Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 September
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आज घरोघरी महालक्ष्मी पूजन सोहळा साजरा होत आहे. आज
दुपारनंतर महालक्ष्मींना घरोघरच्या परंपरेनुसार पंचपक्वान्नांसह सोळा भाज्यांचा नैवेद्य
अर्पण करून त्यांचं मनोभावे पूजन केलं जाईल. यासाठी आज सकाळपासूनच बाजारपेठांमधून गर्दी
झाली आहे. उद्या गौरी विसर्जनाने या तीन दिवसांच्या सोहळ्याची सांगता होईल.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या
आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आंदोलकांनी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि स्थानकाच्या बाहेरील परिसरावर ताबा घेतला असून या
ठिकाणी आंदोलकांची गर्दी वाढल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पालिका मुख्यालयाच्या
परिसरातील सर्व रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. मंत्रालयासमोरील मार्ग वाहतुकीसाठी
बंद आहे. मुंबईच्या अनेक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. फ्री
वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील बेस्ट
वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली काल दिवसभरात दोनदा पार पडली. मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे आज वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी
बैठक होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला
उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे हे लोकशाही न मानणारे आहेत. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी
ते सुपारी घेऊन आंदोलन करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ
नेते शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या छुप्या मदतीने आरक्षणाच्या नावाखाली अराजकता
माजवत आहेत, असा आरोप ओबीसी नेते
लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
****
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५१ रुपये
५० पैशांनी घट झाली आहे. नवी दिल्लीत १९ किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलेंडर आता १
हजार ५८० रुपयांना मिळेल. जागतिक स्तरावरील तेलांच्या किंमती आणि बाजारातील उपलब्धता
या आधारावर नियमित मासिक संशोधनानंतर केंद्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. घरगुती वापराच्या
गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मे २०२५
च्या अंतिम वर्ष परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञान
आधारित क्यूआर कोड असलेली डिजिटल गुणपत्रकं त्यांच्या ईमेलवर पाठवली आहेत. यामुळे या
विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक, व्यावसायिक किंवा नोकरीविषयक कामकाज किंवा मुलाखतीसाठी मूळ गुणपत्रक सोबत बाळगण्याची
गरज भासणार नाही.
मे २०२५ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ९२ हजार
३१२ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ४५९ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशावेळी आपले चुकीचे
ईमेल आयडी नोंदवल्यामुळे त्यांना ही गुणपत्रकं अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे पुढील
परीक्षा आणि महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या डीयु
(DU) पोर्टलवर लॉगिन करून
आपली वैयक्तिक माहिती तपासून ती अद्ययावत करावी असं आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद
पाटील यांनी केले आहे.
****
एल पी जी अर्थात गॅस सिलेंडरच्या वायुगळतीमुळे सोलापूर
इथे २ जणांचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी ही घटना लक्षात आली. सोलापूर इथं बलरामवाले
कुटुंब रात्री झोपेत असताना ही दुर्घटना घडली. गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे बंद
खोलीत गॅस पसरला आणि ६ वर्षाचा मुलगा हर्ष आणि मुलगी अक्षरा या दोघांचा गुदमरुन मृत्यू
झाला तर युवराज मोहन सिंग बलरामवाले आणि त्यांची पत्नी रंजना बेशुद्धावस्थेत आढळले.
****
यंदाच्या खरिप हंगामात मे ते ऑगस्ट या चारही महिन्यात
नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील ९३ पैकी ८८
मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांची परिस्थिती होत्याचे नव्हते अशी आहे. रस्ते, पूल, घरं, पशुधनासह शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक
मदत मिळावी, अशी मागणी खासदार अशोक
चव्हाण यांनी केली आहे. खासदार चव्हाण यांनी गेल्या २ दिवसात नांदेड शहर आणि ग्रामीण
भागातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदेड जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती अतिशय भीषण
असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
****
येत्या २४ तासात मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे
आणि वीजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या
घाट-माथ्यांवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment