Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· गणेशमूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात
घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
· पावसाअभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना-नियमानुसार मदतीची
शासनाकडून ग्वाही
· मराठा समाजाच्या मुंबई मोर्चाचा निर्धार कायम-आंदोलक मनोज जरांगे
यांच्याकडून स्पष्ट
· कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं
फेटाळली
आणि
· पोळ्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा
****
गणेशमूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात
घेण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईत वाशी
इथं पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. श्रीगणेश मूर्तीची उंची वाढत
असल्यानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवल्या जातात, मात्र
प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि मूर्तींसाठीच्या रासायनिक रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. अध्यात्मिक विचारामध्ये सर्वाधिक महत्त्व पर्यावरणाला, पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला
जीवन मिळेल,
असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्ड मध्ये झाली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी
प्रतिष्ठापना करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्र्यांनीही या कार्यशाळेत शाडूमातीची गणेशमूर्ती साकारली.
****
राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे ज्या भागातल्या पिकांचं नुकसान
झालं आहे,
त्याचं तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार असून, सर्वेक्षणानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला
आहे,
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं ही माहिती
दिली. अमरावती इथल्या रुग्णालयातल्या दुर्घघटनेच्या चौकशीसाठी शासनाने दहा सदस्यीय
समिती नियुक्त केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाला
आहे,
प्राथमिक चौकशीनंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली
आहे. मात्र,
एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट
केलं.
****
राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या
सर्व रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे
निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची
अंमलबजावणी,
देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य
चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही आरोग्य सेवा आयुक्तांना
दिल्या आहेत.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पाठीमागे राज्य
सरकार उभं राहिल्याने टप्प्याटप्प्याने आज या महामंडळाच्या लाभार्थ्यांची संख्या एक
लाख ८० हजारांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष
नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २०१८ पासून
ते आजपर्यंत दोन हजार कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले असून, मराठा उद्योजक घडवण्यासाठी हजार कोटींचं कर्जवाटप झाल्याचा तपशील पाटील यांनी दिला.
सारथी संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीसाठी
१ लाख लाभार्थ्यांना कमीतकमी एक कोटी रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आल्याची माहिती पाटील
यांनी दिली. या योजनेअंतर्गत परदेशी शिक्षण, युपीएससी-एमपीएससी
यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आणि चांगले उद्योजक घडवण्यासाठी महामंडळाच्या सात विभागीय
कार्यालयांचीही स्थापना करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चाचा
निर्धार कायम असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज
जरांगे यांनी म्हटलं आहे. ते आज आंतरवाली सराटी इथं बोलत होते. सरकारचं प्रतिनिधिमंडळाची
आपण वाट पाहत नसल्याचं सांगत, समाजबांधवांनी एकत्र येण्याची
तारीख १२ सप्टेंबर रोजी जाहीर करू, अशी घोषणा जरांगे यांनी केली.
जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे.
****
शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची कायदेशीर
वैधता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासणं आवश्यक असल्याचं शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय
अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. बीड इथं शासकीय विश्रामगृहात आज घेतलेल्या
पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या नोंदींच्या आधारे पात्र
असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे तातडीने द्यावीत, हैदराबाद, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियरबाबत निर्णय घ्यावा, अशी
अपेक्षा त्यांनी केली.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन
आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी
आजीवन विद्यार्थी राहून सातत्याने नवी कौशल्ये आत्मसात करावीत, असं राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या पदवी प्रदान समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारत २०४७
च्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका निर्णायक असून त्यासाठी विद्यापीठांनी परवडणारे
आणि उत्कृष्ट शिक्षण हे प्रमुख सूत्र ठेवावे, असं
ते म्हणाले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी उद्योगविश्वाशी समन्वय
वाढवून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन, प्रात्यक्षिक शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, मात्र
त्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि कृतीची जोड द्यावी, असं अवाहन त्यांनी केलं.
पुणे इथं यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी- यशदा इथंही
परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात राज्यपालांनी मार्गदर्शन केलं.
प्रशिक्षणादरम्यान शिकलेले कायदे, नियम, कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि प्रशासनातील विविध पैलूंसोबत
स्वतःचं चारित्र्य घडवणं महत्वाचं आहे, असं राज्यपाल म्हणाले.
नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध दबावांना सामोरं जातांना
जनतेचा विश्वास संपादन करणं आणि टिकवून ठेवण्याच्या गरजेवर राज्यपालांनी भर दिला.
****
कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं
फेटाळून लावली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात २५ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा
भोगली असून,
आपली सुटका करावी, असं याचिकेत म्हटलं आहे.
त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या
पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित
असल्याचं नमूद करून, मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला
आदेश कायम ठेवला. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या
सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर ११ नोव्हेंबर २००५ रोजी पोर्तुगालहून भारताकडे
प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास २५ वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद
करण्यात आलं होतं.
****
जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा
असावा,
या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक
मंत्री के. राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत ‘सीआयआय’ या उद्योग संघटनेच्या परिषदेत बोलत होते. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक
हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचं नायडू
यांनी सांगितलं.
****
शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी
शासन कटिबद्ध असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादाजी
भुसे यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोली इथं गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक सत्कार
सोहळ्यात बोलत होते. शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार
नाही,
अशी ग्वाही भुसे यांनी दिली.
****
पोळ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला
जातो. कालच्या खांदेमळणीनंतर बैलांच्या शिंगांना रंगरंगोटी आणि सजावट करून, पाठीवर झूल चढवून बैलांची सायंकाळी मिरवणूक काढली जाते. घरी परतल्यावर सुवासिनी
बैलांना ओवाळून त्यांना पुरणपोळीचा घास भरवतात. या सणानिमित्त मातीच्या बैलांची पूजा
करण्याचाही प्रघात आहे. यासाठी आज बाजारात मातीचे बैल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी
आले होते.
हिंगोली जिल्ह्यात पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचं सावट असतानाही शेतकऱ्यांनी
हा सण उत्साहात साजरा केला. सर्जा राजाला सजवून मंदिरात फेरी मारण्यासाठी वाजत गाजत
मिरवणुका काढण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
युवक महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. हा महोत्सव शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात
होणार आहे. जिल्ह्यातल्या १४८ महाविद्यालयातले सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी होणार
आहेत. हा युवक महोत्सव ११ आणि १२ सेप्टेंबर असे दोन दिवस असणार आहे. दरम्यान, सात रंगमंचावर २८ कला प्रकार सादर होणार आहेत.
****
दुबई इथं सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट
स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरु होईल. साखळी फेरीतले सर्व सामने
जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे.
****
महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं
आज पाकिस्तानच्या संघाचा १९-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत
भारताचा उपांत्य फेरीचा सामना १२ सप्टेंबरला होणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या
मसलगा इथं छावा संघटनेच्या वतीने टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. महसूल विभागाच्या
मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी
तातडीने पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं, त्यानंतर
आंदोलक तरुण खाली उतरले.
****
No comments:
Post a Comment