Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०९ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत आहे. यामध्ये २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि संबंधित विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर वीस बैठका नियोजित आहेत तसंच, बँकिंग कायदे - सुधारणा विधेयक, किनारी जहाज वाहतूक- कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजूरीसाठी चर्चा होईल. येत्या ४ एप्रिलपर्यंत हे सत्र सुरु असणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा मंगळवारी मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली जाईल.
****
तात्पुरत्या आणि ऑनलाइन पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असल्याचं कामगार मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात ३१ हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक-खाजगी रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत, प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत अशा कामगारांची संख्या जवळपास एक कोटींहून अधिक आहे. वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी कामगारांनी नोंदणी करण्याचं आवाहन कामगार मंत्रालयानं केलं आहे.
****
ज्येष्ठ समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक डॉक्टर सुधीर रसाळ यांना काल साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्ली इथं आयोजित सोहळ्यात, विविध २३ प्रादेशिक भाषांमधील नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींना यावेळी गौरवण्यात आलं.
डॉक्टर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ ‘विंदांचे गद्यरूप’ यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला. यासोबतच, कोकणी भाषेसाठी लेखक नाटककार मुकेश थळी यांना त्यांच्या 'रंगतरंग ' निबंध संग्रहासाठी तर, गुजराती भाषेसाठी दिलीप झवेरी यांना त्यांच्या 'भगवाननी वातो' या कवितासंग्रहासाठी सन्मानित करण्यात आलं.
****
जागतिक महिला दिन काल ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील कर्तबगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच, विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ५१ महिलांना आदर्श महिला पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. यवतमाळमध्ये महिला मदत केंद्रातर्फे तीन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आला तर गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील कार्यभार महिला पोलिसांकडं सोपविण्यात आला होता. अकोला इथं महिला आणि बालविकास विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाव अभियान आणि शहरात वॉकेथॉन घेण्यात आली.
जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. महिलांनी न घाबरता सर्व क्षेत्रात अग्रेसर व्हावं असं त्या म्हणाल्या. परभणी जिल्ह्यातील दैठणा इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थिनींना परीक्षा लेखन संचाचं वाटप करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं दिवसभरात किर्तन, बचत गटांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तर, पुणे इथं काल डॉक्टर सुधा कांकरिया लिखित ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या पंचविसाव्या आवृत्तीचं प्रकाशन झालं.
****
मध्य रेल्वे विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त काल संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांसह वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चालवण्यात आली. मुंबई - साईनगर शिर्डी ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव आणि सहाय्यक लोको पायलट संगीता कुमारी यांनी चालवली. श्वेता घोणे यांनी रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले तसंच मुंबई विभागासह भुसावळ विभागात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे विशेष मालगाड्या चालवण्यात आल्या. तर पुणे विभागातही, महिला रेल्वे संरक्षण दलाकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी मुक्कामाची सोय असणाऱ्या पहिल्या बराकीचं उद्घघाटन करण्यात आलं.
****
हवामान
राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर गुजरात, कर्नाटक किनारी, केरळ इथं काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थितीचा अंदाज आहे.
****
क्रिकेट
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. दुबईत खेळला जाणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
****
महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल लखनऊ इथं झालेल्या सामन्यात, युपी वॉरियर्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा बारा धावांनी पराभव केला. या पराभवामुळे गतविजेता RCB संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे. RCB सध्या सात सामन्यांत चार गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे, तर युपी वॉरियर्स स्पर्धेतून आधीच बाहेर पडला आहे. या निकालामुळं गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्ससोबत पुढच्या फेरीत दाखल झाले. मुंबई इंडियन्सचा सामना उद्या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्सशी होईल.
****
भारतीय महिला कबड्डीपटूंनी आशिया करंडक पाचव्यांदा जिंकला आहे. इराणमध्ये तेहरान इथं सहाव्या आशिया महिला कबड्डी अजिंक्यपदाच्या सामन्यात त्यांनी काल यजमान इराणचा ३२-२५ अशा गुणांनी पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला संघ अजिंक्य राहिला.
****
No comments:
Post a Comment