Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· भेसळयुक्त दूध विक्री केल्यास १० लाख रुपये दंड: अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा
· शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी
· माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
· माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं उद्या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन
आणि
· राज्यात पुढचे पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा
****
भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना
१० लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून
वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न
आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी
आयुक्तांनी काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन
मुंडे यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी
प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही
त्यांनी दिला.
**
अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या
वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ केली आहे. विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या
आकडेवारीनुसार, यावर्षी एक जूनपर्यंत १३ हजार ४७४ अन्न नमुने तपासणीसाठी प्राप्त
झाले असून त्यापैकी ७ हजार ४९४ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर ४ हजार
९१ नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने
मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये
तपासले जातात.
****
हिंगोली जिल्ह्यातील औंढा
नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे काल धडक तपासणी मोहीम राबवण्यात
आली. या कारवाईत चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेला ९३ किलो खवा नष्ट करण्यात
आला. तसंच अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत.
****
दरम्यान, अन्न आणि
औषध प्रशासनाच्या वतीनं नांदेड इथं गुरुवारी दोन शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची तपासणी
करण्यात आली, तसंच दोन लाख २४ हजार ५३० रुपयांचा अन्नसाठा जप्त
करण्यात आला. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानके
कायद्यानुसार या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे.
****
मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं
कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारकडून काल विधानसभेत सांगण्यात आलं.
कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे
देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली.
स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये
काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या ५०० मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल,
अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन
करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले.
बाईट- अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी
झिरवाळ
****
माहिती अधिकार कायद्यातल्या
बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची
मागणी केली होती. या मागणीसाठी पाच जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला
होता, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात,
माहिती आयोगाला पत्र पाठवून, कायद्यातल्या बदलांना
स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं
विनियमन, नस्तींचा जलद गतीने निपटारा आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता यासंदर्भात
दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा
सामान्य प्रशासन विभाग मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी केली. काल विधानसभेत सुधीर मुनगंटीवार
यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकावर ते बोलत होते.
****
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर
तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल, असं मंत्री
उदय सामंत यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते. राज्यातल्या दोन लाखाहून अधिक
भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि एक लाख ८० हजाराहून अधिक कुत्र्यांच निर्बीजीकरण झाल्याची
माहिती सामंत यांनी दिली.
****
राज्यात पोस्टपेड स्मार्ट
मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल
विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
उद्या पाच जुलैला रामरक्षा या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येतल्या
श्री राम जन्मभूमी मंदिरातल्या दानपेटी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबई
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनीही या आंदोलनात
सहभागी व्हावं, या आंदोलनात रामरक्षा तसंच हनुमान स्त्रोत्र सर्वांसोबत म्हणण्याचा
मानस ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले…
बाईट- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
प्रमुख उद्धव ठाकरे
****
संत निवृत्तीनाथ महाराजांची
पालखी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं पोहोचली. सुमारे पंचवीस हजार वारकरी या दिंडीत
सहभागी आहेत.
शेगावच्या संत गजानन महाराजांची
पालखी आज हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. ही पालखी काल औंढा
तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्कामी होती. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची
मोठी गर्दी होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार
होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता स्वतंत्र पथक नेमणार आहे. अतिक्रमण
हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी ही माहिती दिली. ते काल वार्ताहरांशी
बोलत होते. दरम्यान, महापालिकेच्या अग्रिशमन विभागाकडून हॉटेल्स, हॉस्पिटल्ससह खासगी आस्थापनांना फायर एनओसीबाबत विचारणा करून नोटिसा बजावण्यात
येत आहेत, अग्निशमन विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे यांनी ही माहिती
दिली. आतापर्यंत २१३ आस्थापनांना नोटिसा दिल्याचं पांढरे यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या
अध्यक्षपदी अभिलाष लोमटे तर उपाध्यक्षपदी अविनाश माळी यांची बिनविरोध झाली आहे. धाराशिव
जिल्ह्यात सहकार चळवळ अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान
आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक
मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असं आवाहन
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया
ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार असल्याने, आधार प्रमाणीकरण आणि
अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे.
****
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी
४ लाख ७० हजार ३२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि मोबाईल फोन काल जप्त केला. देवणी
तालुक्यातील वलांडी–दवणहिप्परगा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र पोलिसांची चाहूल
लागताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. आरोपीचा शोध सुरू आहे.
****
जालना शहरात सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या
टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून चार आरोपींना काल अटक केली. या आरोपींकडून
चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली असून, सुमारे तीन
लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
अंबाजोगाई आंतरभारती शाखेचा
‘स्नेहसंवर्धन पुरस्कार’ यंदा अंबाजोगाई शहरातील तृप्ती स्वीट होमचे संचालक हरीश चुनीलाल
खिलोशिया यांना जाहीर झाला आहे. येत्या १५ ऑगस्टला विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान
करण्यात येईल. अन्य राज्यांतून अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या वैभवात भर
घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
****
हरित महाराष्ट्र मोहिमेला
काल हिंगोली जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राहुल
गुप्ता यांच्या हस्ते वड, पिंपळ आणि उंबर या देशी वृक्षांच्या रोपांचं वृक्षारोपण करण्यात
आलं.
****
लातूर महापालिकेचे नूतन आयुक्त
राहुल कुलकर्णी यांनी काल वरवंटी इथल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी
केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार केलेले कंपोस्ट खत, बायोगॅस प्रकल्प
आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली.
****
जालना इथं दिव्यांग पुनर्वसन
केंद्रात काल दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते कृत्रिम
पायांचं वितरण करण्यात आलं. मित्तल यांनी पुनर्वसन केंद्राची पाहणी करून इथल्या सुविधा
अधिक सक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील,
अशी माहिती दिली.
****
भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी ट्वेंटी सामना
होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होणार आहे.
****
हवामान
राज्यात पुढचे पाच दिवस जोरदार
पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात
धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती
संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment