▼

Friday, 11 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      गणेशमूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

·      पावसाअभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना-नियमानुसार मदतीची शासनाकडून ग्वाही

·      मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती, बीड जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचं वाटप

आणि

·      नांदेड जिल्ह्यात रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू, चार जखमी

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या. परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्याची ग्वाही देतानाच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येतील, असंही त्यांनी नमूद केलं. पेपरफुटीच्या प्रकरणात सरकारला काहीही लपवून ठेवायचं नाही, तर व्यवस्था सुधारायची आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती स्थापन करण्यात येत असून, ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस काल नवी मुंबईत वाशी इथं पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी झाले होते. गणेशमूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्रीगणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवल्या जातात, मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि मूर्तींसाठीच्या रासायनिक रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत, असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी, असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी देखील या कार्यशाळेत मातीची गणेशमूर्ती साकारली.

****

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे ज्या भागातल्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्याचं तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार असून, त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी तसंच कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. शिंदे समिती स्थापनेपासून सात सप्टेंबर २०२६ पर्यंत प्राप्त तीन लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी, तीन लाख १६ हजार ९७७ कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. प्राप्त अर्जांपैकी सुमारे ९९ पूर्णांक आठ दशांश टक्के अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली असून, फक्त ४४ अर्ज प्रलंबित असल्याचं या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५४ पैकी २५ हजार ९५८ प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ हजार ९५८, जालना १८ हजार ६५३, परभणी २० हजार १९०, हिंगोली १३ हजार ७०७, नांदेड चार हजार ८९३, लातूर दोन हजार ८७० तर धाराशिव जिल्ह्यात १९ हजार ७७५ प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे.

****

राज्य शासनाने उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या १५ मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा-कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनाने मागील तीन वर्षांत केलेल्या कार्यवाहीची त्यांनी माहिती दिली. कुणबी अर्ज नामंजूर होण्याचं प्रमाण नगण्य असून, हैदराबाद गॅझेटिअरनुसार ३७७ प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चाचा निर्धार कायम असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ते काल आंतरवाली सराटी इथं बोलत होते. सरकारच्या प्रतिनिधि मंडळाची आपण वाट पाहत नसल्याचं सांगत, समाजबांधवांनी एकत्र येण्याची तारीख १२ सप्टेंबर रोजी जाहीर करू, अशी घोषणा जरांगे यांनी केली. त्यांच्या बेमुदत उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पाठीमागे राज्य सरकार उभं राहिल्याने टप्प्याटप्प्याने या महामंडळाच्या लाभार्थ्यांची संख्या एक लाख ८० हजारांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. २०१८ पासून दोन हजार कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले असून, मराठा उद्योजक घडवण्यासाठी हजार कोटींचं कर्जवाटप झाल्याचा तपशील त्यांनी दिला.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं छावा संघटनेच्या वतीनं टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी तातडीने पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं, त्यानंतर आंदोलक तरुण खाली उतरले.

****

राज्यातल्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी काल नंदूरबार इथं ही घोषणा केली. या कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर मराठी भाषा विभागाचं कामकाज चालवलं जाणार आहे.

****

पोळ्याचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. परभणी जिल्ह्यात या सणावर दुष्काळाचं सावट दिसून आलं. शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण साधेपणानं साजरा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

बाईट – पोळा, सुदर्शन चापके (पीटीसी: परभणी)

 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचं सावट असतानाही शेतकऱ्यांनी हा सण उत्साहात साजरा केला. सर्जा राजाला सजवून मंदिरात फेरी मारण्यासाठी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात बारसगाव इथं शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी बैलांचं पूजन करून शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सन्मान केला.

श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त दोन मठांचे तसंच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानाचे बैल कमानवेस इथल्या डुल्या मारुती मंदिरापासून वाजत-गाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर बैलांचं विधिवत पूजन करण्यात आलं.

लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीची छाया या सणावर दिसून आली. अनेक शेयकर्यांनी उसनवारी करून आपल्या लाडक्या बैलांचा पोळा साजरा केला. चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ इथं वटसिद्ध नागनाथ मंदिरापासून टाळ-ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

****

नांदेड - भोकर रस्त्यावर सीताखंडी घाटात एका ट्रकने मॅजिक ऑटोला धडक देऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश असून, ते सर्वजण भोकर इथले रहीवासी होते.

****

धाराशिव जिल्ह्यात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आणण्यासाठीची चाचणी पुढच्या महिन्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक दोन मधील प्रगतीपथावर असलेल्या कामांचा काल आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

****

दुबईत सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा ४० धावांनी पराभव केला.

****

महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं काल पाकिस्तानचा १९-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.

****

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment