Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 29 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नांदेड, लातूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात
पूर परिस्थिती निर्माण केली आहे. काही ठिकाणी सूर्यदर्शनाने थोडा दिलासा मिळाला असला
तरी अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. जालना जिल्ह्यात आठ हजार ४९९ लोकांना जिल्हा
परिषद शाळा आणि समाजमंदिरात स्थलांतर करून निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.
अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात पूरामुळे कल्याण रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे.
नांदेड तालुक्यातल्या भालकी परिसरात सतत पावसामुळे आसना नदी आणि नाल्यांना पूर आला
असून, शेतातल्या २४ जणांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या
दोन बोटींच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
बीड जिल्ह्यात कुरण पिंपरी पासून
ते ढालेगाव पर्यंत जवळपास ६० गावांचा संपर्क तुटला आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या सिना
कोळेगाव प्रकल्पातला विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पातून ९५ हजार दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
**
दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पुराच्या आपत्तीचा फटका बसलेल्यांना आधार
देण्यासाठी समाजाच्या विविध भागातून मदतीचे हात पुढे येत आहेत. आपत्तीग्रस्तांच्या
मदतीसाठी शेगावच्या श्री गजानन महाराज देवस्थाननं एक कोटी ११ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री
सहाय्यता निधीला दिली आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातही हजारो कुटुंबांवर मोठं
संकट कोसळलं आहे. त्यांच्यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या
कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री जमा करून पूरग्रस्त भागात तातडीनं पोहोचवली
आहे.
****
सायबरबुलिंग आणि ऑनलाईन अत्याचार
पीडितांना मदत करण्यासाठी ‘ब्रश ऑफ होप’ मोबाईल ॲप्लिकेशन, चॅटबॉट आणि संकेतस्थळाचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिचित्रफीतीद्वारे ‘ब्रश ऑफ होप’या कार्यक्रमाला संबोधित
केलं. ॲप्लिकेशन आणि संकेतस्थळाद्वारे तात्काळ मदतीमधून प्रशिक्षित समुपदेशक आणि कायदे
तज्ज्ञांशी थेट संपर्क मिळेल.
****
केंद्र सरकारने पंतप्रधान ई
- ड्राईव्ह योजनेअंतर्गत देशभरातल्या एकंदर ७२ हजार ३०० सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन
चार्जिंग केंद्र सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्व लागू केली आहेत. अवजड उद्योग मंत्रालयानं
जारी केलेल्या निवेदनानुसार, सरकारी जागा असलेला
परिसर, महामार्ग, सार्वजनिक वाहतूक केंद्र आणि व्यावसायिक संकुलांमध्ये चार्जिंग पायाभूत सुविधांच्या
स्थापनेला गती देण्यासाठी अनुदानावर आधारित रचना तयार करण्यात आली आहे. या मार्गदर्शक
तत्वानुसार सरकारी कार्यालयं, निवासी वसाहती, रुग्णालयं आणि शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधा वाढीसाठी आणि
ईव्ही चार्जिंग उपकरणांवर १०० टक्के अनुदानासाठी पात्र असतील. रहदारी जास्त असलेल्या
सार्वजनिक ठिकाणी, पायाभूत सुविधांच्या उभारणी खर्चाच्या ८० टक्के
आणि चार्जिंग उपकरणांच्या खर्चाच्या ७० टक्के अनुदान दिलं जाईल.
****
छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात
तिरियारपाणीच्या जंगलात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.
त्यांच्यावर एकूण १४ लाख रुपयांचं बक्षीस होतं. घटनास्थळावरून बंदुका आणि इतर साहित्य
जप्त करण्यात आलं. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये श्रवण मडकम उर्फ विश्वनाथ याचा समावेश
असून, त्याच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात
येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी
काल पुण्यात केली. शेलार पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.
द. फडणीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा
दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद
इंडस्ट्रियल सिटी - ऑरिकचा वर्धापन दिन कार्यक्रम आणि समृद्धी जोडमार्ग लोकार्पण सोहळा
आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना
जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठकही त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी
देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात काल देवीची शेषशायी अलंकार महापूजा पार पडली. सकाळपासून
मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
नागपूर - नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला
आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १२ वाजून दहा
मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजता नागपूर
इथून सुटेल आणि नांदेडला सकाळी ११ वाजता पोहोचेल.
****
आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी
स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूरने काल मुलींच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात
सुवर्णपदक मिळवलं. नवी दिल्लीत सुरु असलेल्या या स्पर्धेतलं हे तिचं दुसरं सुवर्णपदक
आहे. मुलांच्या स्पर्धेत एड्रियन कर्माकारला रौप्य पदक मिळालं. स्पर्धेत आतापर्यंत
४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकं मिळवून भारत अग्रस्थानी
आहे.
****
No comments:
Post a Comment