Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
बीएसएनएलनं संपुर्णत: स्वदेशी फोर जी तंत्रज्ञान विकसित
करुन ऐतिहासिक कामगिरी केली, याचा लाभ भारतभरात सर्वदूर मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे.
भारत संचार निगम लिमिटेड-बीएसएनएलच्या स्वदेशी फोर-जी नेटवर्क यंत्रणेचं लोकार्पण आज, पंतप्रधान मोदी ओडिशातील झारसूगुडा इथून केलं. पंतप्रधानांच्या
हस्ते साठ हजार कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन याप्रसंगी करण्यात आलं, यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी संबोधित केलं. त्याआधी
ते झारसुगुडा या उद्योगनगरीत एका रोड शो मध्ये सहभागी झाले.
****
पाकिस्ताननं भारताशी अलिकडे झालेल्या संघर्षाच्या तथ्यांचा
विपर्यास केल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या सचिव पेटल गेहलोत
यांनी म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या सत्रात आज सकाळी
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं भाषण झालं. यावर प्रत्युत्तर देताना त्या बोलत
होत्या. पुन्हा एकदा शरीफ यांनी, निरर्थक नाटकीय विचार मांडून पाकिस्तानची दहशतवाद पुरस्कृत परराष्ट्र
निती दर्शवल्याचं गेहलोत यांनी म्हटलं. भारतातील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार
असल्याचं त्या म्हणाल्या. ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतानं पाकिस्तानात ज्या दहशतवाद्यांविरुद्ध
करवाई केली त्यांना पाकिस्तानी वरीष्ठ सैन्य आणि प्रशासकीय अधिकारी सन्मानीत केलं असं
त्या म्हणाल्या. भारतासोबत शांततेची अपेक्षा करणाऱ्या पाकिस्ताननं तातडीनं सर्व दहशतवादी
केंद्र बंद करत हवे असलेले दहशतवादी भारताला सोपवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं उद्घाटन आज सकाळी मराठी अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते झालं.
त्याआधी विद्यापीठातून शोभायात्रा काढण्यात आली. २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात
चार जिल्ह्यातील २६२ संघांचे सुमारे एक हजारांवर
विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर ढगफुटी सदृश्य पाऊस
झाला असून आज सकाळपासून संततधार पाऊस सुरूच असल्यानं जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं
आहे. पूर परिस्थिती गंभीर झाल्यानं हिंगोली जिल्ह्यातसुद्धा शाळांना आज सुट्टी जाहीर
करण्यात आली.
****
जिल्ह्यात कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं मोठा पूर
आला असून वसमत तालुक्यात कुरुंदा आणि किनोळा गावातही पुराचं पाणी घुसलं आहे. वसमत
- चुडावा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं लहान, लोन, रेणकापूर, चुडावा हा मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला असून अनेक गावांचा
संपर्क तुटला आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगावमध्ये पुराचं पाणी घुसलं असून त्यातच
तीन जनावरं दगावल्याचं वृत्त आहे. डोंगरकडा. जवळा पांचाळ परिसरातही पूरसदृश्य परिस्थिती
आहे. कळमनुरी ते पुसद जाणाऱ्या मार्गावरील शेंबाळपिपरी इथं पैनगंगा नदीला पूर आल्यानं
पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळं पुसद - कळमनुरी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
तालुक्यातील डिग्रस, कोंढुर इथं जोरदार पाऊस
झाल्यानं गावात जाणारा मुख्य रस्ता तुटला असून वसफळ मार्गही बंद झाला तर आसना, जलेश्वर नदीलाही पूर आल्यानं अनेक गावातं पुराचं पाणी
शिरलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मंडळात आज दुपारपर्यंत मुसळधार
पाऊस पडला असून ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
****
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात धाराशिव जिल्ह्यातल्या
आळणी इथं आरोग्य शिबिरात ३७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. येत्या २९ तारखेला येडशी
इथंही शिबीर होणार असून जास्ती जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आरोग्य सहाय्यक सुरेश गंगावणे यांनी केलं आहे.
****
१२ व्या दीव्यांगासाठीच्या जागतिक ॲथलेटीक्स विजेतेपद
स्पर्धेला आज नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानावर प्रारंभ होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या
या स्पर्धेत पुरुष-महिला आणि मिश्र गटात मिळून विविध स्पर्धांचा समावेश आहे.
****
सध्या सण, उत्सवाचा काळ असून बाजारात येणारे खाद्यपदार्थ, मिठाईमध्ये कृत्रिम रंग, भेसळयुक्त साखर आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यतेलाचा होणारा वापर
या पार्श्वभुमीवर भंडाऱ्यातील अन्न आणि औषध प्रशासनानं खाद्यपदार्थांच्या दुकानांसह
संबंधित प्रतिष्ठाणांची तपासणी सुरु केली आहे. आतापर्यंत १६ दुकानांतील अन्न पदार्थांचे
नमुने तपासणीला प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या दुकानांतील मिठाई किंवा खाद्य तेलात भेसळ
आढळून आल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अन्न आणि औषधी
प्रशासनानं दिला आहे. बाजारात उपलब्ध अतिशय रंगीत, अत्यल्प किमतीत मिळणारी मिठाईची खरेदी टाळून चांगल्या दर्जाचं
तेल आणि पदार्थ खरेदी करावे असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment