▼

Monday, 28 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      रबी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन-दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवण्याची घोषणा

·      दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने आर्थिक मदतीच्या मागणीसाठी पक्ष संघटनांकडून आंदोलन

·      निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका-विविध ठिकाणी निदर्शनं

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी दोन रौप्यपदकं

****

रबी हंगामात पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटनसमारंभात ते बोलत होते. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्यसरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन चौहान यांनी केलं. शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगून, मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा, याकरता खेत बचाओ अभियान सुरु करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याचंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात अराठी इथं पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाचही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश आहे. या तालुक्यांतील पीक परिस्थितीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही बावनकुळे यांनी दिली.

****

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या शासन निर्णयात शेतकऱ्यांना अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेन आंदोलन सुरू केलं आहे. आज लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केलं.

दरम्यान, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात रेणापूरच्या रेणुका देवीला दंडवत घालून साकडं घातलं.

****

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी उपाययोजना पुरेशा नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या दुष्काळी शासन निर्णयाची होळी करून आंदोलकांनी पाण्याअभावी करपलेली पिके जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फेकली.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं बैठक झाली या बैठकीत सध्या राज्यातील भेडसावणाऱ्या दुष्काळ निवारणासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करतांना, येत्या दोन चार दिवसांत सरकारकडे दुष्काळ निवारणासंदर्भात मागण्या करू, असं सांगत, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला.

****

सन २०३७ पर्यंत एसटी महामंडळाचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत एसटीच्या मुख्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसचं २०२७ पासून टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं सरनाईक यावेळी म्हणाले.

****

दोन हजार रुपयांवरच्या विशेष यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. दरम्यान, या मुद्यावर न्यायालयाने केंद्र सरकार, रिजर्व्ह बँक आणि इतरांना नोटीस जारी करून चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

****

निवडणूक आयोगानं देशभरात राबवलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत, आंदोलन पुकारलं आहे. आज नागपुरात कार्यकर्त्यांनी काळे फुगे हवेत सोडून आणि हातात निषेधाचे फलक घेऊन निवडणूक आयोगा विरोधात निषेध व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. या निवेदनात ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश कुमार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून, निषेध व्यक्त करण्यात आला.

लातूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

बीड इथं जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस तसंच एनएसयूआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

नांदेड इथं खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

राज्यात वाशिम, सिंधुदूर्ग, धुळे, इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

****

दरम्यान, देशातील संवैधानिक संस्थाबद्दल लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशातील मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी एसआयआर ही मोहीम राबवली जात असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं.

****

बीड जिल्ह्यातल्या हिवरापहाडी इथल्या शाळेत विषय शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. इथल्या विद्यार्थिनींनी थेट वर्गातून सादर केलेल्या विशेष बातमीपत्राची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दखल घेत, तातडीने शिक्षक नियुक्तीचे निर्देश दिले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून –

हिवरापहाडी इथल्या दुर्गम भागातील शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी, थेट वर्गातूनच अभिरुप बातमीपत्र सादर केलं होतं. या साठी त्यांनी पाणी पिण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्यांचा माईकसारखा वापर केला होता, ही चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाला. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शिवाजी जोगदंड यांची या शाळेत नियुक्ती केली, आदेश मिळताच, शिवाजी जोगदंड या शाळेत रुजू झाले.

****

धाराशिव जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते. या योजनेतील कामं निर्धारित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश देत त्यांना आवश्यकतेनुसार काळ्या यादीत टाकण्याची सूचनाही जिल्हाधिकारी पूजार यांनी केली.

****

मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे २४०० टीएमसी पाणी अडवून ते पाटोदा, शिरूर आणि आष्टी या तालुक्याला द्यावं अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे. या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्याला धोंडे संबोधित करत होते. या प्रश्नासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून वर्षभरात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धोंडे दिला. 

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या गुलवीरसिंह याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं, गुलवीरसिंहचं या स्पर्धेतलं हे दुसरं पदक आहे. महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत विद्या रामराज हिने कांस्यपदक मिळवलं, नेमबाजीत २५ मीटर पिस्तुल प्रकारात इशा सिंह हिने रौप्यपदकाचा वेध घेतला.

****

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारसोबत तडजोडीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपल्यासोबत आंदोलनात असणाऱ्यांना सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. आपल्या मागण्यांसंदर्भात माघार न घेता, आपली तुरुंगात जायची तयारी असल्याचंही जरांगे यांनी सांगितलं.

****

हवामान

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात शिरलेले पुराचे पाणी ओसरलं असून, तेथे प्रशासनाच्या वतीने स्वच्छता तसंच आरोग्य तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment