Thursday, 1 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.01.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 January 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं आज शौर्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पेरणे फाटा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. शौर्यदिनानिमित्त लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी काल रात्रीपासूनच कोरेगाव भीमामध्ये दाखल झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५ हजार पोलीस, ड्रोन आणि पोलिस टॉवरच्या माध्यमातून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून अनुयायांसाठी सुविधा, मोफत बस सेवा आणि पुस्तक स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

****

स्किलिंग फॉर एआय रेडीनेस” या कार्यक्रमात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “स्किल द नेशन” या राष्ट्रीय अभियानाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात देशातले तरुण, विद्यार्थी आणि कार्यरत मनुष्यबळ एआयसाठी सज्ज व्हावं, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी “एआय फॉर बिगिनर्स” हे विशेष सत्रही आयोजित करण्यात आलं असून, एआयविषयी मूलभूत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या पुढाकारातून राबवण्यात येणारा हा उपक्रम डिजिटल इंडिया आणि भविष्यकालीन रोजगार संधींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

****

देशासाठी सक्षम शस्त्रनिर्मिती करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावणार्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था – डीआरडीओच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संस्थेतले शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचार्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपण सर्वजण करत असलेली मेहनत महत्वपूर्ण असल्याचं राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआय व्यवहारात २०२५ च्या डिसेंबरपर्यंत मोठी वाढ झाली असून, २१ पूर्णांक ६३ अब्ज रुपयांचे व्यवहार झाले असल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने म्हटलं आहे. २०२४ च्या तुलनेत गेल्या वर्षभरातली ही वाढ २० टक्के म्हणजे २८ लाख कोटी रुपये इतकी आहे.

****

नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्या दिवशी देशभरातल्या विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असूनही उज्जैन इथं श्री महाकालेश्वराच्या भस्मारतीसाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. वाराणसी, अयोध्या, मथुरा, वृंदावन यासह राज्यातल्या शिर्डी, पंढरपूर, मुंबईत सिद्धिविनायक या मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

****

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम २०२५ आजपासून अंशत: लागू झालं आहे. या अधिनियमातल्या काही बाबी लागू होण्यासंबंधी केंद्र सरकारने आज अधिसूचना जारी केली. खेळाडूंच्या कल्याणासाठी खेळ प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी, नैतिक आचरण आणि सुशासनाला प्रोत्साहन आणि चालना देणं हे या विधेयकामागचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. क्रीडा प्रशासनाच्या संरचनेत सकारात्मक परिवर्तन सुनिश्चितता हे देखील या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.

****

दिल्लीमध्ये आज सकाळी दाट धुकं असल्यानं दृश्यमानता कमी झाली असून, अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्लीला येणार्या आणि जाणार्या ४५ हून अधिक गाड्या उशिरानं धावत आहेत.

दरम्यान, दिल्लीतली हवेची गुणवत्ता अतिशय खराब या श्रेणीमध्ये कायम आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजता दिल्लीचा हवामान निर्देशांक ३७१ इतका नोंदवण्यात आला.

****

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं सर्व महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या एकूण ८९३ प्रभागांमधून दोन हजार ८६९ जागांसाठी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे.

****

महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा  “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार परभणी जिल्ह्याचा समावेश “झोन-१” मध्ये झाला असून, परभणीतल्या गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती मिळणार आहेत. या निर्णयामुळे नवीन उद्योग, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पालकंमत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक मागासलेपणाचा विचार करून जिल्ह्याला विशेष झोन दर्जाची मागणी केली होती.

****

No comments: