Saturday, 27 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पूरग्रस्तांना भरीव मदतीसाठी केंद्रशासन सकारात्मक-मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांना निवेदन सादर

·      लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे पंचनाम्यांना विलंब-माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं मत

·      हवामान विभागाकडून आज राज्यात अतिवृष्टीचा इशारा-नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शाळांना सुटी

·      राज्यातल्या पाच रतन टाटा स्कील सेंटरपैकी एक केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारणार

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय

****

राज्यातल्या पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी केंद्रशासन सकारात्मक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पंतप्रधानांना माहिती देऊन, भरीव मदतीसाठी एक निवेदन सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात उभारले जाणारे छत्रपती संभातजीनगर-अहिल्यानगर-पुणे यासह तीन संरक्षण कॉरिडॉर, तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने राज्यसरकार करत असलेले उपाय आदींबाबत पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

देशभरात सुमारे ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा उभारत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्याचं उद्घाटन करतील. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल ही माहिती दिली. ही यंत्रणा नंतर फाईव्ह-जीमध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात, मंत्री तसंच लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे विलंब होत असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. अशा दौऱ्यामुळे, नुकसानाचे पंचनामे तसंच आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी सरकारी यंत्रणेचं लक्ष राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे अधिक असतं, त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका संभावतो, असं पवार यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या समितीने काल जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यावर ही मागणी केली, आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

****

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याच्या अनेक भागात भेट देऊन, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. सर्व पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

****

परभणीच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी काल परभणी जिल्ह्यात तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

**

पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे अचूक पंचनामे करण्यासाठी त्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. ते काल लातूर इथं आढावा बैठकीत बोलत होते. वीज पुरवठा यंत्रणेचं तातडीने सर्वेक्षण करून मिशन मोडवर दुरुस्तीची सूचना कदम यांनी केली.

****

धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी काल परंडा तालुक्यात नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. वडनेर गावात पुरबाधितांना तात्पुरत्या मदतीचे धनादेश, रुई इथं अन्नधान्य संचाचं वाटप, तसंच तुळजाभवानी मंदिराकडून प्राप्त साड्यांचं वागेगव्हाण इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं.

जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारतीच्या वतीनंही आवश्यक साहित्याचं वितरण केलं जात आहे.

****

राज्यभरात आज सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासकीय यंत्रणेनं केलं आहे.

नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांना आज सुटी देण्यात आली आहे. अंगणवाडीसह आश्रमशाळा, महाविद्यालयं, खाजगी शिकवणी प्रशिक्षण केंद्र अशा सर्वच शैक्षणिक आस्थापनांचाही यात समावेश आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यात काल एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. सावळेश्वर इथं काल सायंकाळी ही घटना घडली.

****

२८ सप्टेंबर रोजीची नियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. यासंदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्त विशेष मालिकेच्या आजच्या भागात, सरकारने देशभरातून चोरीला गेलेल्या दुर्मिळ मूर्ती आणि पुरातन वस्तू, जगभरातून परत आणत, पुनरुज्जीवीत केलेल्या सांस्कृतिक अभिमानाविषयी, जाणून घेऊया.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा सांस्कृतिक प्रवास चैतन्यदायी, परंपरेची मुळं जपणारा तसंच जगासाठी देशाची दारं खुला करणारा आहे. देशातून चोरीला गेलेल्या मूर्ती आणि पवित्र अवशेष परत आणण्यापासून ते दीर्घकाळापासून हरवलेल्या मौल्यवान पुरातन वस्तू परत आणण्यापर्यंत सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची ही कहाणी.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशभरातून चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी २०१४ पासून आतपर्यंत ६४२ पुरातन  वस्तू सापडले आहेत. आणि त्या परत आणण्याच्या विविध टप्प्यांवर आहेत, त्या २०१३ पूर्वी फक्त १३ होत्या.

या वर्षी परत मिळवलेल्या सर्वात प्रसिद्ध वस्तूंपैकी एक म्हणजे भगवान बुद्धांचे पिप्रहवा अवशेष. इतर पुरातन वस्तू ज्या परत मिळाल्या आहेत त्यात युकेमधील ब्रह्मा आणि ब्राह्मणीचे दगडी शिल्प, अमेरिकेतील दुर्गेची दगडी प्रतिमा, अमेरिकेतील नृत्याच्या स्थितीत नटराजाची प्रतिमा यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांदरम्यान अशा काही वस्तू त्यांना परत करण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, वारसा हा केवळ इतिहास नव्हे, तर तो मानवतेची सामायिक जाण आहे.’’

****

राज्यातल्या पाच रतन टाटा स्कील सेंटरपैकी एक केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या केंद्राची जागा निश्चित झाल्यावर केंद्राची उभारणी जलद करण्यात येईल, असं सामंत यांनी सांगितलं.

औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यामुळ निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामंत यांनी यावेळी आढावा घेतला.

****

राज्यात शासकीय तंत्रनिकेतन संस्था- आयटीआयमध्ये १०० हून अधिक विषयांवरील रोजगाराभिमुख अल्पकालीन अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोढा यांनी शहरातल्या तंत्रनिकेतन संस्थांना भेटी देऊन आढावा घेतला.

दरम्यान, जालना इथं आयटीआयमध्ये स्थापन करण्यात आलेल्या मॅजिक इन्क्युबेशन सेंटरचं उदघाटनही काल लोढा यांच्या हस्ते झालं.

****

अशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सुपर फोर गटातील अखेरच्या रोमहर्षक सामन्यात भारताने श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. भारताने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाची श्रीलंकेनं शेवटच्या चेंडुवर बरोबरी साधली. त्यानंतर, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचे दोन्ही फलंदाज भारताच्या अर्शदीप सिंगने अवघ्या दोन धावांवर बाद केले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर तीन धावा घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान दरम्यान अंतिम लढत रंगणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव आजपासून सुरु होत आहे. आज सकाळी शोभायात्रेनं महोत्सवाला प्रारंभ होईल. २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात सुमारे एक हजारावर कलावंत विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

****

तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सवातील काल रथ अलंकार महापूजा करण्यात आली. तर कोल्हापूर इथं अंबाबाईची महाविद्या श्रीभुवनेश्वरी रुपात पुजा बांधण्यात आली.

****

जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नू यांनी पाच ग्रामसेवकांना निलंबित केलं. घनसावंगी तालुक्यातल्या या सर्वांनी २५ कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.

****

विभागातल्या अनेक धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून विषणूपुरी प्रकल्पातून एक लाख घनफूट तर जायकवाडी धरणातून ३७ हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग होत आहे.

****

No comments: