Saturday, 8 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्याचा, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा - राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नारीशक्तीविषयी गौरवोद्गार

·      छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून अनावरण

आणि

·      जागतिक महिला दिनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित

****

जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समान हक्क आणि सबलीकरण ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस महिलांचं योगदान आणि कर्तबगारीचा गौरव करण्याचा असून महिलांच्या विकासाच्या प्रवासात सर्व देशवासीयांनी त्यांना साथ द्यावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.

 

विकसित भारतासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास महत्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक योजना आणि धोरणं आखली आहेत, देशभरातल्या महिलांना आपण नमन करत आहोत असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

महिला दिनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नारी शक्ती से विकसित भारत या एक दिवसीय संमेलनाचं उदघाटन झालं. आजचा दिवस महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्याचा, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या

बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

****

विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी आज नवसारीतल्या वंसी-बोरसी इथं लखपती दीदी संमेलनाला संबोधित केलं, त्याप्रसंगी ते बोलत होते. नारी शक्तीने देशाच्या प्रगतीची धुरा सांभाळली आहे. महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आज गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात ‘लखपती दीदी’ योजनेच्या दहा लाभार्थींशीही संवाद साधला.

****

छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेलं ‘रूपे कार्ड’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. तसेच पेमेंट करण्यासाठी क्युआर कोडही देण्यात आला आहे. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या कार्डचं आज राज्यपाल सी पी राधाकष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. देशात ‘रूपे कार्ड’ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.

 

राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे बेटी बचाओ, बेटी पढाओकार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोह पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

२०२९ साली संसदेत तसंच राज्यांच्या विधानमंडळात ३३ टक्के महिला प्रतिनिधी असणार याचा आपणास अभिमान वाटत आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुलींचं शिक्षण तसंच त्यांचं उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे, असं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबविण्यात राज्य आघाडीवर असल्याचं त्या म्हणाल्या.

****

जागतिक महिला दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सचिव आणि या पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्या म्हणाल्या

बाईट – सुजाता सौनिक

****

महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयं-सहायता गटांना कृषी सेवा प्रदान करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाने सुसज्ज करून सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं नमो ड्रोन दीदी ही योजना राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उमेद अभियान आणि आरसीएफच्या सहाय्याने परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथील शिल्पा देशमुख या पहिल्या ड्रोन दीदी ठरल्या आहेत. महिला दिनानिमित्त ऐकूया त्यांची यशोगाथा.

बाईट – शिल्पा देशमुख

****

जागतिक महिला दिनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन झालं. यामुळं विवाह तसंच विवाहपश्चात होणारे वाद, त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न वेळीच सोडवता येतील.

****

मराठवाड्याच्या जलसंधारणासंबंधी विधायक चर्चा करण्यासाठी सोमवारी मराठवाडा पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत संशोधक, धोरणकर्ते, शेतकरी आणि सरकारी, गैर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि अभ्यासक यांचा परिषदेत सहभाग असणार आहे.

****

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तसंच सहआरोपींची नावं पुरवणी आरोपपत्रात समाविष्ट करावीत, या मागणीसाठी आज जिंतूर शहरात कडकडीत बंद पाळला गेला. तसंच नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं.

****

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे वेव्हज् मध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत ट्रुथ टेल हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचा उद्देश, थेट प्रक्षेपणामध्ये दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करणं असा आहे.

****

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली तसंच विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली. मंदिर समितीनं केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अहवालानूसार आणि भाविकांच्या सूचना तसंच आंतरराष्ट्रीय मानकांनूसार विकासकामं हाती घ्यावी, असं शेलार म्हणाले. बैठकीला तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसंच पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, मंदिर समितीचे विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

****


मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत आज नांदेड इथून अयोध्या धामला जाण्यासाठी पहिली रेल्वे रवाना झाली. यावेळी खासदार डॉ.अजित गोपछडे, पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सोहळ्यास उपस्थिती होती.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...