Friday, 26 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      पूरग्रस्तांना भरीव मदतीसाठी केंद्रशासन सकारात्मक-मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांना निवेदन सादर

·      लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे पंचनाम्यांना विलंब-माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं मत

·      देशभरात उभारलेल्या बीएसएनएल फोर जी यंत्रणेचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

·      राज्यातल्या पाच रतन टाटा स्कील सेंटरपैकी एक केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारणार

आणि

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला उद्या प्रारंभ

****

राज्यातल्या पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी केंद्रशासन सकारात्मक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नवीदिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पंतप्रधानांना माहिती देऊन, भरीव मदतीसाठी एक निवेदन सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर इथल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचं हस्तांतरण तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने राज्यसरकार करत असलेले उपाय इत्यादींबाबत पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात, मंत्री तसंच लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे विलंब होत असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. अशा दौऱ्यांमुळे, नुकसानाचे पंचनामे तसंच आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी सरकारी यंत्रणेचं लक्ष राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे अधिक असतं, त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका संभावतो, असं पवार यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. किल्लारी भूकंपासह इतर आपत्तीच्यावेळी आपण असे दौरे थांबवल्याची आठवणही पवार यांनी करून दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या समितीने आज जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यावर ही मागणी केली, आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अनेक भागात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. आमदार विलास भुमरे यावेळी उपस्थित होते. सर्व पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. जालना जिल्ह्यातही नुकसानग्रस्त भागाची सामंत यांनी पाहणी केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे अचूक पंचनामे करण्यासाठी त्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. ते आज लातूर इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. वीज पुरवठा यंत्रणेचं तातडीने सर्वेक्षण करून मिशन मोडवर दुरुस्तीची सूचना कदम यांनी केली.

****

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त परंडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारतीच्या वतीने अन्न तसंच वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहेत. पूरग्रस्तांना या टप्प्यात किराणा आणि औषधांचे संच देण्यात आले, पुढच्या टप्प्यात आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी वस्तू, तसंच कपडे वाटप करण्यात येणार आहे.

****

दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज ही माहिती दिली. यासाठी ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपल्ब्ध करुन देण्यात आला आहे.

****

देशभरात सुमारे ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा उभारत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्याचं उद्घाटन करतील. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज ही माहिती दिली. ही यंत्रणा नंतर फाईव्ह-जीमध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. देशात १०० टक्के फोरजी सॅच्युरेशन नेटवर्कचं अनावरण देखील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या नेटवर्कच्या माध्यमातून ३० हजार गावं जोडली गेली आहेत.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून देशात केलेल्या परिवर्तनाविषयी जाणून घेऊ.

ब्रॉडबँडची पोहोच आणि अत्याधुनिक मोबाइल नेटवर्कच्या गतीनं देशात परिवर्तन घडून येत आहे. याच्या गाभ्याशी भारतनेट ही योजना आहे. या योजनेतून कोटी १८ लाखांहून अधिक ग्रामपंचायतींपर्यंत डिजिटल महामार्गाचं जाळं विणण्यात येत आहे. सुमारे ७ लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलने जोडलेल्या या डिजिटल लाईफलाईनने अतिशय दुर्गम भागात ई-गव्हर्नन्स, शिक्षण आणि लघु उद्योगांसाठी दरवाजे खुली केली आहेत.

 

साथीयों, भारत के गावों में इंटरनेट का उपयोग करनेवालों की संख्या कभी शहरी लोगों से ज्यादा हो जायेगी, ये कुछ साल पहले तक, सोचना भी मुश्किल था। गांवों की महिलायें, किसान, गावों के युवा भी, कितनी आसानी से इंटरनेट का इस्तेमाल करेंगे, इस पर बहोत लोग सवाल उठाते थे। लेकिन अब ये सारी स्थितीयां बदल चुकी है।

 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात, देशात मोबाइल डेटासाठी जगातील सर्वात स्वस्त डेटा पुरवठा करणाऱ्या देशांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. २०१४ च्या तुलनेत इंटरनेट डेटाच्या दरात सुमारे ९७ टक्क्यांनी घट झाली आहे.

 

5G कनेक्टिव्हिटी सुरु झाली आहे. यामुळे आरोग्यसेवा, शेतकऱ्यांना पीक सल्ला आणि दुर्गम भागातील बाजारपेठांमध्येही व्यवहार सुलभ झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकार देशातील इंटरनेट क्रांतीतून डिजिटल भारताचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

****

राज्यातल्या पाच रतन टाटा स्कील सेंटरपैकी एक केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या केंद्राची जागा निश्चित झाल्यावर केंद्राची उभारणी जलद करण्यात येईल, असं सामंत यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - उद्योगमंत्री उदय सामंत

औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामंत यांनी यावेळी आढावा घेतला.

****

राज्यात शासकीय तंत्रनिकेतन संस्था-आयटीआयमध्ये १०० हून अधिक विषयांवरील रोजगाराभिमुख अल्पकालीन अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष अभ्यासक्रमाद्वारे महिला उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचं, लोढा यांनी सांगितलं. लोढा यांनी शहरातल्या तंत्रनिकेतन संस्थांना भेटी देऊन आढावा घेतला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव उद्यापासून सुरु होत आहे. उद्या सकाळी विद्यापीठातील नाट्यगृहात प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल. २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यातून २५२ संघाचे एक हजारांवर कलावंत सहभागी होणार आहेत.

****

तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सवातील आज रथ अलंकार महापूजा करण्यात आली. सूर्यनारायणाने त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिल्याची आख्यायिका आहे, त्यानुसार ही पूजा बांधली जाते.

****

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात धाराशिव जिल्ह्यात आळणी इथं आरोग्य शिबीरात ३७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. येत्या २९ तारखेला येडशी इथं शिबीर होणार असून जास्ती जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य सहाय्यक सुरेश गंगावणे यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नू यांनी पाच ग्रामसेवकांना निलंबित केलं. घनसावंगी तालुक्यातल्या या सर्वांनी २५ कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.

****

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा इथल्या एका शेतकऱ्यानं अतिवृष्टीमुळे खराब झालेली केळीची बाग कापून फेकली. शासनाने फळबागांना नुकसान भरपाई देण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: