▼

Thursday, 24 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्यपदकाने झाली. महिलांच्या ६० किलो ‘सांडा’ प्रकारात रोशिबिना देवीने रौप्यपदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओशियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतीलं रोशिबिनाचं हे तिसरं पदक आहे.

नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्यपदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला-सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे-दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

****

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली. या बैठकीत भारत-अमेरिका संबंधांसह रशिया-इराणवरील अमेरिकी निर्बंधांबाबत भारताच्या हितसंबंध आणि चिंतांवर चर्चा झाली. भारताच्या आर्थिक हितांचं संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील, अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान, रुबियो यांनी भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रमुख प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर दोन्ही देश समन्वय साधत असल्याचं सांगितलं. 

****

राज्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचं पाणी आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. एल निनो स्थितीमुळे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. स्थानिक जलस्रोत, पर्यायी स्रोत आणि गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह, संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

****

राज्यातल्या लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने भजनी मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे दोन हजार भजनी मंडळांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. पात्र भजनी मंडळांची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे. अर्ज करण्याची मुदत २२ ऑक्टोबरपर्यंत आहे. किमान १५ सदस्य असणारी, वर्षभरात किमान ४० कार्यक्रम करणारी आणि पूर्णवेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळं या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

****

बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीण इथं नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयं स्थापन करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयामुळे नागरिकांचा जिल्हा मुख्यालयापर्यंतचा प्रवास, वेळ आणि आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय २१ जिल्ह्यांमध्ये ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालयं स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

****

१७ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राज्यभरातल्या पात्र महिला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून, त्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येत आहे. मुंबईत काल राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनारमध्ये कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी ही माहिती दिली. या वेबिनारमध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका तसंच प्रमाणपत्राच्या आधारे उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

****

बीड-पुणे एक्सप्रेस काल बीड रेल्वे स्थानकातून प्रथमच पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. पहिल्याच फेरीत ३४५ प्रवाशांनी तिकिटं काढली असून, या तिकिटांमधून रेल्वेला एकूण ४९ हजार ३६५ रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती बीड रेल्वे तिकीट प्रशासनाने दिली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा २०२६ हा विशेष जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातली विविध गणेश मंडळं, शाळा, महाविद्यालयं, प्रमुख चौक, नागरी वस्त्या, नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी विविध माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री साहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे श्री गणेशा आरोग्याचा अभियान आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकसंवाद उपक्रमही राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत एक हजार चार आरोग्य शिबिरं घेतली. यात एकूण ५५ हजार ७९३ जणांची तपासणी करण्यात आली.

****

गौण खनिज व्यवसायातल्या नियमांचं पालन आणि शासनाचा महसूल सुरक्षित राहावा, यासाठी महसूल विभागाने बीड तालुक्यात धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली बीड मंडळातल्या सहा आणि पाली मंडळातल्या नऊ अशा एकूण १५ क्रशरवर सीलची कारवाई करण्यात आली. संबंधित वीटभट्टीधारकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

****

No comments:

Post a Comment