Monday, 1 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत आणि रशिया यांनी कठीण परिस्थितीमध्ये नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. आम्ही युक्रेन संघर्षावर सातत्याने चर्चा करीत असतो. शांततेच्या सर्व पर्यायांचे आम्ही स्वागतच करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत केले. या बैठकीसाठी जाताना पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन या दोघांनीही एकाच वाहनातून प्रवास केला.

****

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रप्रमुख परिषदेच्या शिखर परिषदेचा आज समारोप झाला. यावेळी जारी करण्यात आलेल्या तियानजिन घोषणापत्रात दहशतवादाविरुद्ध एकत्रितरित्या लढा देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. तसेच प्रादेशिक सहकार्य आणि नवोऊपक्रमात भारताचे वाढते योगदान देखील मान्य करण्यात आले आहे.

सदस्य राष्ट्रांनी २२ एप्रिल २०२५ रोजी भारतातील पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तीव्र संवेदना व्यक्त केल्या. हा हल्ला करणाऱ्यांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना यासाठी जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी, असेही या घोषणापत्रात म्हटले आहे. या घोषणापत्रात भारताचा "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" हा जागतिक दृष्टिकोनही प्रतिध्वनीत झाला आहे. नवोन्मेष आणि प्रादेशिक सहभागामध्ये भारताच्या नेतृत्वाला मान्यता देत, घोषणापत्रात नवी दिल्ली येथे ३ ते ५ एप्रिल २०२५ दरम्यानच्या पाचव्या एससीओ स्टार्टअप फोरमच्या यशस्वी आयोजनाचे स्वागत करण्यात आले. यात वैज्ञानिक आणि तांत्रिक नवोन्मेषात सहकार्य वाढवण्यात भारताची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

****

दहशतवादाबद्दल दुटप्पी निकष स्विकारता येऊ शकत नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. तियानजिन येथील एससीओ शिखर परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. दहशतवाद हा मानवतेसाठी एक मोठे आव्हान आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला पाहिजे. भारत गेल्या चार दशकांपासून दहशतवादाशी झुंजत आहे, असे सांगत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे राहणाऱ्या देशांचे आभार मानले.

****

अफगाणिस्तानातील ईशान्येकडील कुनार प्रांतात काल रात्री झालेल्या भूकंपात ६२२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर १५०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सहा रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, जलालाबादपासून २७ किलोमीटर पूर्व-ईशान्येला भारतीय वेळेनुसार बारा वाजून ४७ मिनिटांनी आठ किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद झाली. सुमारे २० मिनिटांनी, नांगरहार प्रांतात १० किलोमीटर खोलीवर ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. तालिबानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्गम पर्वतीय भागात बचावकार्यात मदत करण्यासाठी मदत संस्थांना आवाहन केले आहे. दिल्ली-एनसीआरसह पाकिस्तान आणि उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवले.

****

नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेला हिंगोलीच्या गड्डेपीर इथल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थांनच्या वतीने यावर्षी दीड लाख नवसाचे मोदक वाटप करण्यात येणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी कयाधू नदीवरून कावड आणली जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे चार वाजता बाप्पाला महाभिषेक केल्यानंतर मोदकोत्सवाला सुरुवात केली जाणार असल्याचं संस्थांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरवर्षी देशभरातून नवसाचे मोदक घेण्यासाठी या ठिकाणी गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात.

****

सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आंदोलकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मंत्रालय तसंच नजीकच्या परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने मंत्रालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील बस आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितलं आहे.

दरम्यान, या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखों मराठा सहभागी झाले आणि होत आहेत. या आंदोलनाला आपण विरोध केलेला नसून पाठिंबाही दिलेला नसल्याचं राजे मुधोजी भोंसले यांनी स्पष्ट केलं आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेऊन आज सकाळी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ६२९ पूर्णांक २२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणं किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नदी काठावरील गावातल्या नागरीकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रकल्प प्रशासनाने केलं आहे.

****

भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने टोकियो येथे होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारताचा अंतिम १९ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

****

No comments: