Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
शारदीय नवरात्र उत्सवाची आज आठवी माळ म्हणजेच अष्टमी.
आज महागौरीच्या पूजेसह घराघरात कन्यापूजन देखील केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी अष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान आज संध्याकाळी दिल्ली
इथं चित्ररंजन पार्कमधील दुर्गा पूजा उत्सवात सहभागी होणार आहेत.
****
२१व्या शतकात सशस्त्र दलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि
संयुक्तता ही रणनितीक गरज बनली आहे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. नवी दिल्ली
इथं आज झालेल्या त्रि-सेवा चर्चासत्रात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं
आपल्या हवाई संरक्षणात संयुक्ततरित्या कामगिरी केली, जी निर्णायक ठरली, असं ते म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या एकात्मिक हवाई कमांड आणि
नियंत्रण प्रणालीनं, भारतीय लष्कराच्या आकाशतीर
आणि भारतीय नौदलाच्या ट्रिगनसह केलेल्या कामगिरी हा या यशाचा मूलभूत आधार होता, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
****
पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वार्षिक 12 टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी
दिली. पशुधनाच्या वाढीमुळं कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत 31 टक्के वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.
शाश्वत पशुधन रुपांतरण याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते काल इटलीमध्ये बोलत होते.
भारत दुग्धोत्पादनात जगात आघाडीवर आहे. पशुधनाच्या लसीकरणाचं राष्ट्रीय गोकुळ अभियान, भारत पशुधन डिजिटल ओळख आणि महिलांच्या नेतृत्वातील सहकारी
पशुपालन व्यवसाय यासारखे बदल घडवून आणणारे आणि सर्वसमावेशक उपक्रम भारतात सुरू असल्याची
माहिती त्यांनी दिली.
****
बिहार विधानसभा निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी आज जाहीर
होणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दुपारपर्यंत मतदार याद्या उपलब्ध होतील.
मतदार यादीच्या प्रती सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना देण्यात
येणार असल्याचं निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
लडाखचे पोलिस महासंचालक डॉ. एस. डी. सिंग यांचा सोनम वांगचुक
यांच्या अटकेसंबंधीचा बनावट व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारीत केला जात आहे. पत्र
सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केले आहे की, लडाखच्या पोलीस महासंचालकांनी वांगचुक यांच्या अटकेबाबत
असं कोणतंही विधान केलं नाही.
****
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मौजे नागुर इथं
पुरा,मध्ये बुडून मृत्यू झालेल्या बालाजी
व्यंकट मोरे यांच्या कुटुंबियांना आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते शासनाकडून ४ लाख
रुपयांचा धनादेश देण्यात आला. बालाजी यांचा परवा बुडून मृत्यू झाला.
****
किल्लारी भूकंपाला आज ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. आमदार
अभिमन्यू पवार यांनी आज सकाळी किल्लारी इथल्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन
भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली.
****
लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावरुन पुणे आणि मुंबई बस
सेवा आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आली. या अनुषंगानं मुरुड बस स्थानकावर
उदगीर- पुणे बस चालक वाहकांचा खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार देऊन सत्कार करण्यात आला.
****
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं २०२५ च्या क्रीडा
पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. या पुरस्कारांसाठीच्या सूचना मंत्रालयाच्या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्था २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पोर्टलद्वारे
आपले अर्ज सादर करू शकतात.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु होत आहे.
गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत होणार आहे. भारत या स्पर्धेचं जयमानपद
भूषवत आहे. २ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत आठ संघांमध्ये ३१ सामने होतील.
****
ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार भास्कर चंदनशिव यांचं रविवारी
निधन झालं. मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्या, बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता शोकसभा आयोजित केली
आहे.
****
जायकवाडी प्रकल्पातून सध्या एक लाख दोन हजार क्युसेक्स
विसर्ग सुरु आहे. पाणलोट क्षेत्र आणि नाशिक विभागात सध्या पाऊस नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वरच्या भागातील
धरणातून विसर्ग चालू आहे, त्यामुळं धरणात येणारी आवक सरासरी एक लाख २० हजार क्युसेक्स
आहे. जायकवाडी विसर्गाबाबत नागरिकांनी समाजमाध्यमांवरील माहिती ऐवजी वस्तुनिष्ठ माहिती
घ्यावी, असं आवाहन जायकवाडी प्रकल्पाच्या
मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे.
****
हवामान
राज्यात आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड आणि हिंगोली
जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment