Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 10 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· राज्याचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज सादर करणार
· संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून
· २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण
करण्याचं उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
· हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नव
संजीवनी अभियानाची सुरुवात
आणि
· आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपेद, अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय
****
राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा
अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार
पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, तर
अर्थमंत्री अजित पवार यांचा हा ११ वा अर्थसंकल्प आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं
दुसरं सत्र आजपासून सुरू होत असून, ते चार एप्रिलपर्यंत चालेल.
या दुसऱ्या सत्रात २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि
मतदान होईल. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, कोस्टल
शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये
मंजुरीसाठी चर्चा होईल.
****
वर्ष २०३० पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा
निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचं उद्दिष्ट
पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी व्यक्त केला. भारतीय व्यवस्थापन संस्था - आय आय एम नागपूरमध्ये दोन
मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण काल
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या
सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे आय आय एम नागपूर साठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज
पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
दरम्यान, नागपूरच्या
मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घाटन काल
मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या
उपस्थितीत झालं. याठिकाणी संत्र्यांचं प्रमुख केंद्र तयार करुन, सर्व प्रकारच्या संत्र्यांची खरेदी केली जाईल, तसंच
संत्र्यासह इतर फळांवर देखील प्रक्रिया केली जाईल, यामुळे
फळांचा संपूर्ण उपयोग केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
विदर्भातल्या संत्र्याच्या निर्यातीसाठी
विविध योजना राबवण्यात येत असून, रामदेव बाबांनी सुरु केलेलं
हे पार्क सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारं तसंच युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून
देणारं असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
****
मुख्यमंत्री सहायता कक्षाची व्याप्ती
वाढवण्यासाठी टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या समन्वयातून जास्तीत
जास्त गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यात येईल, अशी
घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. टाटा ट्रस्ट मार्फत सुरू असणारं वैद्यकीय
क्षेत्रातलं कार्य पाहून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्ट वैयक्तिक
अनुदान कार्यक्रम यांनी संयुक्तरित्या काम करणं अधिक प्रभावी ठरेल, असं ते म्हणाले. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकारच्या आजारांवर उपचार करता येतील, तसंच रुग्णालयांची संख्या देखील वाढवता येणार आहे, असंही
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना टप्पा
दोन’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत
ए. टी. ई. चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभागात सामंजस्य करार करण्यात
आला. या करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन तांत्रिक सहाय्यासह, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्वरुपात मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे.
****
भारतीय जनता पक्ष देशात फूट पाडण्याचं
काम करत असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या निर्धार सभेत बोलत होते. एक
राष्ट्र एक निवडणूक एकाधिकारशाहीकडे नेणारं असून, त्याचा
देशाला धोका आहे, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, आमदार
आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईची
आर्थिक स्थिती भाजप पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोप केला. गुजरातमधल्या
गिफ्ट सिटीसारख्या सुविधा मुंबईला मिळाव्यात, अशी
मागणी त्यांनी केली.
****
राज्य राखीव दलाच्या विकासासाठी भरीव
निधी उपलब्ध करुन हे दल अधिक सक्षम करण्यावर आपण भर देऊ, असं
आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलं.
छत्रपती संभाजीनगर इथं काल राज्य राखीव बल गट क्रमांक १४च्या वर्धापन दिन सोहळ्यात
ते बोलत होते. शहरात आणीबाणीच्या प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य
राखीव बलाचे अधिकारी कर्मचारी नेहमीच अभिमानास्पद काम करत आले असल्याचं शिरसाट
यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं
असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नव संजीवनी अभियानाची सुरुवात काल
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाली. या अभियानाअंतर्गत २० मार्च पर्यंत
कर्करोगाची लक्षणं असलेल्या ३० वर्षावरील सर्व महिलांचं सर्वेक्षण करण्यात येणार
आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आशा ताईंमार्फत सर्वेक्षण करण्याचे निर्देश गोयल
यांनी यावेळी दिले. कर्करोगाचं निदान झालेल्या महिलांना महात्मा ज्योतिबा फुले जन
आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी किंवा
कर्करोगाची निदान करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या संभाजीनगर किंवा नांदेड इथल्या
रुग्णालयाकडे संदर्भित करावं, असंही त्यांनी
सांगितलं.
****
परभणी शहरात क्रीडा संकुलन परिसरातल्या
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाजूला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री छगन भुजबळ
यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात
मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात येत असून, नॅशनल
डिफेन्स अकादमीची स्थापना करून मुलींना सैन्य दलाची पूर्व तयारी करता येणार
असल्याचं,
सावे यांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, भुजबळ
यांनी,
परभणी इथं पोलिस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सुर्यवंशी
यांच्या कुटुंबियांची काल भेट घेतली. याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, कायदा सर्वांसाठी सारखाच असून, आपण मुख्यमंत्र्यांची भेट
घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर चार गडी राखून दणदणीत विजय
मिळवला. काल दुबईत झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने दिलेलं २५२ धावांचं
लक्ष्य भारतीय संघाने ४९ षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. रोहीत शर्माने ७६, श्रेयस अय्यरने ४८, तर के एल राहुलने ३४ धावा
केल्या. कर्णधार रोहीत शर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा, तर
न्यूझीलंडचा रचिन रविंद्र प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्काराचा मानकरी ठरला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
****
जालना तालुक्यातल्या परतूर इथं काल
बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या
हस्ते प्रदान करण्यात आला. मराठी भाषा समृद्ध असून, भाषेमुळे
माणूस मोठा होतो, माणसामुळे भाषा नव्हे, असं अनासपुरे यावेळी म्हणाले. उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रणजितसिंह
निंबाळकर,
विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य यावेळी
उपस्थित होते.
****
धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा या गावचा
कायापालट करणारे चैत्राम पवार यांना पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री
पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल काल छत्रपती संभाजीनगर इथं त्यांचा वनवासी कल्याण
आश्रमच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय
कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती
अंकुशराव कदम यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचं २७ वं
अधिवेशन काल हदगाव इथं पार पडलं. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे यावेळी उपस्थित होते.
या अधिवेशनात हदगाव इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरराव देशमुख यांना
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
फुलंब्री इथं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय
सेवा आणि योजनांचा महामेळाव्याचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय
न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या
हस्ते झालं. महिलांनी सक्षम व्हावं आणि आपले हक्क, अधिकार
जाणून घ्यावे,
असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
No comments:
Post a Comment