Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
मराठवाड्यात १८९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, धाराशिव जिल्ह्यात
चार जणांचा पावसामुळे मृत्यू
·
पावसाची उसंत, मात्र धरणांतून होणाऱ्या मोठ्या विसर्गानंतर
पूरस्थिती कायम
·
जायकवाडी धरणाच्या सर्व २७ दरवाजातून सुमारे दोन लाख दशलक्ष
घनफूट विसर्ग, मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातल्या परिस्थितीचा
आढावा
·
आगामी सण-उत्सव स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीसह साजरे करण्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
आणि
·
भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला नमवत पटकावलं आशिया
चषक स्पर्धेचं विजेतेपद
****
मराठवाड्यासह
राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावांमध्ये
पुराचं पाणी शिरलं असून, नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. मराठवाड्यात १८९
मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. काल पावसाचा जोर कमी होता, मात्र बहुतांश धरणांमधून मोठा विसर्ग सुरु असल्यानं पूरस्थिती कायम आहे.
छत्रपती
संभाजीनगर ६८ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. याविषयी अधिक माहिती आमच्या
प्रतिनिधीकडून,
‘‘पैठणच्या जायकवाडी
धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यानं नाथ मंदिरामागील
मोक्षघाट पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पैठणमधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात
आलं. पैठण तालुक्यात बाबुळगाव, केसापुरी, पैठण खेडा या गावांचा संपर्क तुटला आहे. पैठण इथं जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन
मंत्री गिरीश महाजन यांनी नाथसागर धरणाची पाहणी करत प्रशासनास सावधानतेच्या सूचना दिल्या.
छत्रपती संभाजीनगर शहरातला हर्सूल तलावही ओसंडून वाहत आहे. गंगापूर तालुक्यात पावसाचं
पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरलं तर लासूर इथं शिवना नदीच्या पुरामुळे देवीच्या मंदिर
परिसरातल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं. वेरूळ लेणी परिसरातला सीता न्हाणी धबधबा ओसंडून
वाहत आहे. वैजापूर तालुक्यातल्या अंतापूरमध्ये पुराच्या पाण्यात सहा जण बेपत्ता झाल्याचं
वृत्त आहे.
दरम्यान, अतिवृष्टी
आणि पूर परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज शाळांना सुटी जाहिर करण्यात
आली आहे. यात महापालिका क्षेत्रातल्या शाळांना ही सुटी लागू नसल्याचं जिल्हाधिकारी
दीलीप स्वामी यांनी स्पष्ट केलं आहे.’’
**
बीड जिल्ह्यात
मुसळधार पावसामुळे जवळपास सगळेच प्रकल्प पूर्ण भरले आहेत. वडवणी तालुक्यातल्या काही
गावांचा संपर्क तुटला असून, आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं
नुकसान झालं असून, विशेष मदत पॅकेज देण्यात यावं, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे
केली आहे.
**
नांदेड
जिल्ह्यात कालपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र विष्णुपुरी
प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे गोदावरी नदीचा पूर कायम आहे. नांदेड
शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे. महापालिकेने जवळपास ९५० नागरिकांना निवारा केंद्रात
हलवलं आहे. अजूनही पुराचं संकट कायम असल्यानं, शहरवासीयांनी खबरदारी
घ्यावी, असं आवाहन महापालिका आयुक्त डॉ.
महेशकुमार डोईफोडे यांनी केलं आहे.
नांदेड
जिल्ह्यात पुरामुळे पिकं हातची गेली. त्यामुळे संकटात सापडलेल्या धर्माबाद तालुक्यातल्या
रोशनगाव इथल्या गावकऱ्यांनी गोदावरी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. भोकर तालुक्यात
पाळज इथं पुराच्या पाण्यात वाहून एकाचा मृत्यू झाला.
दरम्यान, नांदेडमध्ये
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी
आपलं एक दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत
जमा करण्यात येणार असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सांगितलं.
**
लातूरच्या
अहमदपूर तालुक्यात मन्याड नदीसह सर्व लहान-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
आहे.
हिंगोली
जिल्ह्यात कयाधू, पूर्णा नद्यांसह ओढ्यांना आलेल्या पुरामुळे दहा गावांचा संपर्क
तुटला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या तोंडापूर इथल्या एका युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून
गेल्यानं मृत्यू झाला.
धाराशिव
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, ८१ जनावरं
दगावली तर ६०० हून अधिक मालमत्तेचं नुकसान झालं.
परभणी जिल्ह्यात
१० मंडळात अतिवृष्टी झाल्यानं अनेक भागात पाणी साचलं आहे. नदीकाठच्या गावांना सुरक्षित
ठिकाणी आश्रय घेण्याचं आणि सावध राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह परदेशी यांनी
केलं. गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी काल नुकसानीची पाहणी केली.
जालना जिल्ह्यात
भोकरदन, जाफ्राबाद, घनसावंगी तालुक्यात पुराचं पाणी
शेत शिवारात शिरल्याने अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली आहेत. माजी केंद्रीय मंत्री
रावसाहेब दानवे यांनी काल भोकरदन तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
**
विभागातल्या
सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पैठणच्या जायकवाडी धरण क्षेत्रात
दीडशे मिलिमीटर पाऊस झाल्यानं धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडले असून, गोदावरी नदीपात्रात
दोन लाख ५२ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरु आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातून सुमारे तीन लाख, इसापूर धरणातून सुमारे
२२ हजार, सिद्धेश्वर प्रकल्पातून २५ हजार, सिना कोळेगाव धरणातून सुमारे एक लाख चार हजार, येलदरी
धरणातून ४४ हजार, तर निम्न दुधना प्रकल्पातून २१ हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं विसर्ग सुरू आहे.
**
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी
संपर्क साधून पावसाच्या, मदतकार्याच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. याबाबत माहिती देताना
ते म्हणाले,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
आगामी सण-उत्सव
स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीसह साजरे करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १२६व्या भागात बोलत होते.
स्वदेशी उत्पादित उत्पादनं खरेदी केल्यानं देशातल्या कारागिरांच्या कुटुंबांना आनंद
मिळेल, शिवाय त्यांच्या कठोर परिश्रमांचा सन्मान होईल आणि तरुण उद्योजकांच्या
स्वप्नांना पंख मिळतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची १०० वर्ष, नवरात्रोत्सव, दसरा,
महिला शक्तीचा गौरव आदी विषयांवर पंतप्रधानांनी मन की बात मध्ये भाष्य
केलं.
****
सेवा आणि
सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन
आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व च्या विशेष मालिकेच्या
आजच्या भागात प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या माध्यमातून सरकारने
पायाभूत सुविधा विकासामध्ये कशी क्रांती घडवून आणली, याविषयी जाणून घेऊ...
‘‘पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात लक्षणीय बदल घडून
येत आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी आहे - पंतप्रधान गतिशक्ती उपक्रम, हा एक असा मास्टर प्लॅन आहे जो वेगवेगळ्या विभाग जोडतो, प्रकल्प अंमलबजावणीला गती देतो आणि भारताच्या विकासदृष्टीला प्रत्यक्षात उतरवतो.
पंतप्रधान मोदी यांच्या मते, ‘गतिशक्ती’
हे समग्र सुसाशनाचं विस्तारित रूप आहे.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२०२१ मध्ये सुरू झालेला पंतप्रधान
गतिशक्ती हा एक राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे जो विविध मंत्रालयं आणि विभागांना एकत्र
आणून, सुसंगत आणि अखंड प्रकल्प अंमलबजावणी सुनिश्चित करतो. प्रथमच,
५७ मंत्रालयं आणि ३६ राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेश एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर
काम करत आहेत.
नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप - NPG ही प्रणाली
स्थापन करण्यात आली असून, तिच्या माध्यमातून प्रकल्पांचं मूल्यांकन
करण्यात येतं. GIS आधारित नकाशे, रिअल-टाईम
मॉनिटरिंग आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी यांच्या मदतीने, गतिशक्ती
शाश्वत आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारत आहे - ज्यामुळे भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र
होण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.
गतिशक्ती म्हणजे एक दूरदृष्टी
- जी समृद्ध, आधुनिक आणि आत्मनिर्भर भारत घडवत आहे.’’
****
ज्येष्ठ
साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं काल लातूर इथं निधन झालं, ते ८० वर्षांचे
होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. चंदनशिव यांनी ग्रामीण
समाजातली स्थित्यंतरं चित्रित केली. त्यांच्या पार्थिव देहावर काल कळंब या त्यांच्या
मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
क्रिकेट
भारतीय
संघानं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात
भारतानं पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने
१४६ धावा केल्या. कुलदीप यादवनं चार बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या
भारतीय संघानं सावध सुरुवातीनंतर तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजयी
लक्ष्य पार केलं. तिलक वर्मा सामनावीर तर अभिषेक शर्माला मालिकावीर पुरस्कार देण्यात
आला.
****
No comments:
Post a Comment