Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
दुष्काळी
परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही, दुष्काळी
भागात शाश्वत जलसिंचनासाठी सरकारचे प्रयत्न
·
शेतकऱ्यांना
सरकारकडून सर्वतोपरी मदत,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
·
मतदार
यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं
निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
·
आशियाई
क्रीडा स्पर्धेत काल चौथ्या दिवशी भारताची पाच पदकांची कमाई
आणि
·
मराठवाड्यातल्या
सर्व जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
****
दुष्काळी परिस्थितीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्याची ग्वाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी
दिली आहे. काल लातूर, धाराशिव आणि सोलापूर
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर
जाऊन नुकसानाची प्रत्यक्ष
पाहणी केल्यानंतर ते
बोलत होते. शेतकऱ्यांना मदतीसाठी
निधी कमी पडू देणार
नाही, असंही त्यांनी स्पष्ट
केलं.
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात जाऊ आणि खरोसा इथं दुष्काळामुळे कपरलेल्या पिकांची
मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले,
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लातूर पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यात करजखेडा
शिवारात, कळंब तालुक्यातल्या मलकापुर इथं पिकांची तसंच साठवण तलावाची पाहणी केली.
पाण्याअभावी वाळलेलं पीक आणि पाण्याचा थेंबही नसलेला साठवण तलावामुळे या भागातल्या
दुष्काळाची दाहकता दिसून आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत, तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची
माहिती
दिली.
सोलापूर जिल्ह्यातही धानोरे आणि कारंजा परिसराची
मुख्यमंत्र्यांनी वाळलेल्या शेतपिकांची पाहणी करून, शेतकऱ्यांना धीर देत, रबी
हंगामासाठी मदतीचं आश्वासन दिलं. या भागातला दुष्काळ संपवण्यासाठी राज्यशासन करत
असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना ते
म्हणाले,
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही,
शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळाबाबतची अधिसूचना काढतांना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचं सुतोवाच शिंदे यांनी केलं. ते म्हणाले...
बाईट- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
****
परभणीचे जिल्हाधिकारी
संजयसिंह चव्हाण यांनी काल विविध
गावांना प्रत्यक्ष भेटी देत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी
त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि अडचणींची चौकशी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था असून, मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं. यासंदर्भात उपस्थित मुद्यांच्या पार्श्वभूमीवर ही बाब स्पष्ट करण्यात आली.
आयोगाच्या निर्णय प्रकियेदरम्यान सदस्यांनी
प्रश्न उपस्थित करणं, हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. अंतिम निर्णय घेताना
हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
आयुष्मान भारत योजनेला काल आठ वर्षं पूर्ण झाली. या
योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि
मध्यमवर्गीयांना होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना हा उपक्रमही याचाच एक भाग आहे. याविषयी जाणून घेऊ...
केंद्र सरकारनं ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री
मुद्रा योजना ही सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना विनातारण कर्ज देणारी महत्त्वाची योजना
आहे. या योजनेंतर्गत उत्पादन, व्यापार,
सेवा तसंच कृषीपूरक उपक्रमांसाठी २०
लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. .विशेष म्हणजे,
मुद्रा योजनेअंतर्गत सुमारे ७० टक्के
कर्जखाती महिलांची आहेत.
मुद्रा कर्जाचा उपयोग दुकानं, सेवा व्यवसाय, लघुउद्योग, वाहतूक, यंत्रसामग्री खरेदी, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन आणि अन्नप्रक्रियेसारख्या
कृषीपूरक व्यवसायांसाठी करण्यात येत आहे.
****
सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि प्रादेशिक ग्रामीण
बँका येत्या रविवारी २७ सप्टेंबर रोजी सुरू राहतील,
असं अर्थ
मंत्रालयानं जाहीर केलं आहे. बँक संघटनांनी या महिन्याच्या २८ ते ३० तारखेपर्यंत पुकारलेल्या तीन
दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान,
या संघटनांनी
नियोजित संप मागे घेण्याचं आवाहन, सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गणेशोत्सवानिमित्त आज सकाळी सहा ते
रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक यंत्रांचा वापर करण्यास
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी परवानगी दिली आहे. मात्र या यंत्रांचा वापर
करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात गणेश विसर्जन
मिरवणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी
भाजपा तालुका अध्यक्ष माधव बिरादार यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणं, पोलिसांशी हुज्जत, धक्काबुक्की आणि शिवीगाळ
केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रतिकात्मक
स्वरुपात गणेश विसर्जन करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. दुष्काळी
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल विसर्जन
स्थळांची पाहणी केल्यानंतर ते बोलत
होते.
****
जालना इथल्या
संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचं विसर्जन करू नये, असं आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे. या जलाशयातून
शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो, महानगरपालिकेने
निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच गणेशभक्तांनी
वापर करण्याचं आवाहन
प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या
दिवशी भारतानं पाच
पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात
भारताच्या मीराबाई चानू हिने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. सॉफ्ट टेनिसमध्ये भारताच्या
जय मीणाने कांस्य
पदक जिंकलं. नेमबाजीत
भारताच्या महेश्वरी, परिणाझ
धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी, तर अनंतजीत सिंह नरुका, मेराज अहमद खान आणि भवतेग सिंह गिल यांनी सांघिक स्कीट प्रकारात कांस्यपदकांची कमाई केली. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघालाही कांस्य पदकावर समाधान
मानावं लागलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १२ पदकांची कमाई केली आहे. यात एक
सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्य
पदकांचा समावेश आहे.
****
रेल्वे रुळांवर मनुष्य अथवा जनावरे आल्यानं होणारे अपघात
आणि रेल्वे परिचालनातले अडथळे टाळण्यासाठी बीड रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने काल
विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. रायमोह ते विघ्नवाडी-जाटनांदूर रेल्वे
मार्गावरच्या गावांमध्ये नागरिक आणि पशुपालकांना रेल्वे सुरक्षेबाबत मार्गदर्शन
करण्यात आलं.
****
हवामान
मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागानं
पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच ताशी ४० ते ५०
किलोमीटर वेगानं वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर
आणि बीड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment