Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 September
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
मराठवाड्यात मुसळधार
पावसामुळे जनजीवन विस्कळीत;
अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे नागरीकांनी
दक्ष राहण्याचं प्रशासनाचं आवाहन
·
३० सप्टेंबरपर्यंत
मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
·
राज्यात ऑगस्ट महिन्यात
झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण; ५९ कोटी ७९ लाखांचा मदत
निधी जाहीर
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आणि
·
आशिया चषक क्रिकेट
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत - पाकिस्तान लढत
****
मराठवाड्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी
पूर परिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक
जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून, सखल
भागात पाणी शिरलं आहे.
**
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात बेळ सांगवी गावातल्या अनेक
नागरिकांना वाढवणा इथं स्थलांतरित करण्यात आलं आहे. चाकूर शहरातही अनेक नागरिकांना
सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
दरम्यान, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले
यांनी नागरिकांना,
प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी
प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या...
बाईट
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
**
नांदेड शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरलं असून, महापालिकेच्या
निवारा केंद्रात विविध भागातील ३०९ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. गोदावरी
नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत असून, नदीकाठच्या गावकऱ्यांनी
सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. कंधार
तालुक्यातल्या अनेक गावांना मन्याड नदीच्या पुराचा फटका बसला असून, प्रशासनाकडून
बचावकार्य सुरु आहे.
**
हिंगोली जिल्ह्यात १९ मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी
नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणचे रस्ते तसंच पूल पाण्याखाली गेले तर अनेक
गावांमध्ये पाणी शिरलं.
बीड जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली असून, बिंदुसरा
नदीवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व
उपाययोजना केल्या जात आहेत.
परभणी जिल्ह्यात १९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पूर्णा
तालुक्यात चुडावा गावाला पाण्याचा वेढा पडला असून, इथल्या २५
कुटुंबांना,
तसंच पालम तालुक्यातही नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी
हलवण्यात आलं.
धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, भूम तसंच परंडा
तालुक्यात एकूण साडे तीन हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
**
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार
पाऊस सुरु आहे. जालना जिल्ह्यातही पाऊस सुरु असून, जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये.
तसंच आपत्तीच्या काळात तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असं
आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.
**
सततच्या पावसामुळे विभागातल्या अनेक धरणांमधून मोठ्या
प्रमाणात विसर्ग सुरु आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून ९४ हजार ३२०, विष्णुपुरी
प्रकल्पातून तीन लाख १७ हजार, माजलगाव प्रकल्पातून सुमारे ६० हजार
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. निम्न मानार ६६ हजार, उर्ध्व
मानार २३ हजार,
सिद्धेश्वर २५ हजार, येलदरी २३ हजार, तर
निम्न दुधना धरणातून २१ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात
आला असून, पाच हजार ४४७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत
आहे.
**
दरम्यान, राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यासह
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन
कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना
देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण
झाले असून,
५९ कोटी ७९ लाखांचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. कृषी
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली. चालू महिन्यात
झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करून नुकसानभरपाई देण्यात
येईल, असं भरणे यांनी सांगितलं.
****
पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे
करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी दिलं. काल नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या पूरबाधित
नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी संवाद साधला. परिस्थितीचा आढावा घेत, पवार
यांनी प्रशासनाला तत्काळ मदतीच्या सूचना दिल्या.
****
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी
द्यावी आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधानांनी
पीएम केअर निधीतून मदत जाहीर करावी, वाहून गेलेल्या घराच्या
जागी प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं बांधून द्यावीत अशी मागणीही ठाकरे
यांनी केली.
****
अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव अजित नवले यांनीही, सरकारने
अतिवृष्टीग्रस्त नागरिक आणी शेतकऱ्यांना योग्य मदत करण्याची मागणी केली आहे. ३०
सप्टेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात
कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १२६ वा
भाग असेल.
****
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्याची निर्मिती
केली, ही संकल्पना मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळवून
देण्यात महत्त्वाची ठरल्याचं, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.
तेजस गर्गे यांनी म्हटलं आहे. काल जागतिक पर्यटनदिनी, पर्यटन
संचालनालयाने छत्रपती संभाजीनगर इथं घेतलेल्या 'मिलिटरी
लॅण्डस्केप्स : युनेस्को पर्यंतचा प्रवास आणि आपली जबाबदारी' या
विषयावरच्या व्याख्यानात बोलत ते होते. या अनुषंगानं
विविध मुद्यांवर गर्गे यांनी प्रकाश टाकला.
****
सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर
प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'च्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेच्या
माध्यमातून असंघटित कामगारांसाठी मजबूत केलेल्या सामाजिक सुरक्षेविषयी जाणून घेऊ...
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशाच्या असंघटित क्षेत्रातील
कामगारांच्या गरजांकडे विशेष लक्ष दिलं आहे. असंघटित कामगारांच्या दीर्घकालीन
जोखीम आणि निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आयुष्याचा अभाव या दुहेरी आव्हानांना तोंड
देण्यासाठी मे २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांचे भविष्य कसे असेल हे योजनेचा आरंभ
करताना स्पष्ट केले होते.
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
ही
योजना निवृत्तीसाठी स्वेच्छेनं बचतीस प्रोत्साहन देते. योजनेत सहभागी होण्याचे वय
आणि योगदानाच्या रकमेशी जोडलेले पेन्शन फायदे यातून लाभार्थ्याला मिळतात. असंघटीत
क्षेत्रातील गरीब आणि वंचित कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना देशातील सर्वात
समावेशक आणि सुलभ सामाजिक सुरक्षा उपक्रमांपैकी एक म्हणून उदयास आली आहे.
या
वर्षाच्या सुरुवातीला, अटल पेन्शन योजनेने ८ कोटी सदस्य संख्येचा टप्पा गाठला आहे आणि एकूण ४५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. योजनेत महिलांचा सहभाग मोठा
आहे. अटल पेन्शन योजना ही देशाच्या सामाजिक सुरक्षा परिसंस्थेचा एक आधारस्तंभ
म्हणून उदयास आली आहे.
****
धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या
मागणीसाठी जालना इथं ११ दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले दीपक बोऱ्हाडे यांची
काल पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली.
बोराडे यांनी उपोषण सोडून शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत
चर्चा करण्यासाठी मुंबईला यावं, असं आवाहन या नेत्यांनी केलं.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री
सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानच्या वतीने विविध
प्रकारचं मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, शारदीय नवरात्र महोत्सवात श्री
तुळजाभवानी देवीची काल मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.
****
दक्षिण कोरियातल्या ग्वांगझू इथं सुरु असलेल्या जागतिक पॅरा
तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या शीतल देवीने सुवर्ण पदक पटकावलं. हातांशिवाय तिरंदाजी
करणारी शितल ही विश्वविजेतेपद पटकावणारी पहिलीच महिला धनुर्धारी ठरली आहे. या
स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण पदकांसह सात पदकांची कमाई केली.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज
भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. दुबई इथं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलावर सायंकाळी
आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला काल शोभायात्रेने प्रारंभ करण्यात आला.
अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं, पुढचे
तीन दिवस विद्यापीठ परिसरात हा जल्लोष सुरू राहणार आहे.
****
No comments:
Post a Comment