Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०२७ दुपारी
१.०० वा.
****
आपली अचूक माहिती, कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या
चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असणार आहे,असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मन की बात या आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या १३८व्या भागातून
आज पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की...
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताच्या मोठ्या ऐतिहासिक यशाला अर्थात नियंत्रण रेषा
ओलांडून आपल्या वीर जवानांनी
दहशतवादाविरोधात केलेली कारवाई - सर्जिकल स्ट्राईक ला दहा वर्ष पुर्ण होत असल्याचं त्यांनी यावेळी
नमूद केलं. देशानं दीर्घकाळ ज्या यातना सहन
केल्या होत्या,सर्जिकल स्ट्राईक ही त्या
वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती असं मोदी म्हणाले. गेल्या एका
दशकभरात, बालाकोटच्या एअर स्ट्राईकपासून
ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारताने वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे, की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली, तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले.
भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य
बाब झाली होती. सप्टेंबरच्या महिन्यातच दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक
निष्पाप लोक मारले गेले होते.तर याच महिन्यात , मुंबईतही 26/11 चा खूप मोठा हल्ला झाला होता याची आठवण मोदी यांनी करुन
दिली. अशा प्रत्येक दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानवर कारवाईची मागणी व्हायची, परंतु त्याकडे लक्ष दिलं जात नव्हतं- वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची असं सांगून आता आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे
धोरण अवलंबत वाटचाल करत आहे, आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत असं पंतप्रधान म्हणाले.
मोदी यांनी भारताचे लोक सूर्य
उपासना वास्तू आणि मंदिरांसोबतच प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा या अर्थानं करतात असं सांगून मोढेराही सूर्य मंदिरासोबतच देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं
मोदी म्हणाले. महात्मा गांधींजींच्या दोन ऑक्टोबरला असलेल्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण् करतांनाच बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले त्यातील
स्वच्छता हा त्यांपैकीच एक असून सध्या स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रेरणादायी- उत्साह वाढवणारे प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. आपण
पर्यावरणाचं जतन, निसर्गाचा समतोल आणि
जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेने आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या
भावी पिढ्यांप्रति आपली असलेली जबाबदारी आहे असही पंतप्रधान म्हणाले.देशातील लाखो
युवकांनी अमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्प केला असून नशेपासून
दूर राहण्याची प्रतिज्ञा घेत, हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारल्याचं मोदी म्हणाले. १०० आठवडे चालणार असलेल्या ‘नशामुक्त युवा अभियानातून हे घडत असल्याचं ते म्हणाले.
युवक या आवाहनाला प्रतिसाद देत असून MY Bharat पोर्टलवरुन अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन
करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ‘ नशामुक्त युवा’ या हॅशटॅगसह संदेश प्रसारीत होत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रासाठी ‘टॅलेंट हंट’ अभियान सुरु असून यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत
पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच
कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली
क्रीडा-प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणे हा एकच त्यांचा
एकच ध्यास आहे असं मोदी म्हणाले. देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा घेत आगामी सण-उत्सवांच्या काळातही आपण ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र अजिबात विसरता कामा नये असं मोदी म्हणाले .
****
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक
ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी आज रविवारही सुरू आहेत. बँक संघटनांनी उद्यापासून पुकारलेल्या तीन दिवसांच्या
देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा देण्यात आली आहे.
****
आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा
स्पर्धेत भारताच्या अंकुश पंघालनं भारताचं मुष्टीयुद्धातलं पहिलं पदक निश्चित केलं
आहे. त्यानं पुरुषांच्या ८० किलो
वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत ताजिकिस्तानच्या नेक्रुझ सलीमोव्हचा ५-० असा
एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत आज धडक मारली. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच
उपांत्य फेरी गाठणाऱ्या अंकुशचं किमान कांस्यपदक निश्चित झालं आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना आज तिरुवनंतपुरम इथं दुपारी दोन वाजेपासून खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध पाच
सामन्यांची टी-२० मालिकाही खेळणार आहे.
****
राज्यात आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सोसाट्याच्या
वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं मराठवाड्यातल्या बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतही सोसाट्याच्या वाऱ्यासह
पावसाची शक्यता वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment