Friday, 26 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

भारतीय हवाई दलात सहा दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या मिग - 21 विमानाला आज चंदीगढ इथं निरोप देण्यात आला. यानिमित्तानं आयोजित समारंभात साठ वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा करणाऱ्या या विमानाच्या एका युगाचा अंत झाला. हे विमान १९६० च्या दशकात हवाई दलात समाविष्ट करण्यात आलं होतं. भारतीय हवाई दलाच्या पराक्रमातील एका ऐतिहासिक अध्यायाचा शेवट म्हणून मिग-21 विमानाला निरोप देण्यासाठी एक औपचारिक उड्डाण पर्व आयोजित करण्यात आलं होतं. दिलबाग सिंग यांनी चंदीगडमध्ये पहिल्या मिग-21 स्क्वाड्रनचं नेतृत्व केलं होतं, १९८१ मध्ये ते हवाई दलाचे प्रमुख झाले.

****

संरक्षण मंत्रालय हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कडून Mk1A प्रकारची ९७ विमानं खरेदी करणार आहे. त्यासाठी ६२ हजार कोटी रूपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून, २०२७ -२८ या वर्षात ही विमानं हवाई दलात दाखल व्हायला सुरुवात होईल. पुढच्या ६ वर्षात सर्व विमानं हवाई दलाच्या ताब्यात येतील. या विमानांमधे ६४ टक्के घटक स्वदेशनिर्मित असतील. याखेरीज उत्तम रडार, स्वयम् रक्षाकवच, आणि इतर अद्ययावत यंत्रसामुग्री आणि उपकरणांमुळे आत्मनिर्भरतेच्या अभियानाला चालना मिळणार आहे. सुमारे १०५ भारतीय कंपन्या यात थेट सहभागी असतील आणि दरवर्षी ११ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्यातून मिळेल.

****

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल चार राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन हजार ४५८ मेगावॅट क्षमतेच्या ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवादही साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात सौर उर्जेवर चालणारे कृषीपंप बसवण्यात राज्याचा प्रथम क्रमांक असल्याचं यावेळी सांगितलं.

****

पुढील २५ वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग बनू शकतील अशा उदयोन्मुख क्षेत्रांना मेक इन इंडिया उपक्रमात मुख्य प्राधान्य दिलं जाईल, असं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काल सांगितलं. ते मुंबईत एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. भक्कम आर्थिक कामगिरी आणि राजकीय स्थिरता या आधारे दीर्घकालीन सुधारणांवर भर दिला जात आहे असं शहा म्हणाले.

****

नोकऱ्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त काल नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं, सारथीमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला आर्थिक सहाय्य, मराठा तरुणांना उद्योगासाठी आर्थिक मदत इत्यादी कामांची माहिती त्यांनी दिली. माथाडी कामगारांची चळवळ मजबूत करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

****

ऊसतोड कामगार महिला आणि त्यांच्या मुलांच्या विविध समस्यांचं निराकरण करत, त्यांच्या कल्याणासाठी छत्रपती संभाजीनगर विभागात जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. कामगार महिलांची गर्भपिशवी काढणं, बालविवाह, गर्भलिंगनिदान चाचणी, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार अशा विषयांचा आढावा घेतल्यानंतर त्याचं निराकरण करण्यासाठी विभागीय आणि प्रत्येक जिल्ह्यातही समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले होते. ऊसतोड कामगार महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढत त्यांना मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवणं, कामगार कायद्यानुसार त्यांच्या कामाच्या वेळा तसंच वेतन याची अंमलबजावणी करणं, कामगार कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी कंत्राटदारांना अवगत करणं, बालविवाह होऊ नये यासाठी पथकांमार्फत तपासणी आणि जनजागृती करणं, आदी कामं ही समिती करणार आहे.

****

स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं १५ विशेष शिबीरं आतापर्यंत घेण्यात आली. यामध्ये तीन हजाराहून अधिक महिलांसह एकूण पाच हजारावर नागरिकांची तपासणी करण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यातल्या चाकूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नंदकुमार पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

****

आयएसएसफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत काल महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली. अनुष्का ठोकूर हिने सुवर्ण, अंशिकाला रौप्य तर आद्या अग्रवालने कास्य पदक जिंकलं. पुरुषांच्या स्पर्धेत भारताच्या दीपेंद्र सिंग शेखावत याने रौप्य पदक तर रोहित कन्यान याने कांस्य पदक जिंकलं.

****

No comments: