Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 26 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्याला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून आर्थिक मदत
देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी
·
मंत्र्यांचे मराठवाड्यात पीक नुकसान पाहणी दौरे, छत्रपती संभाजीनगर
इथल्या औद्योगिक क्षेत्रातील नुकसानीचा उद्योगमंत्र्यांकडून आढावा
·
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत कर्जमाफी जाहीर
करावी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
आणि
·
राज्यात आज खान्देशातले जिल्हे वगळता सर्वत्र पावसाचा
यलो अलर्ट, तर नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना
उद्या ऑरेंज अलर्ट
****
राज्यात
झालेली अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत राष्ट्रीय आपत्ती निवारण
निधीमधून आर्थिक मदत देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे
केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
शहा यांना काल निवेदन दिलं. यावेळी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची सविस्तर
माहिती शहा यांना देण्यात आली.
****
राज्य मंत्रिमंडळातल्या
सदस्यांनी काल मराठवाड्यात ठिकठिकाणचे दौरे करून पूरपरिस्थिती तसंच नुकसानाची पाहणी
केली.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी काल बीड जिल्ह्यात पिंपळगाव घाट, खोकरमोहा आदी गावांना
भेट देऊन पाहणी केली. बीड तालुक्यात पिंपळवाडी इथं पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आदित्य
कळसाने याच्या कुटुंबीयांना पवार यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द
करण्यात आला.
दरम्यान, वडवणी तालुक्यात
कुंडलिका नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अक्षय जाधव या तरुणाचा मृतदेह काल तब्बल ३६
तासानंतर सापडला. दुकडेगाव इथल्या बंधार्याजवळ हा मृतदेह सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
**
मृद आणि
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्यात हदगाव, अर्धापूर,
नांदेड, लोहा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर
प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानीची जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळून देणार
असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
**
केंद्रीय
राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धाराशिव जिल्ह्यात, शालेय शिक्षणमंत्री
दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव आणि अंबाळा इथं, मदत
आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी परभणी जिल्ह्यातल्या धानोरा काळे आणि धारासुर
इथं तर राज्यमंत्री योगेश कदम यांनी लातूर जिल्ह्यात रेणापूर तसंच लातूर तालुक्यात
पूरग्रस्त भागाची पाहणी करून आपदग्रस्तांना दिलासा दिला.
**
छत्रपती
संभाजीनगर इथं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टीमुळे औद्योगिक क्षेत्रात आणि
संलग्न भागात पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. औद्योगिक वसाहतीच्या संलग्न
भागात गावात, शेतात पाणी शिरल्याचे प्रकार घडले, ते भविष्यात
घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
**
अतिवृष्टीबाधित
शेतकऱ्यांना कालबद्ध मदत जाहीर करून, दिवाळीच्या आत कर्जमाफी जाहीर करावी अशी
मागणी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते काल बीड
जिल्ह्यात मांजरसुंभा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी काल मराठवाड्यात
लातूर, धाराशिव, बीड, जालना, तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीबाधित
गावांची पाहणी केली. सरकारकडून ज्या पद्धतीने मदत मिळेल ती स्वीकारा, वाढीव मदत मिळवून देण्याची मागणी आपण लावून धरू असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना
दिला.
काँग्रेसचे
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल छत्रपती संभाजीनगरमधल्या कोळीबोडखा
इथं नुकसानाची पाहणी केली.
****
धाराशिव
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून दर काही दिवसांनी उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर अचानकपणे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातली ३६३ गावं
बाधित झाली असून, दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टर क्षेत्रावरील शेती पाण्याखाली गेली
आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
या आपत्तीमध्ये 1044 घरांची
पडझड झाली असून 201 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत, तसंच 15 तलाव फुटले, 12 रस्ते आणि
तीन फुलांचे नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विविध ठिकाणी अडकून
पडलेल्या 498 नागरिकांची सुटका केली आहे. बाधित क्षेत्रांचे पंचनामे
युद्ध पातळीवर सुरू आहेत, पंचनाम्यानंतर शासनाकडे पाठवण्यात येणार
आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार यांनी दिली
आहे.
आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट मदत करण्याची घोषणा केली असून शेती आणि
घरांचं नुकसान झालेले धाराशिव जिल्ह्यातील अनेक नागरिक आता या मदतीची आतुरतेने वाट
पाहत आहेत.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे केले जावे त्यासाठी ड्रोन, मोबाईल फोटो
यांचे पुरावे ग्राह्य धरा, असे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाट
यांनी दिले आहेत. ते काल कन्नड इथं आढावा बैठकीत बोलत होते. पुरामध्ये मरण पावलेले
संजय दळे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदानाचा चार लाख
रुपयांचा धनादेश काल देण्यात आला.
****
नैसर्गिक
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना
द्यावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. पुण्यात
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत, या योजनेसंदर्भात
झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या योजनेअंतर्गत दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची
भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. तर, पाच वर्षात २५ हजार कोटींचा
निधी कृषी योजनांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी एक दिवसाचं वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवलं आहे. राज्यातल्या पूर परिस्थितीचं भान राखून
मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी
कौतुक करुन आभार मानले.
****
‘स्वच्छता ही
सेवा’ या मोहिमेत काल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा
करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व शाळा तसंच खासगी शाळांमध्ये
हा उपक्रम राबवण्यात आला. जवळपास १०० पेक्षा जास्त शाळा तसंच महानगरपालिका क्षेत्रीय
कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. पुष्पनगरी स्मशानभूमी इथं आमदार संजय केणेकर
यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
परभणी जिल्ह्यातल्या
पिंगळी इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित
होत्या.
****
सेवा आणि
सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार
परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या
विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकार ई-शासन परिसंस्थेद्वारे प्रशासनाला एका सलग, पारदर्शी
आणि समावेशक डिजिटल पद्धतीत रुपांतरीत करत असलेल्या प्रयत्नांविषयी जाणून घेऊ...
‘‘सार्वजनिक
सेवांपासून ते आर्थिक सक्षमीकरणापर्यंत, देशाची ई-शासन परिसंस्था
नागरिकांच्या सुविधांची पुनर्परिभाषा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून
सरकार तंत्रज्ञानाधारीत प्रशासन अधिक सुलभ आणि समावेशी करत आहे. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे,
ई-शासन सुलभ, प्रभावी, किफायतशीर
आणि पर्यावरणपूरक आहे.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जन धन, आधार आणि
मोबाइल अर्थात जेएमएम देशाच्या सुविकसित डिजिटल संरचनेचे प्रमुख घटक ठरले. थेट लाभ
हस्तांतरण, सरकारी लाभ, अनुदान आणि देयके
थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जेएएम नेटवर्कचा वापर केलं
जातो. तर, दुसरीकडं ई-केवायसी आधार-आधारित पडताळणी
जलद, कागदविरहित आणि फसवणुकीपासून सुटका करणारी ठरत आहे. सरकारी
ई-मार्केटप्लेस-जीईएमने खरेदीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. यातून लाखो लघु व्यवसायीक,
महिला उद्योजक आणि स्टार्टअप्सना सक्षम केलं जात आहे.
तंत्रज्ञान आता सरकार आणि
नागरिकांमधील सेतू ठरले आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल, समावेशक आणि
पारदर्शकपणे प्रशासन पोहचत आहे.’’
****
शाळेतल्या
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी, व्यावसायिक कौशल्य
शिकवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं शनिवार
बाजार एक स्तुत्य उपक्रम राबवला. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
‘‘दर महिन्याच्या
शेवटच्या शनिवारी विद्यार्थ्यांकडून शाळेत बाजार भरविला जातो. शाळेच्या प्रांगणातील
या बाजारात ग्रामस्थ येऊन आठवडी बाजाराप्रमाणे विद्यार्थ्यांशी घासाघीस करून त्यांनी
थाटलेल्या दुकानातून वस्तूंची खरेदी करतात. यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान
मिळते. तसेच व्यावसायिक कौशल्य विकसित होते. आर्थिक उलाढालीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन
विकसित होतो. यासाठी सुरू केलेला हा 'शनिवार बाजार' विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्य विकासासाठी स्तुत्य उपक्रम ठरला आहे. या उपक्रमाची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिल्यानंतर त्यांना
हा प्रचंड आवडला. हा 'शनिवार बाजार'
आता राज्यभरातील शाळांमध्येही सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.’’
बाईट
- रमेश कदम, पिटीसी, हिंगोली.
****
स्वस्थ
नारी, सशक्त परिवार या अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या
वतीनं येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत ६५ आरोग्य शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी
१५ विशेष शिबीरं आतापर्यंत घेण्यात आली असून, यामध्ये आतापर्यंत
तीन हजाराहून अधिक महिलांसह एकूण पाच हजारावर नागरिकांची तपासणी करण्यात आली.
****
भारतीय
जनता युवा मोर्चाच्या वतीनं हिंगोली इथं काल "नमो युवा रन- नशामुक्त भारत"
मॅरेथॉन घेण्यात आली. युवक-युवतींनी यात मोठ्या उत्साहानं सहभाग घेऊन व्यसनमुक्त भारत
घडवण्याचा संकल्प केला.
****
हवामान
राज्यात
आज खान्देशातले जिल्हे वगळता सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि
धाराशिव जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment