आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Monday, 1 September 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि रशिया यांनी कठीण परिस्थितीमध्ये नेहमीच एकमेकांना
साथ दिली आहे. आम्ही युक्रेन संघर्षावर सातत्याने चर्चा करीत असतो. शांततेच्या सर्व
पर्यायांचे आम्ही स्वागतच करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष
व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत केले. या बैठकीसाठी जाताना
पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन या दोघांनीही एकाच वाहनातून प्रवास केला.
****
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रप्रमुख परिषदेच्या
शिखर परिषदेचा आज समारोप झाला. यावेळी जारी करण्यात आलेल्या तियानजिन घोषणापत्रात दहशतवादाविरुद्ध
एकत्रितरित्या लढा देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. तसेच प्रादेशिक सहकार्य आणि
नवोऊपक्रमात भारताचे वाढते योगदान देखील मान्य करण्यात आले आहे.
सदस्य राष्ट्रांनी २२ एप्रिल
२०२५ रोजी भारतातील पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
केला आणि बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तीव्र संवेदना व्यक्त केल्या. हा हल्ला करणाऱ्यांना
आणि त्यांच्या पाठिराख्यांना यासाठी जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांना शिक्षा व्हायला
हवी, असेही या घोषणापत्रात म्हटले आहे. या घोषणापत्रात भारताचा "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य"
हा जागतिक दृष्टिकोनही प्रतिध्वनीत झाला आहे. नवोन्मेष आणि प्रादेशिक सहभागामध्ये भारताच्या
नेतृत्वाला मान्यता देत, घोषणापत्रात नवी दिल्ली येथे ३ ते ५ एप्रिल २०२५ दरम्यानच्या
पाचव्या एससीओ स्टार्टअप फोरमच्या यशस्वी आयोजनाचे स्वागत करण्यात आले. यात वैज्ञानिक
आणि तांत्रिक नवोन्मेषात सहकार्य वाढवण्यात भारताची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
****
दहशतवादाबद्दल दुटप्पी निकष स्विकारता येऊ शकत नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. तियानजिन
येथील एससीओ शिखर परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत
होते. दहशतवाद हा मानवतेसाठी एक मोठे आव्हान आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध
केला पाहिजे. भारत गेल्या चार दशकांपासून दहशतवादाशी झुंजत आहे, असे सांगत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत
उभे राहणाऱ्या देशांचे आभार मानले.
****
अफगाणिस्तानातील ईशान्येकडील
कुनार प्रांतात काल रात्री झालेल्या भूकंपात ६२२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर १५००
हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सहा रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, जलालाबादपासून
२७ किलोमीटर पूर्व-ईशान्येला भारतीय वेळेनुसार बारा वाजून ४७ मिनिटांनी आठ किलोमीटर
खोलीवर भूकंपाची नोंद झाली. सुमारे २० मिनिटांनी, नांगरहार प्रांतात १० किलोमीटर
खोलीवर ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. तालिबानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी
दुर्गम पर्वतीय भागात बचावकार्यात मदत करण्यासाठी मदत संस्थांना आवाहन केले आहे. दिल्ली-एनसीआरसह
पाकिस्तान आणि उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवले.
****
नवसाला पावणारा गणपती अशी
ओळख असलेला हिंगोलीच्या गड्डेपीर इथल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थांनच्या वतीने
यावर्षी दीड लाख नवसाचे मोदक वाटप करण्यात येणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी कयाधू नदीवरून
कावड आणली जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे चार वाजता बाप्पाला महाभिषेक केल्यानंतर
मोदकोत्सवाला सुरुवात केली जाणार असल्याचं संस्थांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरवर्षी
देशभरातून नवसाचे मोदक घेण्यासाठी या ठिकाणी गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात.
****
सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आंदोलकर्ते मनोज जरांगे
पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मंत्रालय तसंच नजीकच्या परिसरात प्रचंड प्रमाणात
गर्दी झाल्याने मंत्रालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील बस आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्यात
येणार असल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितलं आहे.
दरम्यान, या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखों मराठा सहभागी झाले आणि होत
आहेत. या आंदोलनाला आपण विरोध केलेला नसून पाठिंबाही दिलेला नसल्याचं राजे मुधोजी भोंसले
यांनी स्पष्ट केलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील
पाण्याची आवक लक्षात घेऊन आज सकाळी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ६२९ पूर्णांक
२२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची
आवक पाहून विसर्ग वाढवणं किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नदी काठावरील
गावातल्या नागरीकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रकल्प प्रशासनाने केलं आहे.
****
भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने टोकियो येथे होणाऱ्या जागतिक
अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारताचा अंतिम १९ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 September
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आज घरोघरी महालक्ष्मी पूजन सोहळा साजरा होत आहे. आज
दुपारनंतर महालक्ष्मींना घरोघरच्या परंपरेनुसार पंचपक्वान्नांसह सोळा भाज्यांचा नैवेद्य
अर्पण करून त्यांचं मनोभावे पूजन केलं जाईल. यासाठी आज सकाळपासूनच बाजारपेठांमधून गर्दी
झाली आहे. उद्या गौरी विसर्जनाने या तीन दिवसांच्या सोहळ्याची सांगता होईल.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या
आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आंदोलकांनी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि स्थानकाच्या बाहेरील परिसरावर ताबा घेतला असून या
ठिकाणी आंदोलकांची गर्दी वाढल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पालिका मुख्यालयाच्या
परिसरातील सर्व रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. मंत्रालयासमोरील मार्ग वाहतुकीसाठी
बंद आहे. मुंबईच्या अनेक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. फ्री
वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील बेस्ट
वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली काल दिवसभरात दोनदा पार पडली. मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे आज वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी
बैठक होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला
उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे हे लोकशाही न मानणारे आहेत. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी
ते सुपारी घेऊन आंदोलन करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ
नेते शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या छुप्या मदतीने आरक्षणाच्या नावाखाली अराजकता
माजवत आहेत, असा आरोप ओबीसी नेते
लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
****
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५१ रुपये
५० पैशांनी घट झाली आहे. नवी दिल्लीत १९ किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलेंडर आता १
हजार ५८० रुपयांना मिळेल. जागतिक स्तरावरील तेलांच्या किंमती आणि बाजारातील उपलब्धता
या आधारावर नियमित मासिक संशोधनानंतर केंद्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. घरगुती वापराच्या
गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मे २०२५
च्या अंतिम वर्ष परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञान
आधारित क्यूआर कोड असलेली डिजिटल गुणपत्रकं त्यांच्या ईमेलवर पाठवली आहेत. यामुळे या
विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक, व्यावसायिक किंवा नोकरीविषयक कामकाज किंवा मुलाखतीसाठी मूळ गुणपत्रक सोबत बाळगण्याची
गरज भासणार नाही.
मे २०२५ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ९२ हजार
३१२ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ४५९ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशावेळी आपले चुकीचे
ईमेल आयडी नोंदवल्यामुळे त्यांना ही गुणपत्रकं अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे पुढील
परीक्षा आणि महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या डीयु
(DU) पोर्टलवर लॉगिन करून
आपली वैयक्तिक माहिती तपासून ती अद्ययावत करावी असं आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद
पाटील यांनी केले आहे.
****
एल पी जी अर्थात गॅस सिलेंडरच्या वायुगळतीमुळे सोलापूर
इथे २ जणांचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी ही घटना लक्षात आली. सोलापूर इथं बलरामवाले
कुटुंब रात्री झोपेत असताना ही दुर्घटना घडली. गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे बंद
खोलीत गॅस पसरला आणि ६ वर्षाचा मुलगा हर्ष आणि मुलगी अक्षरा या दोघांचा गुदमरुन मृत्यू
झाला तर युवराज मोहन सिंग बलरामवाले आणि त्यांची पत्नी रंजना बेशुद्धावस्थेत आढळले.
****
यंदाच्या खरिप हंगामात मे ते ऑगस्ट या चारही महिन्यात
नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील ९३ पैकी ८८
मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांची परिस्थिती होत्याचे नव्हते अशी आहे. रस्ते, पूल, घरं, पशुधनासह शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक
मदत मिळावी, अशी मागणी खासदार अशोक
चव्हाण यांनी केली आहे. खासदार चव्हाण यांनी गेल्या २ दिवसात नांदेड शहर आणि ग्रामीण
भागातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदेड जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती अतिशय भीषण
असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
****
येत्या २४ तासात मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे
आणि वीजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या
घाट-माथ्यांवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: یکم ستمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
आत्मनिर्भरता आणि `व्होकल फॉर लोकल`
हा मंत्र घेऊन मार्गक्रमण करा-मन की बातमधून पंतप्रधानांचं आवाहन
·
ग्रामीण भागातल्या रस्त्यांना विशिष्ट संकेतांक देण्याची
नावीन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित
·
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीने घरोघरी आगमन-आज
पूजनाचा सोहळा
·
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन
आणि
·
आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत जपानवर मात करत भारताचा
सुपर फोरमध्ये प्रवेश
****
आत्मनिर्भरता
आणि `व्होकल फॉर लोकल` हा मंत्र घेऊन विकासाच्या
वाटेवर मार्गक्रमण करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. आकाशवाणीवरच्या `मन की बात` या
कार्यक्रम मालिकेच्या १२५ व्या भागात ते बोलत होते. आगामी सणासुदीच्या दिवसात आपला
पोशाख, घरातली सजावट, भेटवस्तू वगैरे सर्व
गोष्टी स्वदेशी असाव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ते म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
यूपीएससी
परीक्षेत यशाची संधी थोडक्यात गेलेल्या उमेदवारांची माहिती देणारं प्रतिभासेतू हे डिजिटल
व्यासपीठ तयार करण्यात आलं असून, या द्वारे खासगी कंपन्या या उमेदवारांना
नोकरी देणार आहेत. अनेक उमेदवारांना याचा लाभ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
१७ सप्टेंबरला
देशभरात साजऱ्या होत असलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवसाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी
तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राबवलेल्या ऑपरेशन पोलोचा, तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासहेब आंबेडकर
यांनी या संदर्भात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख
केला. ते म्हणाले..
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
जम्मू काश्मीरमध्ये
झालेला `खेलो इंडिया` जलक्रीडा महोत्सव, देशातले वाढते सौरऊर्जा प्रकल्प, देशभरात अतिवृष्टी आणि
इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली जीवित तसंच वित्तहानी, भारतीय
संस्कृतीचा विदेशातला प्रभाव, यासोबतच अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या
यांची जयंती, विश्वकर्मा जयंती, आदी पर्वांचाही
पंतप्रधानांनी कालच्या भागात उल्लेख केला.
****
मराठा आरक्षणाबाबत
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर राज्य सरकार कायदेशीर मार्गदर्शन
घेत असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात स्थापन
मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी काल झाली. राज्यघटनेत
बदल करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा सल्ला देणारे शरद पवार केंद्रात मंत्री
असताना गप्प का बसले, असा प्रश्न विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
****
दरम्यान, आजपासून उपोषणाची
तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे-पाटील यांच्या
आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. डॉक्टरांच्या पथकाने काल त्यांची प्रकृती तपासली आणि रक्तदाब
तसंच मधुमेह अहवाल नियमित असल्याचा निर्वाळा दिला.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल जरांगे
यांची उपोषणस्थळी भेट घेतली. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनीही काल जरांगे यांची भेट
घेतली. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासन दरबारी मांडणार असल्याचं भुमरे यांनी सांगितल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
ग्रामीण
भागातील रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचे सीमांकन
करून त्यांना विशिष्ट संकेतांक देण्याची नावीन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित करण्यात
आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय
घेण्यात आला. प्रत्येक गावातील ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील सर्व रस्त्यांची यादी तयार
केली जाईल, आणि त्यानंतर हा संकेतांक दिला जाणार आहे. यामुळे
शेतकऱ्यांना बारमाही रस्त्यांची सुविधा मिळण्यासह अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण
मिळणार आहे.
****
ज्येष्ठा
कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी आगमन झालं. महिला वर्गाने वाजतगाजत गौराईचं स्वागत करत, सजवलेल्या
मखरात तिची स्थापना केली. आज घरोघरी गौरी पूजन सोहळा साजरा होत आहे. आज दुपारनंतर गौरींना
घरोघरच्या परंपरेनुसार पंचपक्वान्नांसह सोळा भाज्यांचा नैवेद्य अर्पण करून त्यांचं
मनोभावे पूजन केलं जाईल. यासाठी आज सकाळपासूनच बाजारपेठांमधून गर्दी झाली आहे. उद्या
गौरी विसर्जनाने या तीन दिवसांच्या सोहळ्याची सांगता होईल.
दरम्यान, पाच दिवसांच्या
गणपतींचं काल ठिकठिकाणी विसर्जन झालं. नागरिकांनी आपापल्या परिसरातल्या पाणवठ्यांवर
तसंच कृत्रीम जलाशयांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.
****
केंद्रीय
मंत्री जे. पी. नड्डा यांनी काल मुंबईत विविध मंडळांना भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं.
खासदार
अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथं लोकमान्य टिळक गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाचं दर्शन
घेतलं. छत्रपती संभाजीनगर इथं खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी हडको एन-9 इथल्या मृत्युंजय
गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. या मंडळाने ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावा
सादर केला आहे.
**
नांदेडच्या
राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमाच्या रचनात्मक कार्यासाठी पुण्याच्या
गुरुजी तालीम गणेश मंडळाकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मानचिन्ह आणि २१ हजार रुपये
या स्वरुपाचा हा पुरस्कार आश्रमाचे अध्यक्ष सुधाकर टाक यांनी काल स्वीकारला. शेकडो
गणेशभक्तांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
****
अभिनेत्री
प्रिया मराठे यांचं काल पहाटे मुंबईत निधन झालं. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या
काही काळापासून त्या कर्करोगानं ग्रस्त होत्या. तू तिथे मी, या सुखांनो
या, पवित्र रिश्ता, या दूरचित्रवाणी मालिकांसह
अनेक चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव
देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर जिल्ह्याच्या
अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव इथले मराठा आंदोलक विजयकुमार घोगरे यांचं परवा मुंबईत
आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान निधन झालं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर
त्यांच्या मूळगावी काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
आशिया चषक
पुरुष हॉकी स्पर्धेत काल भारताने जपानवर ३-२ अशी मात केली. बिहारमध्ये राजगीर इथं झालेल्या
या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने दोन गोल केले तर
मनदीपने एक गोल केला. हा सामना जिंकून भारताने सुपर-४ मध्ये प्रवेश केला आहे.
****
कन्नड-सोयगाव
विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
संजय शिरसाट यांची भेट घेतली. यावेळी कन्नड तालुक्यातील विविध विकासकामांच्या संदर्भात
चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
****
ग्रामविकास
विभागाच्या वतीनं 'मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान' राबवण्यात
येणार आहे. या अभियानात सहभागी गावातील लोकांनी थकीत कर एकरकमी भरल्यास त्यांना थेट
५० टक्के सवलत देण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
ते काल सोलापूर इथं बोलत होते. सलग पाच वर्ष कर थकवणाऱ्यांवर निवडणूक निर्बंध घालण्याचा
इशाराही त्यांनी दिला.
****
परभणी जिल्ह्यातील
गंगाखेड पंचायत समिती आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमानं काल भटके विमुक्त दिवस
साजरा करण्यात आला. भटके विमुक्त जातीतल्या ६० लाभार्थींना घरकुल मंजुरीचे आदेश तसंच
महसूल विभागाकडून जातीचे प्रमाणपत्र, सातबारा वाटप यावेळी करण्यात आलं.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत
सत्ताधारी गटाच्या शिव शेतकरी विकास पॅनलनं १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकल्या आहेत. एका
जागी अपक्षानं विजय मिळविला.
****
नांदेड
आकाशवाणी केंद्रात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र गंगाखेडकर काल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ
सेवेनंतर निवृत्त झाले. नांदेड आकाशवाणी केंद्रात त्यांना छोटेखानी समारंभात निरोप
देण्यात आला.
****
परभणीचे
जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी काल पुयनी-पालम रस्त्याला भेट दिली. इथला पर्यायी वळण
रस्ता पावसात वाहून गेला, या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, असे
निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी दिले. दरम्यान, चव्हाण
यांनी शेत पिकांच्या नुकसानीचीही पाहणी केली.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सध्या १७ हजार २३९ दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद
या वेगाने पाण्याची आवक सुरु असून गोदापात्रात नऊ हजार ४०० दशलक्ष घनफूट प्रति सेकंद
या वेगाने विसर्ग सुरु आहे.
बीड जिल्ह्यातल्या
मांजरा धरणातून सुमारे साडे तीन हजार दशलक्ष घनफुट, नांदेडच्या विष्णुपुरी
धरणातून सुमारे दोन हजार तर हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणाच्या १४ दरवाजांमधून
१४ हजार ६८१ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने विसर्ग सुरु आहे.
****
हवामान
कोकण मराठवाडा
आणि विदर्भाच्या काही भागात हवामान विभागाने आज आणि उद्या यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात
आज पावसाची शक्यता आहे. बीड आणि धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्यात उद्यासाठीही यलो
अलर्ट देण्यात आला आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...