Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर
प्रदेश आणि राजस्थानच्या दौर्यावर आहेत. ग्रेटर नॉयडामध्ये, उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा-2025 चं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात राज्याच्या
विविध हस्तकला परंपरा, आधुनिक उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र येत
आहेत.
त्यानंतर पंतप्रधान राजस्थान
मध्ये एक लाख २२ हजार १०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन
करणार आहेत. १९ हजार २१० कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा प्रकल्पांचं उद्घाटन आणि
फलोदी, जैसलमेर, जालोर आणि सीकर इथं सौर प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
वैज्ञानिक तसंच औद्योगिक संशोधन
क्षेत्राशी संबंधित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. सुमारे दोन हजार
२७७ कोटी रुपयांची ही योजना, संशोधन क्षेत्रात
कार्यासाठी शास्त्रज्ञ तसंच विद्यार्थ्यांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव
यांनी व्यक्त केला. ते काल दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयाची वार्ताहरांना माहिती
देत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस देण्याला, तसंच जहाज बांधणी क्षेत्रासाठी सुमारे ६९ हजार कोटी रुपयांहून
अधिकच्या एका विशेष पॅकेजला मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली.
****
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या
प्रमाणात नुकसान झालं असून, अनेक ठिकाणी मंत्र्यांकडून पाहणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात नुकसानीची पाहणी
करुन सरसकट मदतीचं आश्वासन दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
बीड जिल्ह्यात मौजे पिंपळगाव घाटपासून पूरग्रस्त दौऱ्याची पाहणी केली. पूरामुळे शेतकरी
बांधव आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम तसंच गावात झालेलं नुकसान प्रत्यक्ष
पाहिलं, गावकऱ्यांना धीर दिला, त्यांचं मनोबल वाढवलं. पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
**
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे
यांनी हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव आणि अंबाळा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
**
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
****
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या
आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा खंडित होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने
सज्ज राहण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी
दिल्या आहेत. मुंबईत यासंदर्भात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि लातूर परिमंडळासह, राज्यातल्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. रुग्णांना
सर्व प्रकारची सेवा देण्यासासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी चोवीस तास उपलब्ध राहावं, तसंच पूरस्थितीच्या काळात जलजन्य आजारावर प्रतिबंध करण्याची
तयारी ठेवावी, अशा सूचनाही आबिटकर यांनी केल्या.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं
मोठं नुकसान झालं असून, सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार
रुपये मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार
यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा हा केवळ दिखावा असल्याची टीका त्यांनी
केली. शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे, यासाठी सहा महिन्याचा आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार असल्याचं वडेट्टीवार
यांनी सांगितलं.
****
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय
जनता पक्षाचे आमदार-खासदार एका महिन्याचं संपूर्ण वेतन
देणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली. शिवसेना तसंच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री तसंच आमदारांनीही आपलं एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री
निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
****
छत्तीसगडच्या दंतेवाडा इथं ७१
नक्षलवाद्यांनी काल आत्मसर्पण केलं. यापैकी ३० नक्षलवाद्यांवर एकूण ६४ लाख रुपये बक्षीस
जाहीर होतं.
गडचिरोली जिल्ह्यातही सहा जहाल
नक्षलवादी काल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर शरण आले. यात तीन महिला आणि
तीन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांवर ६२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्यांच्या
पुनर्वसनासाठी ५२ लाख रुपये सरकार देणार आहे.
****
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ स्पर्धेत सांगलीच्या तिरंगा मंडळानं पहिला क्रमांक पटकावला असून, लातूरच्या वसुंधरा वृक्षारोपी मंडळानं दुसरा तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या
सुवर्णयोग तरुण मंडळानं तिसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील विजेत्या
मंडळांची घोषणाही काल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर
यांनी केली. प्रथम क्रमांक विजेत्या मंडळांना आज मुंबईत पारितोषिकं देण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment