Saturday, 20 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० डिसेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमुळे, दोन डिसेंबरला होणारं मतदान राज्य निवडणूक आयोगानं पुढे ढकललं होतं,  हे मतदान आज होत आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी आजपर्यंत पार पडलेल्या सर्व मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद नगर परिषदांसाठी मतदान सुरु आहे. मुखेड इथं नगराध्यक्ष पदासाठी १२ आणि नगरसेवक पदासाठी १२२ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे तर धर्माबाद इथं नगराध्यक्ष पदासाठी १५ आणि नगरसेवक पदासाठी १६० उमेदवार रिंगणात आहेत. त्यासोबतच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी इथल्या प्रत्येकी एका प्रभागासाठीही आज मतदान प्रक्रीया सुरु आहे.  

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपरिषदेसह मोहोळ, पंढरपूर, मैंदर्गी इथं काही जागांसाठी आज मतदान सुरू आहे. 

****

अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ४३ मतदान केंद्रातून ४० हजार  ५७२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगराध्यक्ष पदासह २५ नगरसेवक पदांसाठी विविध प्रभागांतून एकूण ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

****

नागपूरच्या बुटीबोरी इथं औद्योगिक परिसरात काल पाण्याची टाकी कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. शिवाय, कंपनीने जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाख रुपये देण्याचे मान्य केल्याचं वृत्त आहे.

या घटनेच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री फडणवीस नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक मदत, उपाययोजना आणि पुढील कार्यवाहीसाठी संबंधित संस्थांशी समन्वय साधत आहेत.

****

तेलंगणाची राजधानी हैदराबाद इथं सीपीआय माओवादी या संघटनेच्या सहा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह ४१ नक्षलवाद्यांनी काल  पोलिस महासंचालक शिवधर रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं.

****

आसामच्या लुमडिंग विभागात सैरांग–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसची आज, सकाळी हत्तीच्या कळपाला धडक बसल्यानं इंजिनसह रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले. यात ८  हत्ती ठार झाल्याचं वृत्त आहे. या घटनेमुळे  आसामच्या काही भागातील आणि ईशान्य भारतातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून बचाव आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला यंदाचा 'राष्ट्रीय कला उत्सव' यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. उद्यापासून २३ डिसेंबरपर्यंत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा इथं हा उत्सव होणार आहे.

****

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात १५ जानेवारी ते ३१ जानेवारी

कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत सिकलसेल आजाराचं निदान, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचं प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी करण्यात येणार असून, एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, याची काटेकोर दक्षता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा शोध लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलाचं अभिनंदन केलं. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक जोडण्याचा प्रयत्न केला जात असून, हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्ह असल्याचं फडणवीस म्हणाले. आतापर्यंत झालेल्या तपासात कुठेही उपमुख्यमंत्री शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

गोंदिया जिल्ह्यात आज गोंदिया नगर परिषदेच्या तीन प्रभागातील तीन जागांसाठी आणि तिरोडा नगर परिषदेच्या एका प्रभागतील एका जागेसाठी मतदान सुरु आहे. या आधी दोन डिसेंबरला गोंदिया आणि तिरोडा नगर परिषद तसंच गोरेगाव आणि सालेकसा या दोन नगर पंचायती करिता मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या सर्वच ठीकाणी मतमोजणी होणार आहे.

****

बॅडमिंटनमध्ये, सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आज चीनमधील हांगझोऊ इथं होणाऱ्या वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्याशी सामना करतील. काल संध्याकाळी ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान पटकावल्यानंतर स्पर्धेच्या दुहेरी प्रकारात उपांत्य फेरीत पोहोचणारे सात्विक आणि चिराग हे पहिले भारतीय ठरले आहेत.

भारतीय जोडीने त्यांच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वूई यिक यांचा १७-२१, २१-१८, २१-१५ असा पराभव करून टॉप फोरमध्ये स्थान निश्चित केले.

****

राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून उद्याही असंच हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...