Sunday, 9 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार

·      मसूर डाळीवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

·      मध्य प्रदेशच्या माधव राष्ट्रीय उद्यानाला, देशातल्या ५८ व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा

·      हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नव संजीवनी अभियानाची सुरुवात

आणि

·      आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं भारतासमोर २५२ धावांचं आव्हान

****

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे.

****

 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत असून, ते चार एप्रिलपर्यंत चालेल. या दुसऱ्या सत्रात २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर २० बैठका होतील. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल.

****

केंद्र सरकारनं मसूर डाळीवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क न लावण्याच्या निर्णयाला, तीन महिन्यांची म्हणजेच, येत्या ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना आज जारी करण्यात आली. सरकारनं डाळींवर पाच टक्के सीमा शुल्क आणि पाच टक्के कृषी, संशोधन आणि विकास शुल्क असं, एकूण १० टक्के शुल्क लावलं आहे.

****

मध्य प्रदेशच्या माधव राष्ट्रीय उद्यानाला, देशातल्या ५८ व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज ही माहिती दिली. भारतात पर्यावरण आणि जैव विविधतेचं रक्षण करण्यासाठी, सरकार कटीबद्ध असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या घोषणेचं स्वागत करत, वन्य जीव रक्षणासाठी भारत सदैव पुढाकार घेईल, अशी प्रतिक्रिया दिली. ग्वाल्हेर जवळचा माधव व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेशातला नववा व्याघ्र प्रकल्प आहे.

****

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज् अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ॲनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातल्या ॲनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा, वेबटून आणि ऍनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहिती वेव्हज् इंडिया डॉट ओआरजी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

 

नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घाटन आज केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. हा प्रकल्प विदर्भातल्या सर्व संत्री उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी संत्र्यांचं प्रमुख केंद्र तयार करुन, सर्व प्रकारच्या संत्र्यांची खरेदी केली जाईल, तसंच संत्र्यासह इतर फळांवर देखील प्रक्रिया केली जाईल, यामुळे फळांचा संपूर्ण उपयोग केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

विदर्भातल्या संत्र्याच्या निर्यातीसाठी विविध योजना राबवण्यात येत असून, रामदेव बाबांनी सुरु केलेलं हे पार्क सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारं तसंच युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून देणारं असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.

****

राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना टप्पा दोन’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत ए. टी. ई. चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभागात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ए. टी. ई. चंद्रा फौंडेशनच्या अमित चंद्रा यांनी पत्र लिहून या योजनेमध्ये सक्रीयपणे सहकार्य करण्याविषयी विनंती केली होती. या सामंजस्य करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन तांत्रिक सहाय्यासह, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्वरुपात मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नव संजीवनी अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाली. या अभियानाअंतर्गत २० मार्च पर्यंत कर्करोगाची लक्षणं असलेल्या ३० वर्षावरील सर्व महिलांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आशा ताईंमार्फत सर्वेक्षण करण्याचे निर्देश गोयल यांनी यावेळी दिले. कर्करोगाचं निदान झालेल्या महिलांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी किंवा कर्करोगाची निदान करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या संभाजीनगर किंवा नांदेड इथल्या रुग्णालयाकडे संदर्भित करावं, असंही त्यांनी सांगितलं.

****

परभणी शहरात क्रीडा संकुलन परिसरातल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाजूला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात येत असून, नॅशनल डिफेन्स अकादमीची स्थापना करून मुलींना सैन्य दलाची पूर्व तयारी करता येणार असल्याचं, सावे यांनी यावेळी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम एक मार्चपासून सुरु झाला आहे. जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत अंगणवाडीतल्या बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. शून्य ते १८ वर्ष वयोगटातल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेणं तसंच त्यांच्यात आढळलेल्या वैद्यकीय, मानसिक, शारिरीक समस्यांवर त्वरीत उपचार करणं यासाठी ही तपासणी केली जात आहे.

****

राज्य राखीव दलाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन हे दल अधिक सक्षम करण्यावर आपण भर देऊ, असं आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्य राखीव बल गट क्रमांक १४च्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शहरात आणीबाणीच्या प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव बलाचे अधिकारी कर्मचारी नेहमीच अभिमानास्पद काम करत आले असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले.

****

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २५२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडच्या निर्धारित ५० षटकांत सात बाद २५१ धावा झाल्या. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा या गावचा कायापालट करणारे चैत्राम पवार यांना पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज छत्रपती संभाजीनगर इथं त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कल्याण आश्रम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यावेळी उपस्थित होते.

****

नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचं २७ वं अधिवेशन आज हदगाव इथं पार पडलं. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे यावेळी उपस्थित होते. या अधिवेशनात हदगाव इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळाव्याचं उद्घाटन आज मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते झालं. महिलांनी सक्षम व्हावं आणि आपले हक्क, अधिकार जाणून घ्यावे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

No comments: