Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 September
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारत संचार निगम-बीएसएनएलच्या
स्वदेशी फोर-जी नेटवर्क यंत्रणेचं लोकार्पण आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील
झारसूगुडा इथून करणार आहेत. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी देणाऱ्या, या उपक्रमाचा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातून
प्रारंभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी
उपस्थित राहणार आहेत. देशभरात सुमारे ९८ हजार ठिकाणी बसवण्यात येणारी बीएसएनएल फोर-जी
यंत्रणा नंतर फाईव-जीमध्येही रुपांतरित होणार आहे.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान
निधी योजनेचा २१वा हप्ता काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते
दूरस्थ पद्धतीनं लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. अडीच लाखांहून जास्त महिला
शेतकऱ्यांसह २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ५४० कोटींहून जास्त रुपये
हस्तांतरित करण्यात आले.
****
आज जागतिक पर्यटन दिन आहे.
हा दिवस लोकांना जोडण्यात, सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्यात
आणि आर्थिक विकासात पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करतो. पर्यटन आणि शाश्वत बदल ही यंदाची
संकल्पना आहे. हा दिवस १९७० मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या
कायद्यांच्या स्वीकृतीचे स्मरण करतो. हा दिवस पहिल्यांदा १९८० मध्ये साजरा करण्यात
आला. पर्यटन हे निर्यातीत योगदान देणाऱ्या आणि जागतिक समृद्धीला चालना देणाऱ्या प्रमुख
आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे. जून २०२५ पर्यंत, भारतात येणाऱ्या पर्यटकांची
संख्या १६ पुर्णांक ४ दशलक्ष होती, तर परदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या
८४ पुर्णांक ४ दशलक्ष नोंदवली गेली.
****
"सांगली जिल्ह्यात महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेता, कायमस्वरूपी उपाय योजनांचा विचार करावा लागेल. नैसर्गिक आपत्तीची भविष्यकालीन संकटं
ओळखून पुरबाधितांनी आपली मनस्थिती बदलावी, असं आवाहन राज्याचे उच्च आणि
तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलं. गतिमान
प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत 25 फायबर ग्लास बोटींच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद, सांगली यांनी खरेदी केलेल्या २५ फायबर
ग्लास यांत्रिक बोटीचं लोकार्पण पाटील यांच्या हस्ते यावेळी झालं.
****
नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या नऊ जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर
घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभुमीवर
नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर झाली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून
सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळीही पाऊस सुरूच होता. या पार्श्वभुमीवर परंडा
तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इनगोंदा, वाटेफळ मार्गादरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा रस्ता बंद आहे, तर रत्नापूर-खंडेश्वर-वाडी पालखी मार्गावर पाच ते सहा फूट पाणी असल्यानं वाहतूक
ठप्प झाली आहे. परंडा तालुक्यातील चांदणी धरणाच्या एकूण २८ पैकी सात स्वयंचलित दरवाजे
उघडले असून चांदणी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभुमीवर नदीकाठच्या नागरिकांनी
सतर्कता बाळगावी असं आवाहन पाटबंधारे विभागानं केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात आज सकाळी
काही तासांसाठी पावसाचा पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं. काल रात्रीही जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा जोर वाढल्यानं नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला.
जिल्ह्यात ठिक ठिकाणी पुलावरून
पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अहमदपूर तालुक्यातील हागदळ, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, निलंगा तालुक्यातील लिंबाळा, उदगीर तालुक्यातील मौजे नेत्रगाव या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असून या मार्गावरील
वाहतूक बंद करण्यात आली आहे. अन्यत्रही विविध ठिकाणांहून पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
काल रात्री मांजरा धरणाचे
सहा दरवाजे पाऊण मीटरनं उघडून, तेरणा नदीवरील निम्न तेरणा प्रकल्पाचे
आठ दरवाजे दहा सेंटीमीटरनं, तर रेणापूर तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्पाचे
चार दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावात नागरिकांनी
सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून
विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्यातील
विविध भागात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणच्या शेतात पाणी साचले
असून धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसानं नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
****
मराठवाड्यातल्या अनेक धरणातून
पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणातून ३७ हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं
विसर्ग होत आहे. इसापूर, निम्न तेरणा तसंच मांजरा धरणातून १८ हजार, निम्न मानार सुमारे ७५ हजार, माजलगाव ४२ हजार आणि निम्न दुधना धरणातून
चार हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे.
****
No comments:
Post a Comment