Friday, 26 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत, बिहारमधल्या ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये थेट हस्तांतरित केले जातील. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमुळे केंद्र सरकारच्या लखपती दीदी मोहिमेला आणखी बळकटी मिळाली असून, आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांनी हा टप्पा गाठला असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. महिलांच्या कठोर परिश्रमाने गावं बदलली, समाज बदलला आणि कुटुंबांचा दर्जाही उंचावल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

भारतीय हवाई दलात सहा दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या मिग-21 विमानाला आज चंदीगढ इथं निरोप देण्यात आला. हे विमान १९६० च्या दशकात हवाई दलात समाविष्ट करण्यात आलं होतं. हवाई दलाच्या पराक्रमातील एका ऐतिहासिक अध्यायाचा शेवट म्हणून मिग-21 विमानाला निरोप देण्यासाठी एक औपचारिक उड्डाण पर्व आयोजित करण्यात आलं होतं. दिलबाग सिंग यांनी चंदीगडमध्ये पहिल्या मिग-21 स्क्वाड्रनचं नेतृत्व केलं होतं, १९८१ मध्ये ते हवाई दलाचे प्रमुख झाले.

****

देशाने चक्रीवादळे आणि वीज पडण्यासंदर्भात प्रगत पूर्वसूचना प्रणाली विकसित केली असून, त्यामुळे हजारो लोकांचे जीव वाचले असल्याचं, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्वी चक्रीवादळांमुळे हजारो लोकांचा बळी जात होता, मात्र आज अचूक अंदाज आणि वेळेवर स्थलांतरामुळे जीवितहानी जवळजवळ शून्यावर आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार देशाला सुरक्षित आणि अधिक आपत्ती-प्रतिरोधक बनवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं राय म्हणाले.

****

राज्यात अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही राष्ट्रीय आपत्ती निवारण फंडातून भरीव मदत देण्याबाबत निवेदन दिल्याचं ते म्हणाले. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या समस्या ऐकल्या. पुराच्या पाण्यामुळे घरात नुकसान झालेल्या लोकांना ५ हजार रुपये आर्थिक मदत आणि १० किलो धान्य दिलं जाणार असून, धान्य मदत वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात आज नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता, ते वार्ताहरांशी बोलत होते. नुकसानीची भरपाई म्हणून प्रति एकर किमान ५० हजार रुपये द्यावेत, त्यापैकी २५ हजार रुपये ताबडतोब शेतकऱ्यांच्या हातात मिळाले पाहिजेत, तसंच, पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींच्या संरक्षणासाठी भिंती बांधून दुरुस्ती करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीही पाटील यांनी केली.

****

ऊसतोड कामगार महिला आणि त्यांच्या मुलांच्या विविध समस्यांचं निराकरण करत, त्यांच्या कल्याणासाठी छत्रपती संभाजीनगर विभागात जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. कामगार महिलांची गर्भपिशवी काढणं, बालविवाह, गर्भलिंगनिदान चाचणी, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार अशा विषयांचा आढावा घेतल्यानंतर त्याचं निराकरण करण्यासाठी विभागीय आणि प्रत्येक जिल्ह्यातही समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले होते. ऊसतोड कामगार महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढत त्यांना मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवणं, कामगार कायद्यानुसार त्यांच्या कामाच्या वेळा तसंच वेतन याची अंमलबजावणी करणं, कामगार कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी कंत्राटदारांना अवगत करणं, बालविवाह होऊ नये यासाठी पथकांमार्फत तपासणी आणि जनजागृती करणं, आदी कामं ही समिती करणार आहे. 

****

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाला सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम इथं या अभियानाअंतर्गत महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि समुपदेशन शिबीर, मोफत तपासण्या आणि मानसिक तणाव कमी करण्यासह संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन, आदी कार्यक्रम घेण्यात आले.

पालघर जिल्ह्यातही स्वस्थ नारी - सशक्त परिवार अभियानात महिलांना पोषणविषयक मार्गदर्शन करण्यात आलं.

कोल्हापूरच्या कागल तालुक्यात या अभियानाअंतर्गत जवळपास ३००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. तालुक्यात ४१४ केंद्रांवर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. भारत याआधीच अंतिम फेरीत दाखल झाला असून, श्रीलंकेचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे.

****

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजपासून तीन दिवस राज्यात ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. किमान पाच ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची विश्रांती होणार नाही. मुसळधार पावसामुळे दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं सुरक्षित ठेवावी आणि नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

****

No comments: