Friday, 19 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

·      प्राचीन ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आरोग्याचा जागर

·      मराठवाड्याच्या अनेक गावांत वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा

आणि

·      १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर १३९ धावांचं आव्हान

****

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं.    या अधिवेशनात लोकसभेच्या १५ बैठका होऊन  १११ टक्के कामकाज झाल्याची माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. तर ९२ तास कामकाज झालेल्या राज्यसभेत या सत्राची उत्पादकता १२१ टक्के राहिल्याची माहिती सभापती सी पी राधाकृष्णन् यांनी दिली. राज्यसभेचे सभापती या नात्याने आपलं पहिलंच अधिवेशन होतं असं सांगून उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी वरीष्ठ सदनाचे उपसभापती, तालिका सदस्य, सभागृह नेते, आणि विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानतानाच, कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यासाठी सर्व सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकंदर झालेल्या कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा…

बाईट – संसद कामकाज

****

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावर होत असलेल्या सोहळ्याचं, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलं आहे. लंके यांनी पंतप्रधानांची संसदेत भेट घेतली. पंतप्रधानांनीही या कार्यक्रमाल उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचं खासदार लंके यांनी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका गांधी तसंच महाराष्ट्रातील इतर खासदार यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक वाड्या-वस्त्या पक्क्या रस्त्यांपासून वंचित असल्याचं यावेळी लंके यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिलं.

****

प्राचीन ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा  ‘विश्वगुरू’  होऊ शकतो,  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. भारत हा नवनिर्मितीचा मूळ स्रोत असल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृत्रीम बुद्धिमत्ता-एआयमुळे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल होत असून या इनोव्हेशनमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता भारतात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. ५४ आफ्रिकी देशांसाठीची एक भव्य इमारत मुंबईत लवकरच उभारली जात असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आफ्रिकेत उत्पादन सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचं नेतृत्वही भारत करेल,  असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

६४ वा गोवा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. १९६१ साली गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते  आज पणजीत ध्वजरोहण करण्यात आलं. पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी संचलनातून दिलेली मानवंदना मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली. निसर्ग सौंदर्यानं संपन्न असलेलं आपलं राज्य स्वच्छ ठेवण्याचा आणि इथली शांतता अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देत, या मुक्तीसाठी लढा देणाऱ्या शूर वीरांचं स्मरण केलं आहे.

****

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेला मंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुंबईत वार्ताहरांना  सांगितलं.

नाशिक जिल्हा न्यायालयानं सदनिका अपहार प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा दिल्यानंतर त्यांनी काल राजीनामा दिला. नाशिक न्यायालयाच्या शिक्षेला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून आज त्यावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, कोकाटे यांची आज मुंबईच्या रुग्णालयात अँजिओग्राफी झाली. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस काल रात्रीच मुंबईत पोहोचले होते. सकाळी पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा करून कोकाटे यांच्या प्रकृतीविषयीचा जबाब नोंदवून घेतला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आज आरोग्याचा जागर करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य प्रदर्शन आणि तपासणी शिबीर भरवण्यात आलं आहे. कंधार-लोह्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य विषयांवर आधारित पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून यात्रेत आलेल्या भाविकांचं मनोरंजनातून प्रबोधन करण्यात येत आहे. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे आरोग्य प्रदर्शन आणि तपासणी शिबिर २५ डिसेंबर पर्यंत भाविकांसाठी खुलं राहणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीसाठी उद्या मतदान होत आहे. सतरा प्रभाग आणि नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांनी मतदान करायचं आहे. पैठण तसंच गंगापूर इथल्या प्रलंबित जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर हे आगामी काळात इलेक्ट्रीक वाहन उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखलं जाईल, असा विश्वास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं एसएफएस शाळेच्या मैदानावर महाराष्ट्र ट्रेड फेअर या भव्य प्रदर्शनाचं सावे यांच्या हस्ते आज उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. शहरात आलेल्या मोठ्या उद्योगांचा सावे यांनी आढावा घेतला.

****

मराठवाड्याच्या अनेक गावांत आज वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा होत आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह बीड तसंच सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागात हा सण उत्साहात साजरा होतो. काळ्या मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणात वनभोजनाचं खास महत्त्व आहे. या ऋतूत पिकणाऱ्या भाज्या एकत्रित करून शिजवलेली भज्जी, आंबिल, ज्वारी-बाजरीचे उंडे, तिळाच्या पोळ्या, वांग्याचं भरीत अशा खास ग्रामीण चवीच्या पदार्थांचा शेतात सहभोजनातून आस्वाद घेतला जातो. 

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद इथं आपल्या शेतावर पारंपरीक पद्धतीने वेळा आमावस्या साजरी केली. पाटील कुटुंबीय आणि आप्त परिवार मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाला. 

****

१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू आहे. मैदान ओलं असल्याने, सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, श्रीलंकेनं निर्धारित २० षटकांत आठ बाद १३८ धावा करत भारतासमोर १३९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ‌११ व्या षटकांत दोन बाद ८१ धावा झाल्या होत्या.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेला टी ट्वेंटी मालिकेत आज अखेरचा पाचवा सामना खेळवला जात आहे. अहमदाबाद इथं आयोजित या सामन्याला सायंकाळी सात वाजता प्रारंभ होईल.

****

थंडीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी पहाटे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केलं आहे. लहान मुलं, वृद्ध, रक्तदाब आणि हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्यांनी गरम कपड्यांचा वापर करावा, वाफ घ्यावी, पिकांवरची संभाव्य रोगराई टाळण्यासाठी फवारणी करावी, वाहनचालकांनी धुक्यात विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन शेळके यांनी केलं.

****

राज्यात आज सर्वात कमी सात पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल नाशिक इथं सात पूर्णांक चार, पुण्यात आठ पूर्णांक तीन तर साताऱ्यात दहा अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं साडे आठ अंश, तर छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचामान केल्याप्रकरणी आज छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

****

No comments: