Friday, 19 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं.दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समारोप करताना,सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.

राज्यसभेत सुमारे ९२ तास काम झाल्याची माहिती सभापती सी पी राधाकृष्णन यांनी दिली.या काळात सभागृहात ५९ खासगी विधेयकं सादर झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान,राज्यसभेत काल सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सभापतींनी चिंता व्यक्त केली. घोषणाबाजी करणं, फलक दाखवणं, चर्चेला उत्तर देणाऱ्या मंत्र्यांना अडथळा आणणं,कागद भिरकावणं, हे वर्तन अशोभनीय असून, सदस्यांनी आत्मपरिक्षण करावं आणि अशा प्रकारचं वर्तन करु नये, असं त्यांनी सांगितलं.

या अधिवेशनादरम्यान वंदे मातरम्, निवडणूक सुधारणा, रोजगार, विमा क्षेत्रातील सुधारणा तसंच ऊर्जा सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लोकसभा आणि राज्यसभेत सखोल चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनात एकूण पाच महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. यामध्ये विकसित भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि सुधारणा विधेयकांचा समावेश आहे.

****

दरम्यान, काल राज्यसभेत विकसित भारत जी राम जी विधेयकावरील चर्चेदरम्यान झालेल्या गदारोळाप्रकरणी भाजपनं आठ खासदारांविरोधात हक्कभंग नोटीस दिली आहे. काँग्रेस, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचं सभागृहातलं वर्तन लोकशाहीसाठी लाजीरवाणं असल्याचं भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितलं असून, या खासदारांना कामकाजात सहभागी होऊ देऊ नये, अशी मागणी त्‍यांनी केली.

****

सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलाचं अभिनंदन केलं. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जाणिवपूर्वक जोडण्याचा प्रयत्न केला जात असून, हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्ह असल्याचं फडणवीस म्हणाले. आतापर्यंत झालेल्या तपासात कुठेही शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मुंबईत आज वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन सत्रात मुख्यमंत्री सहभागी झाले होते. या परिषदेतदरम्यान देशातली आघाडीची सिमेंट निर्माता कंपनी असलेल्या बांगर उद्योगानं चंद्रपूर जिल्ह्यात दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे स्वारस्य पत्र प्रदान केल्याची माहीती, त्यांनी दिली.

****

न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका लांबलेल्या राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये उद्या मतदान होणार आहे. २४ अध्यक्षपदं आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्य पदांसाठी हे मतदान होईल. यामध्ये मराठवाड्यातल्या फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर तसंच वसमतच्या नगराध्यक्ष पदांसह काही सदस्य पदांचा समावेश आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर आणि गंगापूर मधल्या प्रत्येकी दोन जागा, तर पैठण नगरपरिषदेतल्या चार जागांवर नव्याने निवडणुका होणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात मुखेड आणि धर्माबाद नगरपरिषदेत, तसंच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगरपालिकेतल्या प्रत्येकी एका प्रभागात मतदान होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषदेचा तर हिंगोली नगर परिषदेतल्या दोन प्रभागांचा, तसंच धाराशिव नगरपरिषदेतल्या तीन जागांचा यात समावेश आहे

परभणी जिल्ह्यात जिंतूरमधल्या एक, तर पूर्णा मधल्या दोन जागा, तर बीड जिल्ह्यातल्या परळीतील चार, अंबाजोगाईतील चार आणि बीड आणि धारूर नगरपरिषदेमधल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

राज्यातल्या सर्व २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी परवा २१ तारखेला होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसंच निवडणूक प्रक्रिया सुसूत्र, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रत्येकी निवडणूक निर्णय अधिकारी निहाय एकूण नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

****

सैनिक कल्याण विभागात सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक गट-क पद भरतीच्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या जाहिरातीचं विभागाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक पदाच्या ७२ जागांच्या भरती प्रक्रियेत माजी सैनिकाच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीलाच अर्ज दाखल करता येईल, असं यात नमूद करण्यात आलं आहे. एकूण पदांपैकी ३ पदे ही अपंग संवर्गातली आहेत. उमेदवारांना ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, अधिक माहीतीसाठी www. mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचं अवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा सैनिक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

****

No comments: