▼

Tuesday, 6 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 October 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑक्‍टोबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे पदवीधर मतदारसंघातून महायुतीच्या स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसने पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगांवकर, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचं चित्र आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून, शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

****

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ‘व्हीबी-जीरामजी’ अंतर्गत मागेल त्याला तातडीनं काम उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. या योजनेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून रोजगारनिर्मिती, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावं, तसंच मजुरांचं स्थलांतर रोखण्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

****

भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचं महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज विशाखापट्टणममध्ये हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये ‘फ्लीट सपोर्ट शिप-1’चं जलावतरण आणि ‘फ्लीट सपोर्ट शिप-5’ची पायाभरणी करण्यात येणार आहे. यासोबतच अद्ययावत स्लिपवे-4 आणि 300 टन क्षमतेच्या गॉलियाथ क्रेनचं उद्घाटनही होणार आहे. या सुविधांमुळे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता वाढणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आजचा नियोजित एकदिवसीय लाक्षणिक संप तसंच आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चा मागे घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

****

मेंदूच्या अभ्यासात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या कार्ल डायसेरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना वैद्यकशास्त्रातला २०२६ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स आणि लाइट-गेटेड आयन चॅनेल्स संदर्भातल्या महत्त्वपूर्ण शोधांसाठी हा पुरस्कार तिन्ही शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात आला आहे. प्रकाशाचा वापर करून जिवंत मेंदूतील विशिष्ट मज्जापेशी सुरू किंवा बंद करण्याची पद्धत विकसित करण्यात त्यांच्या संशोधनाचा महत्त्वाचा वाटा आहे.

****

मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘प्रोजेक्ट चित्ता’अंतर्गत केजेपी-21 या ३२ महिन्यांच्या मादी चित्त्यानं पाच निरोगी पिल्लांना जन्म दिला आहे. भारतात पिल्लांना जन्म देणारी केजेपी-21 ही भारतीय वंशाची तिसरी मादी चित्ता ठरली आहे. या पाच पिल्लांच्या जन्मामुळे देशातल्या चित्त्यांची संख्या ६० वर पोहोचली असून, त्यात ४१ भारतीय वंशाच्या चित्त्यांचा समावेश आहे.

****

महिलांचं खऱ्या अर्थानं सक्षमीकरण करण्यासाठी जमिनीवरील मालकी हक्क आणि कृषी संसाधनांशी संबंधित निर्णय प्रक्रियेत महिलांचा प्रभावी सहभाग आवश्यक असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात टीस इथं महिलांच्या कायदेशीर हक्कांबाबत आयोजित जागरूकता आणि सल्लामसलत कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. यावेळी महिलांचे वारसाहक्क, मालमत्तेवरील अधिकार, शेतीच्या जमिनीवरील मालकी हक्क, शेतकरी आत्महत्यांनंतर महिलांची परिस्थिती, कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता आणि न्याय मिळवताना महिलांना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

****

पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यामुळे हे निर्देश दिल्याचं शेलार यांनी सांगितलं.

****

सेवा संकल्प अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातल्या सर्व दहा तालुक्यांमधल्या दिव्यांग बांधवांना युनिक डिसॅबिलिटी आयडी अर्थात युडीआयडी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरं घेण्यात येणार आहेत. उदगीर, देवणी आणि जळकोट तालुक्यांसाठी उदगीर इथल्या सामान्य रुग्णालयात १४ ऑक्टोबर रोजी, तर अहमदपूर आणि चाकूर तालुक्यांसाठी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात १६ ऑक्टोबर रोजी हे शिबिरं होणार आहेत.

****

No comments:

Post a Comment