Monday, 29 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29 04 2019 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29 04 2019 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.

****



 देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज नऊ राज्यातल्या ७२ जागांवर मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत या चौथ्या टप्प्यात देशभरातल्या ७२ मतदार संघात सरासरी २२ टक्के मतदान झालं. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ३५ टक्के तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी चार टक्के मतदानाची नोंद झाली. झारखंड आणि राजस्थान मध्ये प्रत्येकी २९ टक्के, मध्यप्रदेशात २७ टक्के, उत्तर प्रदेशात २१ टक्के, ओडिशात २० टक्के, बिहारमध्ये १८ टक्के तर, महाराष्ट्रात १५ टक्के मतदान नोंदवलं गेलं.



 राज्यातल्या मुंबईमधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदारसंघांत सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी १५ टक्के मतदान झालं. यापैकी पालघर मतदार संघात सुमारे २० टक्के, ठाणे १३, भिवंडी १४, तर कल्याण मतदार संघात अवघं सात टक्के मतदानाची नोंद झाली.

****



 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नंदूरबारच्या भाजप महायुतीच्या उमेदवार हीना गावीत, यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, आज सकाळी मतदान केलं. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, प्रसिद्ध गीतकार गुलजार, जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, रेखा, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, आमीर खान, माधवन, यांच्यासह चित्रपट सृष्टीतल्या अनेकांनी आज आपापल्या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.

****



 नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट चालत नसल्याच्या तसेच यंत्र बंद पडल्याच्या तक्रारीनंतर, या दोन्ही मतदार संघात सुमारे 75 यंत्रं बदलावी लागली, या सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मतदार यादीत नावं न सापडण्याचे किरकोळ प्रकार वगळता मतदान सुरळीत सुरू आहे. तुषार वाखारकर या सध्या सॅन फ्रान्सिस्को येथे अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या नाशिककर मतदाराने खास मतदानासाठी नाशिकला येऊन मतदानाचा हक्क बजावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 जळगाव लोकसभा मतदार संघातल्या भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे. गेल्या मंगळवारी, २३ तारखेला झालेल्या मतदानाच्या वेळेस चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान घेण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मतदान केंद्रातल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होत. त्यामुळं या केंद्रावर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेलं फॅनी चक्रीवादळ अधिकाधिक तीव्र होत आहे. सध्या ते ताशी २१ किलोमीटर वेगानं वायव्य दिशेकडे सरकत आहे. या वादळामुळे केरळमधे आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागातही पावसाची शक्यता आहे. ओडिशा किनारपट्टीवर गुरुवारी मध्यम स्वरुपाचा तर शुक्रवारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.



दरम्यान या वादळाच्या स्थितीवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****



रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागात काल तापमानानं उच्चांक गाठला. पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ इथं ४४ पूर्णांक ५ सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड हे कोकणातल्या तापमान वाढीचं कारण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



आईपीएल क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता इथं झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं मुंबई इंडियन्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघानं २० षटकात २ गडी बाद २३२  धावांचा डोंगर उभारला. प्रत्त्युतरादाखल मुंबईला २० षटकात ७ गडी बाद १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक पांड्याने केवळ ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. नाबाद ८० धावा आणि दोन गडी बाद करणाऱ्या रसेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. कालच्या दुसऱ्या एका सामन्यात रॉयल चेंलेजर्स बंगलोरचा १६ धावांनी पराभव करत दिल्ली कॅपिटल्स संघ पुढच्या बाद फेरीसाठी पात्र ठरला. या स्पर्धेत आज सनरायजर्स हैद्राबाद आणि किंग्जस इलेवन पंजाब यांच्यात हैद्राबाद इथं रात्री ८ वाजता सामना खेळला जाणार आहे.

*****

***

आकाशवाणी औरंगाबाद केंद्र दुपारी एक वाजेचे बातमीपत्र दि.29.04.2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29 04 2019 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29 04 2019 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

मराठी बातमीपत्र

२९  एप्रिल  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९ राज्यातल्या ९१ लोकसभा मतदारसंघात मतदानास सकाळी सात वाजता सुरूवात झाली. यामध्ये राज्यातल्या मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यात भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदार यंत्रात बंद होईल.



 या १७ मतदारसंघात तीन कोटी, ११ लाख, ब्याण्णव हजार, ८२३ मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं विविध उपक्रम राबवले आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सोयीच्या दृष्टीनं वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असणार आहे.

****



 राज्यातल्या सतरा लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी सुमारे सात टक्के मतदान झालं आहे. नंदुरबार इथं नऊ वाजेपर्यंत ८ पूर्णाक ७३ दशांश टक्के , धुळे ६ पूर्णाक ३१ दशांश टक्के, दिंडोरी ७ पूर्णाक २८,  नाशिक ६ पूर्णाक ६९, पालघर ७ पूर्णाक ८६, भिंवडी ६ पूर्णांक २१ , कल्याण ५ टक्के, ठाणे ६ पूर्णाक ७७, मावळ ६ पूर्णाक ६७, शिरुर ७ पूर्णांक ७, तर शिर्डी मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७ पूर्णांक २८ शतांश टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक ४४ शतांश टक्के, मुंबई दक्षिण ६ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम सात टक्के,  मुंबई उत्तर पूर्व सात टक्के, मुंबई पूर्व मध्य सहा टक्के, तर उत्तर मुंबई मतदार संघात सात दशांश ८५ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आहे.



 या सर्व मतदार संघात दिग्गजांनी आज सकाळीसच आपापल्या मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ तसंच निवडणूक आयोगाचे ब्रँड एम्बेसेडर डॉ अनिल काकोडकर, भाजप नेत्या पूनम महाजन, विनोद तावडे, धुळे मतदार संघातले उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, तसंच अपक्ष उमेदवार अनिल गोटे, माजी मंत्री तथा नवापूर चे आमदार सुरुपसिंग नाईक, विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ उद्योजक अनिल अंबानी, यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.



 लोकसभा निवडणुकीत आज मतदानाचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यावर, राज्यातल्या ४८ मतदार संघांमधलं मतदान पूर्ण होईल. देशात अजून तीन टप्प्यात, येत्या ६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी मतदान होणार असून, त्यानंतर २३ मे रोजी देशभरात मतमोजणी आणि निवडणूक निकाल जाहीर होईल.

****



 लोकसभा निवडणुकीतील निकालाची पैज लावणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिपूर इथले रणजीत देसाई आणि विजयनगर इथले राजकुमार लहू कोरे यांनी, निवडणूक निकालावर एक लाख  रुपयांची पैज लागली होती. त्यासाठी या दोघांनी केलेला लेखी  करार हा, मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे एक प्रकारचा सट्टा असल्याने, मिरज ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली. या दोघांनीही आपापल्या बँक खात्यांचे एक लाख रुपयांचे धनादेश मध्यस्थाकडे देऊन ठेवले असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.

****



 देशभरात उष्णतेची लाट असून राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.



 राज्यात काल मराठवाड्यातल्या परभणी, विदर्भातल्या अकोला आणि चंद्रपूर इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. अमरावती ४५ पूर्णांक आठ, जळगाव ४५ पूर्णांक ऐवढी नोंद झालेली आहे.

*****

***

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...