Monday, 29 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या काही भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांमधून विसर्ग सुरु असल्यानं पूर परिस्थिती कायम आहे. गोदावरी, कृष्णा, गिरणा, भिमा यांसह अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. जायकवाडी, हातनूर, गोसीखुर्द, कोयना, उजनी, गंगापूर, गिरणा ही धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात ८४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, सुमारे साडे तीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या सर्व २७ दरवाजातून दोन लाख सात हजार ५०४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

धाराशिव जिल्ह्यातल्या सिना कोळेगाव प्रकल्पातला विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पातून ९५ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज सकाळी पैठण शहरातल्या पुरस्थितीची पाहणी केली. सुरक्षित स्थळी असलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. तसंच प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकच्या पंचवटी भागाची पाहणी केली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी पाहणी केली. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी आश्वस्त केलं.

****

राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसानं झालं आहे, या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आदी मागण्या वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.

****

जागतिक हृदय दिवस आज पाळला जातो. हृदयरोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. स्वित्झर्लंडमधल्या वर्ल्ड हार्ट फेडरेशन या संस्थेने हृदयरोग, उपाय आणि जागतिक पातळीवरचे परिणाम याविषयी जनजागृतीसाठी या उपक्रमाची सुरुवात केली. डोन्ट मिस अ बीट- अर्थात एकही ठोका चुकवू नका- अशी यावर्षीच्या हृदयदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हृदयदिनानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून नियमित व्यायाम आणि संतुलित आहार करून हृदय सुदृढ ठेवण्याचं आवाहन केलं.

****

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज बिहारमधून तीन अमृत भारत रेल्वे सुरु केल्या. दरभंगा - अजमेर, मुजफ्फरपूर - हैदराबाद आणि छपरा - दिल्ली या रेल्वे गाड्यांना त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या मार्गांवर रेलवे सुरू झाल्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

****

देशातल्या दूध उत्पादनात गेल्या दहा वर्षांत ६३ टक्क्यांनी वाढ झाली असून, जागतिक दूध उत्पादनात भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं यासंदर्भातली माहिती दिली. जागतिक स्तरावर दूध उत्पादनात भारताचं जवळपास एक चतुर्थांश इतकं योगदान आहे. दुधाच्या उपलब्धतेत देखील ४८ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

****

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत आकांक्षित कृषी जिल्ह्यांच्या यादीत जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवजिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे दूरस्थ भागात कृषी विकासाला चालना मिळेल आणि कृषी उद्योजक तसंच स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत देशभरातल्या १०० जिल्ह्यांना आकांक्षित कृषी जिल्हा म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.  

****

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर - नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १२ वाजून दहा मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजता नागपूर इथून सुटेल आणि नांदेडला सकाळी ११ वाजता पोहोचेल.

****

कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत दोन दिवसीय आंतरराज्य चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि हैदराबाद इथले तीनशे चित्रकार आणि शिल्पकार सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे पन्हाळगडाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments: