Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 September 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर
२०२५
सायंकाळी ६.१०
****
·
‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेत देशभरात
स्वच्छता दिवस साजरा
·
राज्य मंत्रिमंडळाचा
मराठवाड्यात पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा
·
शेतकऱ्यांना कालबद्ध मदतीसह
दिवाळीच्या आत कर्जमाफी द्यावी-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
·
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी
एक दिवसाचं वेतन देण्याचा प्राथमिक शिक्षकांचा निर्णय
आणि
·
पाकिस्तानी खेळाडूंच्या
गैरवर्तनप्रकरणी बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार
****
‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेत आज पंडित
दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मुख्यालयात सफाई
कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील आज राजधानी
दिल्लीत कालिंदी कुंज घाट इथं स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले तर केंद्रीय आरोग्य
आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्माण भवन इथं स्वच्छता
मोहिमेत भाग घेतला.
देशभरात ठिकठिकाणी एक दिवस एक तास एक साथ उपक्रम राबवून
स्वच्छता करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व शाळा तसंच खासगी
शाळांमध्ये एक हा उपक्रम आज राबवण्यात आला. जवळपास १०० पेक्षा जास्त शाळा तसंच
महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातल्या पिंगळी इथं स्वच्छता अभियान राबवण्यात
आलं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या.
बुलडाणा जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील ८७० ग्रामपंचायतीत आज
महाश्रमदान करण्यात आलं. वाशिम रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानक
परिसर स्वच्छ केला.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यात पूरग्रस्त
भागाची पाहणी केली. मौजे पिंपळगाव घाट, खोकरमोहा
आदी गावांना त्यांनी भेट दिली. इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन,
शाळेबद्दल असलेल्या प्रस्तावित मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीनं
पावलं उचलली जातील, असं आश्वासन पवार यांनी दिलं. सरकार
शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
****
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात
कनेरगाव आणि अंबाळा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
तर मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज नांदेड
जिल्ह्यात हदगाव तालुक्याच्या धानोरा गावात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी परभणी
जिल्ह्यातल्या धानोरा काळे आणि धारासूर या
गावांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नुकसानीचे
पंचनामे केले जावे त्यासाठी ड्रोन, मोबाईल
फोटो यांचे पुरावे ग्राह्य धरा, असे निर्देश सामाजिक न्याय
मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. ते आज कन्नड इथं आढावा बैठकीत
बोलत होते. पुरामध्ये मरण पावलेले संजय दळे यांच्या कुटुंबियांना
पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदानाचा चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
****
नैसर्गिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं
करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश कृषी मंत्री
दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. पुण्यात महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन
परिषदेत, या योजनेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते
बोलत होते. या योजनेतर्गत दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली
जाणार आहे. तर, पाच वर्षात २५ हजार कोटींचा निधी कृषी
योजनांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
****
शेतकऱ्यांवरील संकटाचे राजकारण करू नये, असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी
केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात ३२ लाख
शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण अडीच हजार कोटी रुपयांची मदत थेट जमा झाली असून आणखी
निधीची तरतूद केली जात असल्याचं उपाध्ये यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना तसंच नुकसानग्रस्तांना न्याय देण्यालाच सरकारचं
सर्वोच्च प्राधान्य असल्याचं, महसूलमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कालपर्यंत १७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच
यासंदर्भात शासन निर्णय निघेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना कालबद्ध मदत जाहीर करून, दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते बीड जिल्ह्यात
मांजरसुंभा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीए केअर
फंडात जमा केलेल्या निधीचा वापर करावा, असा सल्लाही ठाकरे
यांनी दिला.
दरम्यान, ठाकरे यांनी आज
मराठवाड्यात लातूर, धाराशिव, बीड,
जालना, तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
अतिवृष्टीबाधित गावांची पाहणी केली. सरकारकडून ज्या पद्धतीने मदत मिळेल ती
स्वीकारा, वाढीव मदत मिळवून देण्याची मागणी आपण लावून धरू
असा दिलासा ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
****
केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी देखील आज धाराशिव
जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बाधित क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची कर्जं माफी करावी असं आपण बँकाना सांगणार असून, खासगी
कंपन्यांनी या भागतल्या जिल्ह्यांना दत्तक घ्यावं, असं आवाहन
आठवले यांनी केलं.
****
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधील कोळीबोडखा इथं नुकसानाची पाहणी केली. खासदार डॉ
कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेस पक्षाचे
ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर पाटील यावेळी उपस्थित होते.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक
शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय
घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक करुन आभार
मानले.
****
६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन पुढच्या आठवड्यात साजरा होत आहे. यानिमित्त देशाच्या विविध भागातून लाखो बौद्ध अनुयायी
नागपुरात दीक्षाभूमीला भेट देतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक
सर्व सुविधा येत्या ३० सप्टेंबर पूर्वी पूर्ण कराव्यात, नागरिकांची
गैरसोय होणार नाही तसेच सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय
आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत सुधारणा केली
आहे. आता ईव्हीएमवरच्या मतमोजणीच्या शेवटच्या दोन टप्प्यांपूर्वी टपाली मतदानाची
मोजणी केली जाणार आहे. टपाली मतदानाची संख्या जास्त असल्यास त्यांची मोजणी वेळेत
पूर्ण व्हावी म्हणून पुरेसे कर्मचारी नियुक्त करणं ही संबंधित निवडणूक
अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल.
****
सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी
निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात
सरकारनं संरक्षण उत्पादन क्षेत्राला दिलेली बळकटी याविषयी जाणून घेऊ.
संरक्षण उत्पादनात स्वावलंबन हे केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. ऑपरेशन सिंदूर
दरम्यान मेड इन इंडियाचे कौशल्य प्रदर्शित झाले. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर
भारताचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
साथीयों, हमने ऑपरेशन सिंदूर मे देखा, मेड इन इंडिया की कमाल क्या है। दुश्मन
को पता तक ना चला की कौन से शस्त्रास्त्र है? ये कौन सा सामर्थ्य है, ये कौन सा सामर्थ्य
है, जो पलक भर मे उनको नष्ट कर रहा है? सोचिये अगर हम आत्मनिर्भर ना होते, क्या ऑपरेशन
सिंदूर इतनी बडी गती से हम कर पातें? जान कौन सप्लाय देगा, नही देगा, सामान मिलेगा
नही मिलेगा इसीकी चिंता बनी रहती। लेकिन मेड इन इंडिया की सादगी हमारे हाथ मे थी, सेना
के हाथ में थी। इसलिये बिना चिंता, बिना रूकावट, बिना हिचकीचाहट हमारी सेना अपना पराक्रम
करती रही।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात,
२०२४-२५ मध्ये वार्षिक संरक्षण उत्पादन एक लाख ५० हजार कोटी
रुपयांपेक्षा जास्त झाले, जे २०१४-१५ च्या आकड्याच्या तिप्पटीहून अधिक आहे. गेल्या दशकात
उद्योगातील सार्वजनिक आणि खासगी दोन्ही विभागांनी सातत्यपूर्ण वाढ दर्शविली आहे. मेक-इन-इंडिया हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेतील एक आवश्यक
घटक आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध
भारताच्या प्रभावी कारवाईत मेक इन इंडिया
शस्त्रास्त्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सुयोग्य धोरण आणि स्वदेशी नवोपक्रमांमुळे संरक्षण उत्पादनात भारत स्वावलंबी होत आहे.
****
गेल्या पाच वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ४०० टक्के
वाढ झाली असून ही गंभीर बाब असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार
यांनी म्हटलं आहे. डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत आयोजित ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या मोहिमेचं उद्घाटन शेलार यांच्या हस्ते आज
मुंबई शेअर बाजारात झालं, त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल
व्यवहार, ई-गव्हर्नन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील
सायबर सुरक्षा महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयनं २१ सप्टेंबर रोजी
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू साहिबजादा
फरहान आणि हरिस रौफ यांच्या अनुचित वर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट
परिषद-आयसीसी आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
या गैरवर्तनासाठी दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई केली जावी असं, बीसीसीआयने या तक्रारीत म्हटलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज या स्पर्धेत बांग्लादेश आणि
पाकिस्तानदरम्यान सामना होणार असून, या
सामन्यातल्या विजेता संघासोबत अंतिम फेरीत भारताचा सामना होणार आहे.
****
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं हिंगोली इथं आज सकाळी “नमो युवा रन- नशामुक्त भारत” मॅरेथॉन घेण्यात आली.
जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या या मॅरेथॅनमध्ये युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणावर
उत्साहानं सहभाग घेऊन व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला.
****
No comments:
Post a Comment