Sunday, 9 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

****

विकसित भारताची उभारणी केवळ स्वावलंबी, स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सक्षम महिलांच्या बळावरच होऊ शकते, ‘नारी शक्ती से विकसित भारत’ संमेलनात राष्ट्रपतींचं प्रतिपादन 

महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘रूपे कार्ड’चं राज्यपालांच्या हस्ते अनावरण; महिला दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा

उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध - छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची ग्वाही  

आणि 

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत - न्यूझीलंड लढत 

विकसित भारताची उभारणी केवळ स्वावलंबी, स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सक्षम महिलांच्या बळावरच होऊ शकते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल महिला दिनाच्या अनुषंगाने ‘नारी शक्ती से विकसित भारत’ या एक दिवसीय संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना, देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हा दिवस महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्याचा, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं त्या म्हणाल्या, 

बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

****

महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमध्ये नवसारीतल्या वंसी-बोरसी इथं लखपती दीदी संमेलनाला संबोधित केलं. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं. नारी शक्तीनं देशाच्या प्रगतीची धुरा सांभाळली असून, महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी असल्याचं, पंतप्रधान म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेलं ‘रूपे कार्ड’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. काल मुंबईत महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्डचं अनावरण करण्यात आलं. देशात ‘रूपे कार्ड’ देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ॲक्सेस त्यात उपलब्ध असून, याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे, तसंच पेमेंट करण्यासाठी क्युआर कोडही देण्यात आला आहे. 

****

दरम्यान, राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोह काल मुंबईत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. २०२९ साली संसदेत तसंच राज्यांच्या विधानमंडळात ३३ टक्के महिला प्रतिनिधी असणार, याचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, 

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुलींचं शिक्षण तसंच त्यांचं उच्च शिक्षणातलं प्रमाण वाढवण्याबाबत शासन प्रयत्नशील असून, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबवण्यात राज्य आघाडीवर असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं. 

****

सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समान हक्क आणि सबलीकरण या संकल्पनेवर आधारित महिला दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महिलांनी नारीशक्ती मोटारसायकल रॅली काढली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचं उद्घाटनही काल करण्यात आलं. 


लातूर इथंही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि लातूर आयएमएच्या वुमेन्स डॉक्टर विंगच्या वतीने ‘एक धाव स्वतः साठी’ रॅली कढण्यात आली. 

लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाचं पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मैत्री फाडंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनी जन्मणाऱ्या मुलींचं आणि मातांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. बाळांना बेबी किट तर मातेचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 


नांदेड जिल्ह्यातल्या सोळाही पंचायत समितीअंतर्गत गाव स्तरावर काल महिला सभांचं आयोजन करून पाणी, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं, तसंच स्वच्छतेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महिलांनी पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर बचतगटांच्या महिलांनी स्वच्छतेचा संदेश दिला.  


जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं महिला सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. महिलांसाठी जाचक असणाऱ्या प्रथा बंद करण्याचा महत्त्वाचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला.

****

नमो ड्रोन दीदी या अभियानांतर्गत उमेद आणि आर सी एफ च्या सहाय्याने परभणी जिल्ह्यात मिरखेल इथल्या शिल्पा देशमुख या पहिल्या ड्रोन दीदी ठरल्या आहेत. ऐकूया त्यांची यशोगाथा, 

बाईट –शिल्पा देशमुख

****

निडेक ग्लोबल अप्लायन्स कंपनी छत्रपती संभाजीनगर इथं एक हजार दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यासंदर्भातला सामंजस्य करार काल करण्यात आला. यामुळे ७०० ते एक हजार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. 

****

उद्योगांना रस्ते, वाहतूक, पार्किंग, पाणी, वीज, आदी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी म्हटलं आहे. विभागातले गुंतवणूकदार, उद्योजक, शासनाच्या विविध प्रकल्पांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. उद्योजक, गुंतवणूकदार यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर बैठका घेण्यात याव्यात तसंच त्यांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्यासह कायदा- सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करण्याचे निर्देश गावडे यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. 

****

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. दुबईत खेळला जाणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल. 

****


सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली तसंच आढावा बैठक घेतली. मंदिर समितीनं केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अहवालानुसार आणि भाविकांच्या सूचना तसंच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकासकामं हाती घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसंच पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, मंदिर समितीचे विविध प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

धाराशिव इथले सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांना बारामतीच्या संविधान विचार मंचचा भीमपुत्र आयडॉल २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली ३८ वर्षे सामाजिक क्षेत्रात असलेल्या बनसोडे यांनी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत १० वर्षे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मध्ये काम केलं. 

****

मराठवाड्याच्या जलसंधारणासंबंधी विधायक चर्चा करण्यासाठी उद्या, सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. संशोधक, धोरणकर्ते, शेतकरी, शासकीय आणि गैर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी होतील. 

****


No comments: