Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 September 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ सप्टेंबर
२०२५
सायंकाळी ६.१०
****
·
मराठवाड्यात पावसाचा पुन्हा
कहर, जायकवाडीचे सर्व २७ दरवाजे उघडले, पैठणमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे सुरू, वैजापुरात
सहा जण बेपत्ता
·
सण-उत्सवाच्या काळात देशी
उत्पादनांचीच खरेदी करा, पंतप्रधान मोदी यांचं मन की बात मधून आवाहन
·
ज्येष्ठ साहित्यिक भास्कर
चंदनशिव यांचं निधन
आणि
·
भारत-पाकिस्तान दरम्यान
थोड्याच वेळात आशिया चषकाचा अंतिम सामना
****
मराठवाड्यात पावसाचा पुन्हा कहर सुरू असून शनिवारी रात्रभर
मुसळधार पाऊस झाला. पैठणच्या जायकवाडी धरण क्षेत्रात दीडशे मिलिमीटर पाऊस झाल्यानं
जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडले असून गोदावरी नदीपात्रात दोन लाख २६ हजार
३६८ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग करण्यात येत आहे. नाथ मंदिरामागील
मोक्षघाट पाण्याखाली गेला असून पैठणमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत
आहे. पैठण तालुक्यात बाबुळगाव, केसापुरी, पैठणखेडा या खेड्यांचा संपर्क पुरामुळे तुटलेला आहे. पैठण इथं जलसंपदा आणि
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाथसागर धरणाची पाहणी करत प्रशासनास
सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना
करण्याचे आदेश त्यांनी दिले.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ५८१
पूर्णांक सात मिलिमीटर इतके आहे. आतापर्यंत ८१८ पूर्णांक पाच मिलिमीटर इतका पाऊस
झालेला आहे. सुमारे ६८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर
शहरात काल व आज झालेल्या पावसामुळे हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
गंगापूर तालुक्यात पावसाचं पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरलं
तर लासूर इथं शिवना नदीच्या पुरामुळं देवीच्या मंदिर परिसरातील दुकानांमध्ये पाणी
शिरलं. वेरूळ लेणी परिसरातील सीता न्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. वैजापूर
तालुक्यातील अंतापूरमध्ये पुराच्या पाण्यात सहा जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे.
लोणी खुर्द इथल्या इंदिरानगर भागात व सावखेडगंगा वांजरगाव, ढोक नांदूर सह परिसरातील गावाचा शहराशी संपर्क तुटला. प्रशासनानं
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविलं आहे.
बीड जिल्ह्यातील १७ धरणे शंभर टक्के भरली असून, दोन धरणे ही ९० टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात
येत आहे. वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला असून आवश्यक ती मदत तेथे
पुरविली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात पुरामुळे पिके हातची गेली. त्यामुळे
संकटात सापडलेल्या धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव इथल्या गावकऱ्यांनी गोदावरी
पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. भोकर तालुक्यात माळसापूर, पाळज इथं पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एक जणाचा मृत्यू झाला आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातून अद्यापही तीन लाख नऊ हजार ११७ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद
विसर्ग केला जात आहे.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यात मन्याड नदीसह सर्व लहान-मोठ्या
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अहमदपूर शहराशी अनेक गावांचा संपर्क तुटला.
हिंगोली जिल्ह्यांत रात्रीपासून सातत्याने मुसळधार पाऊस
पडल्यानं कयाधू नदीला महापूर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणाचे १५ पैकी
१३ दरवाजे उघडले असून २२ हजार ६२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग
पैनगंगा नदीत सुरू आहे. सिद्धेश्वर प्रकल्पाच्या १४ दरवाजातून २५ हजार ६३८ दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शंभरहून जास्त वर्गखोल्यांची पडझड झाली आहे.
परभणी जिल्ह्यात १० मंडळात अतिवृष्टी झाल्यानं परभणी शहरासह
अनेक भागात पाणी साचले आहे. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर इथल्या अनेक घरांची पडझड
झाल्याचे वृत्त आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पूर्णा नदीत विसर्ग
सुरू झाला आहे. तसेच येलदरी धरणातूनही
पूर्णा नदीपात्रात ४४ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे पूर्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी सण-उत्सव स्वदेशी
उत्पादनांच्या खरेदीसह साजरे करण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. आज आकाशवाणीवरील
“मन की बात” च्या १२६व्या भागात त्यांनी
श्रोत्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या
काळात अनेक सण आहेत, तसेच जीएसटी बचत महोत्सव देखील आहे.
स्वदेशी उत्पादित उत्पादने खरेदी केल्याने देशातील कारागिरांच्या कुटुंबांना आनंद
मिळेल, शिवाय त्यांच्या कठोर परिश्रमांचा सन्मान होईल आणि
तरुण उद्योजकांच्या स्वप्नांना पंख मिळतील. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या १०० व्या वर्धापन
दिनानिमित्त यंदाची विजयादशमी विशेष आहे, असं सांगत पंतप्रधानांनी संघाच्या राष्ट्रसेवेचा गौरव केला.
नवरात्रौत्सवाचं औचित्य साधून पंतप्रधानांनी देशाच्या महिला
शक्तीच्या सामर्थ्याचा गौरव केला. नौदलाच्या दीर्घ सागरी सफरीत सहभागी झालेल्या
लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रुपा यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या आव्हानात्मक सफरीचे अनुभव ऐकण्याची संधी त्यांनी श्रोत्यांना
दिली.
सण-उत्सवांनी भारताची संस्कृती जिवंत ठेवली आहे असं
पंतप्रधान म्हणाले. या अनुषंगानंच आज जागतिक सण बनलेल्या छठ पूजेच्या महापर्वाचा
युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकार
प्रयत्नशील असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं लातूर इथं निधन
झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. चंदनशिव
हे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या हासेगावचे मूळ रहिवासी होते. ग्रामीण
साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण समाजातली स्थित्यंतरं चित्रित केली.
त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह, ललित, समीक्षा आणि संपादन आहेत. २८व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं
अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं होतं. राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे देखील ते
अध्यक्ष होते.
****
सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर
प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'च्या विशेष
मालिकेच्या आजच्या भागात सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून
देशातील शेतकऱ्यांचे केलेले सक्षमीकरण याविषयी जाणून घेऊ...
कृषीप्रधान असलेल्या आपल्या
देशातील मोठी लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून
आहे. देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना दररोज असंख्य
अडचणींना सामोरे जावं लागतं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या अडचणी समजून घेतल्या आणि मदतीचा हात पुढे केला. १ डिसेंबर
२०१८ रोजी, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली, जी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी गोरखपूरमध्ये सुरू झाली. त्यावेळी
पंतप्रधान म्हणाले होते -
अब किसानों
को बीज खरीदने के लिये, खाद खरीदने के लिये, दवा खरीदने के लिये, बिजली का बिल भरने
के लिये, खेती से जुडी ऐसी अनेक जरूरतों के लिये परेशान नही होना होगा। केंद्र सरकार
हर साल जो छह हजार रूपये सीधे आपके बॅंक खाते मे ट्रांसफर करेगी उससे जरूरत के सारे
काम कर सकते है।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आतापर्यंतची
सर्वात मोठी कृषी कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात, जे थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. या योजनेतील प्रत्येक
लाभार्थ्याला संपूर्ण रक्कम मिळते. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हप्त्यांमध्ये तीन लाख नव्वद हजार कोटींहून अधिक रक्कम
थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
****
तामिळनाडूत करूर इथं काल झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची
संख्या ४० वर पोहोचली आहे. ५० पेक्षा जास्त जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू
आहेत. चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या पक्षानं ही सभा आयोजित केली
होती. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च
न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
****
आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान
क्रिकेट संघादरम्यान थोड्याच वेळात अंतिम सामना सुरू होणार आहे. याच स्पर्धेत
याआधी भारताने दोन वेळा पाकिस्तानी संघाला धूळ चारली आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार
रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल.
****
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या
अध्यक्षपदी मिथून मन्हास यांची निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
****
No comments:
Post a Comment