Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०५ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचे पावसाळी अधिवेशन वीस
जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावर काल
ही माहिती दिली. साधारण तीन आठवड्यांच्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाची
विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
****
गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा
इंधन म्हणून वापर केला जात आहे, सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या
बायोफ्युएल ब्लेंडिगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल
धोरणांसदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी
काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
****
तर वाहनांसाठी २० टक्के इथेनॉल
मिश्रित इंधन हे सखोल चाचण्यांनंतर वापरात आणलं असून, वाहनधारकांनी
याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं
केलं आहे. काल पुण्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया – ए आर ए आय चे संचालक
डॉ. रेजी माथाई यांनी याबाबत माहिती दिली.
****
जालना इथं संत मुक्ताबाई पालखीचा
पहिल्यांदाच आयोजित रिंगण सोहळा आज सकाळी उत्साहासह भक्तीमय वातावरणात पार पडला. आषाढी
एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहुन पंढरपूरकडे या पालखीचा प्रवास सुरु आहे. शहरातील जे.ई.एस.
महाविद्यालयाच्या प्रांगणात ,रिंगण सोहळ्यात पालखीतील अश्वांनी
ठराविक मार्गावर प्रदक्षिणा घालत धाव घेतली. अश्वाच्या दर्शनासह रिंगणातील माती कपाळी
लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वारकऱ्यांनी फुगड्या, भजने आणि कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलभक्तीचा जागर केला. मोठ्या संख्येनं राजकीय
पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वारकरी, तसंच महिला, आणि युवकांनी या सोहळ्यात सहभागी झाले. सोहळ्याच्या
पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस विभागाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
****
नांदेड इथून उद्यापासून दोन
नव्या रेल्वेगाड्या सुरु होत आहेत. यात एक रेल्वे मुंबई तर दुसरी रेल्वे टनकपूरसाठी
धावणार आहे. दोन्ही गाड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी
वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागानं ही दिली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज राज्यव्यापी
‘श्रीराम रक्षा घंटानाद’ आंदोलन करण्यात येणार आहे. अयोध्येच्या श्रीराम मंदिरात देणगी
अपहार प्रकरणी निषेधार्थ हे आंदोलन होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आमदार
अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गुलमंडी इथल्या सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी
घंटानाद आणि महाआरती करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यात मान्सून दाखल
होऊनही अपेक्षित असा दमदार आणि सर्वदूर पाऊस होत नसल्यामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील
जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. अकोला शहराची जीवनवाहिनी मानली जाणा-या
काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ १९ पुर्णांक २४ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
समाधानकारक पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा –शेतीसाठी पाणी याबाबत चिंता वाढत आहे. शहरासह परिसरात केवळ ढगाळ वातारण दिसून येत
आहे.
****
पालघर जिल्ह्यात सकाळपासून
रिमझिम पाऊस सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह
ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या
काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज
असून या भागातील नागरिकांना दर तीन तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठविले जात असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात
शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन
कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची
संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन
प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटनस्थळांवर येत्या तीस सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर
बंदी घातली आहे.
दरम्यान,येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
****
क्रिकेट टी-ट्वेंटी सामन्यात
काल इग्लंडनं भारताला चार गडी राखून पराभूत केलं. इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या
या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सात बाद १९० धावा केल्या .हे
आव्हान इंग्लंडनं सहा चेंडु शिल्लक असतांना सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.
पाच सामन्यांच्या या मालिकेतला
पहिला सामना पावसानं रद्द झाला. आता इंग्लंडनं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. तर, पुढचा तिसरा सामना परवा मंगळवारी नॉटींगहॅम इथं भारतीय वेळेनुसार रात्री दहा
वाजता होईल.
****
No comments:
Post a Comment