारताचा चीनकडून ३-१ असा पराभव झाला. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १२ पदकांची कमाई केली आहे. यात एक सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment