Monday, 29 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अतिवृष्टीमुळे राज्यात ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित-आपदग्रस्तांच्या मदतीसाठी शासन तत्पर-मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

·      अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी

·      जिल्हा नियोजनचा १० टक्के निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यास सरकारची मंजुरी

आणि

·      राज्यशासनाच्या अभिनव धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल-उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन

****

अतिवृष्टीमुळे राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले असून, जालना तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी आठ हजारांहून अधिक तर धाराशिवमध्ये सुमारे चार हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या २४ तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात अहिल्यानगरमधल्या दोन आणि नांदेडमधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची १८ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची सहा पथकं पूरग्रस्त भागात तैनात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापूर, अमरावती, रायगड तसंच नाशिक जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यातल्या धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. येलदरी धरणातून ३२ हजार घनफूट, सिद्धेश्वर ३१ हजार, माजलगाव २२ हजार, इसापूर साडे आठ हजार, तर जायकवाडी धरणातून दोन लाख सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी शासन तत्पर असून प्रशासन चोवीस तास सतर्क असल्याचं जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. आज नाशिक इथं पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या.

****

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरसकट मदत करावी आदी मागण्याही वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.

****

जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीपैकी १० टक्के निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं आज जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

दीनदयाल सेवा प्रतिष्ठाननं कमी खर्चातील नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग करून दीनदयालजींच्या स्वप्नातील शेतीचं मॉडेल तयार केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी काढले आहेत. ते आज यवतमाळ इथं दीनदयाल जयंती समारोहात बोलत होते.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज गोंदिया इथं पत्रकारांशी बोलत होते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं पटेल यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - खासदार प्रफुल्ल पटेल

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी आल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मंडळाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार होती. बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

****

प्रलयंकारी किल्लारी भूकंपाला उद्या ३२ वर्ष होत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवीत आणि वित्त हानी झाली. २९ सप्टेंबरला गणेश विसर्जनानंतर रात्री झोपलेले हजारो लोक या भूकंपात मारले गेले तर अनेक लोक कायमस्वरूपी जायबंदी झाले.

****

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्यशासन राबवत असलेल्या अभिनव धोरणांमुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूकीत अव्वल असल्याचं प्रतिपादन, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा इथल्या ऑरिक सिटी या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीचा सहावा र्धापन दिन तसंच समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचे लोकार्पण सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर इथे गुंतवणूकीस उद्योग जगताची पसंती आहे. त्यासाठी इथले उद्योग तसंच संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचं, सामंत यांनी सांगितलं. सामंत यांच्या हस्ते यावेळी ऑरिक सिटीचं बोधचिन्ह, संकेतस्थळ तसंच पोर्टलचं अनावरण तसंच ऑरिक सिटीच्या सहा वर्षाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं.

ऑरिक सिटीत जपान, दक्षिण कोरीया, अमेरिका, रशिया आदी देशातील कंपन्यानी ८५ हजार ९८५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यातून ५० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.

****

खेळाडूंच्या हिताचा विचार करून सर्वसमावेशक क्रीडा धोरण तयार करण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. ते आज नाशिक इथं महाराष्ट्र २०४७ युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमात बोलत होते. क्रीडा विभागाच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, असंही कोकाटे यांनी सांगितलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा आज समारोप झाला. महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयानं जिंकलं. प्रख्यात अभिनेते वैभव मांगले, यांच्या हस्ते या संघाला चषक प्रदान करण्यात आला.

****

सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'च्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात समुद्रयान प्रकल्पाविषयी जाणून घेऊ...

समुद्रयान प्रकल्प’, हा भारताची पहिली मानवी समुद्र मोहीम आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या या डीप ओशन मिशननं भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक क्षमतांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला. महासागरातली संपत्ती आणि नि अर्थव्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करून, भारतानंमात्स्य 6000’ हे मानववाहक जलवाहन फ्रान्सच्या सहकार्यानं तयार केलं. या जलवाहनात तीन अॅक्वॉनॉट्सअर्थात समुद्र संशोधक सहा हजार मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतात. कमांडर जतिंदर पाल सिंग आणि राजू रमेश यांनी या माध्यमातून पाच हजार मीटर खोल समुद्रात जाऊन यशस्वीपणे ही मोहिम पार पाडली.

स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी National Deep Water Exploration Mission ची घोषणा केली, जी समुद्रातील तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधण्यावर लक्ष केंद्रित करेल.

त्यांनी या उपक्रमालासमुद्र-मंथनअसं संबोधलं. ही मोहीम मिशन मोडमध्ये राबवली जाईल, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

देश को विकसित बनाने के लिये हम अब समुद्रमंथन की तरफ भी जा रहे है। हमारे समुद्र के मंथन को आगे बढाते हुये हम समुद्र के भीतर के तेल के भंडार, गॅस के भंडार उसको खोजने की दिशा मे एक मिशन मोडपर काम करना चाहते है। और इसलिये भारत ने National Deep Water Exploration Mission शुरू करने जा रहा है। देश ऊर्जा इंडीपेन्डन्ट बनने के लिये ये हमारी महत्वपूर्ण घोषणा है।

 

भारताने खोल समुद्र तंत्रज्ञान, संशोधन वाहनं आणि दाब सहन करणारे स्वदेशी साहित्य विकसित करण्यामध्येही लक्षणीय प्रगती केली असून, यशस्वी चाचण्या सुरू आहेत.

खोल समुद्राच्या या धाडसी प्रवासाद्वारे भारत खनिज, जैवविविधता आणि ऊर्जा स्रोतांचे प्रचंड भांडार उभं करत असून, आधुनिक खोल समुद्र संशोधन तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये आपलं स्थान मजबूत करत आहे.

समुद्रयान म्हणजे, भारताचा महासागरातला आत्मनिर्भरतेचा आणि वैज्ञानिक कौशल्याचा पुढचा टप्पा आहे, असं निश्चितच म्हणता येईल.

****

 शारदीय नवरात्र महोत्सवात आज तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून या ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक उत्साहाने सहभागी होत आहेत.

****

हिंगोली तालुक्यात कनेरगाव नाका ते येलदरी महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, आदी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार अनिल सरोदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन स्वीकारलं.

****

No comments: