Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 October
2026
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
विकासाकडे
अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक-अभिजात मराठी भाषा गौरवदिन सोहळ्यात
मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
शेतपिकांचे
पंचनामे युद्धपातळीवर;दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न-महसूल मंत्र्यांची ग्वाही
·
हिंगोली, परभणी
तसंच नांदेड जिल्ह्यात भूकंप;औंढा तालुक्यात गढाळा इथं केंद्रबिंदू
·
आशियाई
क्रीडा स्पर्धेचा आज समारोप-२१ सुवर्णपदकांसह भारताची चौथ्या स्थानी झेप
आणि
·
राज्याच्या
बहुतांश भागातून मोसमी पावसाची माघार
****
विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक
असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल अभिजात मराठी
भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत एसएनडीटी महिला विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात
मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री
उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मातृभाषेत कामकाजाचं
महत्त्व विशद करतांना मुख्यमंत्री म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्ताने नांदेड
इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा, वाङमय
आणि संस्कृती अभ्यास संकुलात काल अभिजात मराठी साहित्याचं प्रकट वाचन करण्यात आलं.
केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर,
२०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
****
राज्यात अवर्षणामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे
युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याची
ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल बुलडाणा जिल्ह्यात पीक
पाहणी दौऱ्यादरम्यान शेगाव इथं माध्यमांशी बोलत होते. या अनुषंगाने प्रशासनाला
स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, असं बावनकुळे यांनी सांगितलं. ते
म्हणाले...
बाईट
- महसूल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, काल अकोला जिल्ह्यातही महसूल
मंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर दुष्काळ पाहणी केली. दुष्काळ पाहणी केल्यानंतर ते काल माध्यम
प्रतिनिधींशी बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये,
असं आश्वासन त्यांनी दिलं. विरोधकांनी कुठलंही राजकारण न
करता दुष्काळ परिस्थितीत सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलं
****
हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल
भूकंपाचे धक्के बसले,
हिंगोली जिल्ह्यात सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ३
पूर्णांक ३ रिश्टर स्केल तर त्यापाठोपाठ ४ पूर्णांक ५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या
भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर लहान लहान धक्क्यांची मालिका सुरूच होती. या
भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा तालुक्यातील गढाळा होता. हिंगोलीचे जिल्हाधिकारी, राहुल
गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली..
बाईट
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
परभणी तसंच नांदेड जिल्ह्यातही काल सकाळी पावणे दहा
वाजेच्या सुमारास ४ पूर्णांक ४ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. नागरिकांनी
भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि
प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५
वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा
आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या
जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. ईशान्य क्षेत्र विकास
मंत्रालय हा याचाच एक भाग आहे. आज या विषयी जाणून घेऊ,
ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी अधिक
सक्षमपणे जोडण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि डिजिटल जोडणी यांसारख्या क्षेत्रांमध्ये विविध विकासकामं राबवली
जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं प्रथमच ईशान्य
क्षेत्र विकास मंत्रालयाची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्येकडील
राज्यांचा उल्लेख अष्टलक्ष्मी असा करतात.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्थानिक उद्योग, कृषी, हस्तकला आणि पर्यटनाला प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती
करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप
होत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पाच सुवर्णपदकांची लयलूट करून, चौथ्या
स्थानावर झेप घेत आपल्या अभियानाची सांगता केली. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिने तर
कुस्तीत अमन सेहरावत याने सुवर्णपदक पटकावलं. अमरावतीची तीरंदाज कुमकुम मोहोड हिने
महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.
पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानवर
तर पुरुषांच्या हॉकीत भारताने मलेशियावर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. भारताची
एकूण पदकसंख्या ८५ झाली असून यात २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य
पदकांचा समावेश आहे.
****
वेस्टइंडीज विरुद्धच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेत भारताचा दोन एक असा विजय झाला आहे. कालच्या अखेरच्या सामन्यात भारतानं
दिलेलं ३५२ धावांचं आव्हान पाहुण्या संघानं कर्णधार शाई होपच्या शतकी खेळीच्या
बळावर दहा चेंडु शिल्लक असतांनाच पार केलं. होप सामनावीर तर भारताचा कर्णधार शुभमन
गील मालिकावीर ठरला. या दोन्ही संघात सहा तारखेपासून टी ट्वेंटी मालिकेला प्रारंभ
होत आहे.
****
राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं
माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. मराठवाड्यात नांदेड, लातूर
आणि धाराशिवसह काही मोजके जिल्हे वगळता मोसमी पावसानं यंदा आठवडाभर आधीच निरोप
घेतला. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या २-३ दिवसात मोसमी पाऊस परतून जाऊ शकतो, अशी
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
तुळजापूर इथं श्री तुळजा भवानी देवीच्या मंचकी निद्रेला
कालपासून प्रारंभ झाला. पुढच्या रविवारी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनारुढ
होवून शारदीय नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होईल.
****
राज्यस्तरीय वन्यजीव सप्ताहाचा काल बुलडाणा जिल्हयातील
प्रसिद्ध लोणार इथं शुभारंभ करण्यात आला. या सप्ताहानिमित्त पुढील सात दिवस लोणार
अभयारण्यात पक्षी निरीक्षण,
स्वच्छता मोहीम आणि शालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात
आल्याची माहिती वनविभागानं दिली आहे.
****
अहिल्यानगर इथल्या स्नेहालय संस्थेचे वार्षिक बा-बापू, विनोबा
आणि आदर्श कर्मचारी पुरस्कार काल जाहीर झाले. मानपत्र, पन्नास
हजार रुपये आणि ग्रंथ या स्वरुपाचे हे पुरस्कार येत्या बुधवारी, ७
ऑक्टोबर रोजी स्नेहालय पुनर्वसन संकुल इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार
आहेत.
****
नांदेड तालुक्यातल्या सायाळ इथं पोखर्णी कृषी विज्ञान
केंद्राच्या वतीने काल चारा साक्षरता अभियानाअंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली.
सोयाबीन कुटारावर युरिया आणि मोलासेस प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता
वाढवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली. पर्यायी चारा स्रोतांचा वापर करण्याचं आवाहन
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथल्या आनंदराव
धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात काल जिल्हास्तरीय एकदिवसीय शेतकरी लेखक साहित्य
संमेलन घेण्यात आलं. माजी आमदार भीमराव धोंडे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल
सबनीस, यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी
उपस्थित होते.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल
स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
यांच्या हस्ते स्वामीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
अंबाजोगाई इथंही स्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७६ गावांना आणि २३ वाड्यांना
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यात टँकरसाठी १२२ गावांनी
नोंदणी केल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे.
****
लातूर इथं केंद्रीय राखीव पोलिस दल-सीआरपीएफ च्या रंगरूट
प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’, ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर घेण्यात आलं.
अधिकारी, कर्मचारी,
प्रशिक्षणार्थी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमांमध्ये
उत्स्फूर्त सहभाग घेतला.
****
अंबाजोगाई इथं योगेश्वरी सैनिकी शाळेत हुतात्मा स्मारक
उभारण्यात आलं आहे. निवृत्त ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्या हस्ते काल या स्मारकाचं
अनावरण करण्यात आलं. यावेळी देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना
पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment