Tuesday, 30 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दुर्गाष्टमी निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्यामुळं केवळ आध्यात्मिक शुद्धीकरण होत नाही तर सर्वांना सत्य, न्याय आणि करुणेनं पुढं जाण्याची प्रेरणा मिळते, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात होणार आहे. दरम्यान, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं यंदाचा ऊस गाळप हंगाम आता २५ ऑक्‍टोबर किंवा १ नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत यंदाच्या गाळप हंगामाचं धोरण निश्चित केलं जाणार आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार १२ ते १३ लाख हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. त्यातून साखर कारखान्यांना गाळपासाठी बाराशे ते साडे बाराशे लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या ४४ जणांची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलानं सुटका केली. पूरग्रस्त भागात बोटीवरील बाह्य इंजिन वापरणे अशक्य असल्याने दोरीच्या सहाय्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

***

नांदेड जिल्ह्यातल्या राहेगाव या गावाला राज्य आपत्ती दलाच्या सहाय्यानं विद्युत आणि आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटला होता. वैद्यकीय पथकानं गावातील १०२ रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथले माऊली प्रतिष्ठन जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेकतकऱ्यांना एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांची मदत देणार आहे. विजयादशमीला काढण्यात येणारी शोभायात्रा तसंच सीमोल्लंघन साध्या पद्धतीने करुन त्यसाठी येणारा खर्च संस्था पूरग्रस्तांना देणार आहे.

****

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा इथला शाही दसरा आणि सीमोल्लंघन सोहळा साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील यास सहमती दर्शवत आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं.

****

नागपूरच्या दीक्षा भूमीवर ६९ व्या धम्मचक प्रवर्तन वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या सुविधांची नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पाहणी करून, प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या.

****

नागपूरमधल्या दीक्षाभूमी पासून सेवाग्राम आश्रमापर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला काल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. संविधान वाचवण्यासाठी आणि भारतीय नागरितत्वाला पाठबळ देण्यासाठी ही सत्याग्रह यात्रा काढण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

****

ॲग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत काढलेले शेतकरी ओळखपत्र आता एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणालीला जोडण्यात येणार आहे. यासाठी राज्यात वर्धा आणि नाशिक जिल्ह्यांत प्रथम हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती नाशिकचे कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली. यामुळं खतांचा काळा बाजार रोखण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा संघर्ष संपवण्यासाठी व्यापक योजनेची घोषणा केली आहे. भारतानं या घोषणेचं स्वागत केलं आहे. पॅलेस्टिन आणि इस्रायली नागरिकांसाठी तसंच पश्चिम आशियाई प्रदेशासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी हा एक व्यवहार्य मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

वस्तू आणि सेवा करातील सुधारीत दरांमुळं खेळणी स्वस्त झाली आहेत. सरकारच्या या निर्णयामुळं ग्राहक आणि उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. तसंच स्वदेशी खेळणी बाजारपेठेला चालना मिळणार आहे. जीएसटीच्या सुधारीत दरांमुळे सायकलही स्वस्त झाली आहे. सायकलवरील जीएसटी १२ टक्क्यांवरुन पाच टक्के करण्यात आला आहे.

****

ज्येष्ठ भाजप नेते विजय कुमार मल्होत्रा यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मल्होत्रा यांनी जनसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि त्यांच्या कार्यामुळं अनेकांचं जीवनमान सुधारलं, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका संघात पहिला सामना होणार आहे. दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल.

****

जायकवाडी प्रकल्पातून सध्या एक लाख 50 हजार 912 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. पाणलोट क्षेत्र आणि नाशिक विभागात सध्या पाऊस नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वरच्या भागातील धरणातून विसर्ग चालू आहे, त्यामुळं धरणात येणारी आवक सरासरी 1 लाख 60 हजार क्युसेक्स आहे. जायकवाडी विसर्गाबाबत नागरिकांनी समाजमाध्यमांवरील माहिती ऐवजी वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.

****

No comments: