Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पोलिसांवर जास्त ताण येईल, असं कोणीही बोलू नये, असं ते म्हणाले.
तत्पूर्वी पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं. बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी महासचिव मधुकरअण्णा मुळे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली.
****
२० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचं राज्य सरकारचं धोरण नाही, तसा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही, असं राज्य सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. राज्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा दत्तक योजना राबवली जात आहे. त्यात दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांकडून आर्थिक मदत घेतली जाते. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद तसंच मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात सांगितलं.
राज्यातल्या शाळा दुरुस्तीचा आराखडा लवकरच तयार करू आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातला मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला उत्तर देताना शिंदे यांनी, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून, सर्वसामान्यांचं दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचं नमूद केलं.
****
विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विरोधी पक्षनेता नियुक्त करताना विधानसभेतलं संख्याबळ पाहिलं जात नाही, असं ते म्हणाले. याप्रकरणी नियमानुसार योग्य निर्णय घेऊ आणि सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालेल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.
****
हास्य कलाकार कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. आज विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, कोणत्याही नेत्याचा अनादर करणं सहन केलं जाणार नाही, कोणालाही स्वातंत्र्याचा गैरवापर करता येणार नाही, असं स्पष्ट केलं. कामरा यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
****
कर्नाटकमध्ये एका विशिष्ट अल्पसंख्यक समाजाला सरकारी कंत्राटांमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आज भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या, या निर्णयासाठी घटनेत बदल करण्याच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधला वाद प्रतिवाद वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज स्थगित केलं. लोकसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.
****
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणार्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. १८८२ मध्ये याच दिवशी डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग अर्थात टीबी च्या जीवाणूंचा शोध लावला होता. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्ध व्हा, प्रयत्न करा आणि परिणाम मिळवा’ अशी यंदाच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे.
जनतेनं क्षयरोग निर्मूलनासाठीची आपली कटिबद्धता दृढ करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या एमजीएम बहुविधाच्या संचालक स्नेहलता दत्ता यांचं आज सकाळी निधन झालं, त्या ८४ वर्षांच्या होत्या. एमजीएम महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांच्या त्या मातोश्री होत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह एमजीएम हॉस्पिटल इथं दान केला जाईल.
****
No comments:
Post a Comment