Monday, 30 January 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०१ दुपारी .००वा.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुष्पचक्र अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता देशभर दोन मिनीटे मौन पाळण्यात आलं. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं.

****

उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत सध्या सुरू आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यात विरोधीपक्षांचं सहकार्य मिळावं, या उद्देशानं ही बैठक बोलावण्यात आली आहे.

लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तृणमूल काँग्रेसनं मात्र आपले खासदार या बैठकीला तसंच एक फेब्रुवारीला संसदेत हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे. पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना, आज तृणमूल काँग्रेसची बैठक असल्यानं, तसंच एक फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन असल्यानं, आज बैठकीला तसंच एक फेब्रुवारीला संसदेत उपस्थित राहणार नसल्याचं, म्हटलं आहे.

****

स्वयंघोषित संत आसाराम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता.

****

विविध आरोग्यसेवा योजना आणि जागरूकता कार्यक्रमांमुळे माता आणि बाल मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी नड्डा यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं टाटा मेमोरिअल रूग्णालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. २००५ आणि २०१५ मधील नमूना नोंदणी यंत्रणेच्या अहवालांनुसार बालमृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचं दिसून येतं असल्याचं नड्डा म्हणाले.

****

भुमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई दारु मुक्त महाराष्ट्रासाठी अभियान राबवणार आहेत. या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात पुणे इथून करणार असल्याचं देसाई यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. दारुमुळे घरगुती हिंसाचाराच्या प्रमाणात वाढ होत असून, त्याचा महिलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम असल्याचं त्या म्हणाल्या. महिलांना मदत करण्यासाठी राज्यभर ताईगिरी नावाचे गट स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

छत्तीसगढ मधल्या नारायणपूर जिल्ह्यात २४ महिलांसह १९५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे नक्षलवादी अबूझमाड या भागात सक्रिय होते.

****

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेससाठी प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेससोबत आघाडी करून ही निवडणूक लढवण्यावर आपला विरोध असून, समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकण्यास सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याच्या शक्यता फेटाळून लावत, धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कधीही तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे. ते गोव्यात पणजी इथं बोलत होते. विमुद्रीकरणामुळे असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांचे रोजगार बुडल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

****

शिवसेना भाजपची मुंबईत युती होऊ शकली नसली, तरी राज्य सरकारला काहीही धोका नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची गरज भासणार नाही, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं बोलत होते. शिवसेना भाजप नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५१ मतदान केंद्रावर ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या संदर्भात काल शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत, निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांनी लातूर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या.

//********//


No comments: