▼

Sunday, 27 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.09.2027 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड वगळता मराठवाड्यातल्या ७४ तालुक्यांचा समावेश

·      दुष्काळी भागात उपाययोजनांनुसार बारा उपाययोजना आणि सवलती लागू केल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

·      शेतकऱ्यांपर्यंत मदत कधी पोहोचणार, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, आमदार आदित्य ठाकरे  यांची मागणी

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने काल दोन सुवर्णांसह पटकावली सात पदकं

****

राज्यातल्या ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाबाबतचा हा शासन आदेश काल जारी करण्यात आला.

दुष्काळाचं Trigger-1 लागू झालेल्या या २६५ तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्रं आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तत्काळ सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात ९७ टक्के भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्यातले मुदखेड आणि मुखेड हे दोन तालुके वगळता, मराठवाड्यातले ७६ पैकी ७४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांचा समावेश आहे.

दुष्काळी उपाययोजनांनुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत. यामध्ये टँकरद्वारे पेयजल पुरवठा, शेतकरी तसंच शेतमजूरांसाठी अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्धता यासारख्या उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, काल मुंबईत माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले..

बाईट- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत १० हजार ११५ कोटी रुपये वितरीत झाले असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातल्या ज्या शेतकरी कुटुंबात मुला-मुलींची लग्नं ठरलेली आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. अशा कुटुंबांनी शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकार्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी काल सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून केलं.

****

दुष्काळी परिस्थितीत आपण सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. काल नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या बारूळ फाटा, सोनखेड इथं सोयाबीन पिकाची पाहणी तसंच शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या बोलत होत्या. शासकीय मदतीबाबत आश्वस्त करतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या..

बाईट- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या मरडसगाव, परभणी तालुक्यातल्या दैठणा आणि पाथरी इथंही पवार यांनी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्याची लेक असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीची आपल्याला जाणीव असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीची सुनेत्रा पवार यांनी काल पाहणी केली. माजलगाव आणि गेवराई तालुक्यातल्या माळी पारगाव, वारोळा, धर्मेवाडी आणि सिरसदेवी इथं शेतांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली.

****

दुष्काळासंदर्भातला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारचा जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या तावशी ताड इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. दुष्काळी मदत केंद्रे तातडीने उभारावीत आणि मदत शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

दरम्यान, ठाकरे यांनी काल नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या गऊळ इथं देखील शेतीची पाहणी केली.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा १३८ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. याच उद्देशानं सरकारकडून स्थावर संपदा नियमन आणि विकास अधिनियम, २०१६ अर्थात रेरा कायदा लागू करण्यात आला. या रेरा कायद्याबाबत आज जाणून घेऊ..

रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी केंद्र सरकारनं स्थावर संपदा नियमन आणि विकास अधिनियम, २०१६ अर्थात रेरा लागू केला. घर खरेदीदारांच्या हितांचे संरक्षण करणे, रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणणे, फसवणूक आणि प्रकल्पातील विलंब कमी करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार यांच्यात अधिक उत्तरदायी व्यवस्था निर्माण करण्यावर कायद्यात भर देण्यात आला आहे.

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

रेरामुळे घर खरेदीदारांना प्रकल्पाची माहिती, बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी आणि तक्रार निवारण याबाबत अधिक नियामक संरक्षण मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे.

****

विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत १२ ऑक्टोबर पर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष कबड्डी संघांनी काल सुवर्णपदकाला गवसणी घातली. या दोन्ही संघांनी आपापल्या गटात इराणच्या संघांना पराभूत केलं.

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन सांघिक प्रकारात भारताच्या संघाने रौप्य पदक पटकावलं. गोळाफेक मध्ये ताजिंदरपाल सिंह तूर आणि पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत सावन बारवाल यांनी रौप्य पदकांची कमाई केली. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्राची चौधरीने, तसंच स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत भारतीय जोडीने कांस्य पदक जिंकलं.

या स्पर्धेत चार सुवर्ण, १२ रौप्य आणि १४ कांस्यपदकांसह भारत पदकतालिकेत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

****

परभणी जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. धानोरा काळे इथं गोदावरी नदीच्या पुलावरून हे दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाले होते, गजानन घोरपडे आणि मुंजाजी घोरपडे अशी मयत तरुणांची नावं असून ते पालम तालुक्यातले रहिवाशी असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या एकूण ४७ गणेश मूर्तीदान संकलन केंद्रांवर ४१ हजार ४८२ गणेशमूर्तींचं संकलन करण्यात आलं. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमात १८ हजार ३५८ गणेशमूर्तींचं दान, तर २३ हजार १२४ गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं, तसंच ६४ टन निर्माल्य संकलित करण्यात आलं.

****

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी किल्ले धारूर तालुक्यातल्या घाट परिसरात अपघातप्रवण जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुधारणा, रस्त्याची दुरुस्ती तसंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

****

No comments:

Post a Comment