Saturday, 27 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      गरीबांना हक्काचं पक्कं घर मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध-पंतप्रधानांची ग्वाही

·      देशभरात ९७ हजारावर 4G टॉवर्सचं लोकार्पण-राज्यातल्या नऊ हजार टॉवर्सचा समावेश

·      अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

आणि

·      संततधार पावसामुळे मराठवाड्यातलं जनजीवन विस्कळीत

****

गरीबांना हक्काचं पक्कं घर मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज ओडिशात साठ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर बोलत होते. दूरसंचार क्षेत्रात, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे ३७ हजार कोटी रुपये खर्चाच्या ९७ हजार ५०० पेक्षा जास्त मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात आलं. देशाने या क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधान म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

 

या कार्यक्रमाचं देशभरातल्या अनेक ठिकाणाहून थेट प्रक्षेपण करण्यात आलं, पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या मोबाईल टॉवर्सपैकी नऊ हजाराहून अधिक टॉवर्स महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत. 4Gच्या माध्यमातून गावागावांपर्यंत संपर्क व्यवस्था उभी राहत असून, या क्षेत्रात भारतानं आपलं सामर्थ्य दाखवून दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिकांच्या विकासाला अधिक चालना मिळेल असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. नागपूर ते जबलपूर महामार्गावर वाघांसाठी विशेष मार्गिका केल्या असून त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींना वाहतुकीचा कोणताही अडथळा येत नाही असं गडकरी यांनी सांगितलं.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारने एक भारत, श्रेष्ठ भारतउपक्रमातून विविधतेत एकतेची भावना, संस्कृती, परंपरा आणि लोकांमधील बंध कसे जोडले आहेत त्या विषयी जाणून घेऊ.

आपल्या देशात अनेक भाषा आणि शेकडो बोलीभाषाहेत. प्रत्येक प्रदेशाचे स्वतःचे वेगळं वस्त्र आणि खाद्यसंस्कृती आहे.सं असूनही आपल्याला एकत्र जोडणारी एक भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये संदेश दिला होता तो म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत...

 

एक भारत श्रेष्ठ भारत कल्पना ये है, हर वर्ष अपने राज्य को किसी एक राज्य के साथ हर राज्य जोडे। देश की एकता को जोडने का, देश के अन्य राज्य को पहचाननेका, अन्य भाषाओं को जानने का एक सहज उपक्रम बनेगा। आनेवाले दिनों मे प्रतिवर्ष एक राज्य दुसरे राज्य से तब जाकर के हम हमारे भारत की इस विविधता को पहचान पायेंगे। भारत की शक्ती को पहचान पायेंगे।

 

एक भारत श्रेष्ठ भारत हा पंतप्रधान मोदींचा एक उपक्रम आहे. ज्यातून एका राज्यातील लोक इतर राज्यांच्या संस्कृती आणि लोकपरंपरांचे बारकाईने निरीक्षण करण्यासोबतच एकमेकाशीं घनिष्ठ संबंध देखील विकसित करत आहेत.

 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १२६ वा भाग असेल.

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधानांनी पीएम केअर निधीतून मदत जाहीर करावी, वाहून गेलेल्या घराच्या जागी प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं बांधून द्यावीत अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

****

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण झाले असून, ५९ कोटी ७९ लाखांचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे महिन्या अखेरपर्यंत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते आज सोलापूर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेचं आश्वासन भरणे यांनी दिलं.

****

 

मराठवाड्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या अनेक धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून २ लाख २० हजार घनफुट, माजलगाव प्रकल्पातून एक लाख १३ हजार घनफूट, प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जायकवाडी धरणातून ३७ हजार सातशे, सिद्धेश्वर धरणातून १६ हजार, तर निम्न दुधना धरणातून १३ हजार ४०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नांदेड शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरल असून, महापालिकेने स्थापन केलेल्या निवारा केंद्रात विविध भागातील ३०९ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत असून, नदीकाठच्या गावकऱ्यांनी खबरदारीच्या उपायोजना कराव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात १९ मंडळात अतिवृष्टी झाली असून, नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कुरुंदा या गावास भेट दिली असून, ४० कुटुंबाचं स्थलांतर करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते तसंच पूल पाण्याखाली गेले आहेत.

****

बीड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, बिंदुसरा नदीवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

****

परभणी जिल्ह्यात १९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पूर्णा तालुक्यातील चुडावा गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. २५ कुटुंबाची शाळेत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालम तालुक्यात अनेक गावात पुराचं पाणी शिरल्याने तिथल्या नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे, जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे

बाईट - आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी, जालना

****

लातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७५ मिलीमीटर पाऊस झाला. चाकूर शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं, अशा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात भूम इथं संगमेश्वर प्रकल्पातून होणार विसर्ग आणि मांजरा नदीची पातळी वाढत असल्याने महसुल यंत्रणेनं या भागाला भेट देऊन पाहणी केली. नदी पात्रालगतच्या सुमारे २५ कुटुंबांचं स्थलांतर करण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील महिलांसाठी एक हजार साड्यांचं वाटप करण्यात आलं असून, विविध प्रकारचे मदतकार्य सुरु आहे.

****

सरकारने अतिवृष्टीग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना योग्य मदत करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव अजित नवले यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ३० सप्टेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असल्याचं नवले यांनी सांगितलं.

बीड इथंही नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन, ओला दुष्काळ जाहीर करावा, तसंच सरसकट पीक विमा देण्याची मागणी केली.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानात आज सिंह, कोल्हा, आणि अस्वल या प्राण्यांची प्रत्येकी एक जोडी दाखल झाली. महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहेद यांनी ही माहिती दिली आहे.

****

बीड जिल्ह्यात बिबट्याने सहा शेळ्या आणि दोन मेंढ्या मारल्या. वडवणी तालुक्यातील कुप्पा इथं ही घटना घडली.

****

शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची आज मुरली अलंकार महापूजा करण्यात आली.

****

No comments: