Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा शिथील करण्यात आली
आहे. एक फेब्रुवारीपासून एटीएममधून एका वेळी २४ हजार रुपये काढता येतील. चालू खात्यातून
पैसे काढण्यासाठीही आता काहीही मर्यादा नसेल.
****
निवडणूक
काळात काही मुद्यांवर मतभेद असले तरी संसदेचं कामकाज सुरळीत चाललं पाहिजे
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत
ते बोलत होते. कामकाज सुरळीत चालवण्याचं आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्याचं संसदीय
कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं.
बैठकीनंतर
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी, पत्रकारांशी बोलताना,
पाच राज्यांच्या
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अर्थसंकल्प लवकर ठेवायला नको होता, असं सांगत
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात नऊच दिवस असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. इतर विरोधी
पक्षांच्या नेत्यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर होत असल्याबद्दल
नाराजी व्यक्त केली.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयच्या कामकाजासाठी सर्वोच्च
न्यायालयानं प्रशासकीय समिती नेमली असून, या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त महालेखाकार
विनोद राय यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये राय यांच्यासह इतिहासतज्ञ रामचंद्र
गुहा, विक्रम लिमये, महिला क्रिकेटर डायना एडल्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीच्या सदस्यांमध्ये क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांचा समावेश करण्याची केंद्र सरकारची
मागणी न्यायालयानं फेटाळून लावली.
****
सर्वोच्च
न्यायालयातील न्यायाधिशांच्या नियुक्ती संदर्भातल्या याचिकांची सुनावणी न्यायालयानं
महिनाभरासाठी पुढे ढकलली आहे. या याचिका रद्दबातल ठरवण्याची मागणी केंद्र सरकारनं केली
आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून करनाल सिंग यांची नियुक्ती करण्याचा
प्रस्ताव एका आठवड्यात तयार करावा, असे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले
आहेत.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीसंदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष
खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील
सुनावणी तीन मार्चला होणार आहे. आज राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी जनसामान्यांच्या मनातून गांधीजींचे विचार कधीही
दूर करता येणार नाहीत, असं मत व्यक्त केलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतिंना
आज सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालय परिसरात राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन
क्षत्रीय, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मान्यवरांनी महात्मा गांधीजींना आदरांजली
अर्पण केली. विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी गांधीजींच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्तालयात हुतात्मा दिनानिमित्त दोन
मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
सकल मराठा समाजाच्या उद्याच्या प्रस्तावित चक्का जाम आंदोलनासंदर्भात
आज औरंगाबाद इथं पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन
चक्काजाम आंदोलनाची परवानगी नाकारली. आपल्या मागण्यांसाठी शांततेत निदर्शन करावं, मात्र
वाहतुकीला अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास, गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी
दिला आहे.
कोल्हापूर इथं मराठा समाजाच्या एका गटाने ११ ते एक या वेळेत
चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसऱ्या गटाने चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा नसल्याचं
सांगत ठिय्या आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.
****
नांदेड
इथं आज राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग जनजागृती फेरी
काढण्यात आली.
जिल्हा रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शालेय विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते, फेरीचा समारोप एका पथनाट्याच्या सादरीकरणानं झाला.
****
गोदावरी खोरे समन्यायी पाणी वाटप
लोकसमिती स्थापन करण्याची मागणी, प्रसिध्द जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी केली आहे. औरंगाबाद इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन
केंद्राच्या वतीनं आयोजित,
जायकवाडीची कहाणी या विशेष व्याख्यानात ते आज बोलत होते.
आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापना आधारे जल व्यवस्थापन शक्य आहे, असा पर्याय
विकसित करणं ही काळाची गरज असल्याचं पुरंदरे यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात ९१ पूर्णांक नऊ टक्के लसीकरण
झाल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बी टी जमादार यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या
दोन लाख ६२ हजार ५४४ बालकांना, तर शहरी भागातल्या २६ हजार ४०८ बालकांना पोलिओ डोस देण्यात
आला.
****
No comments:
Post a Comment