Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ मार्च
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
जागतिक जलदिन आज जगभरात साजरा
होत आहे. गोड्या पाण्याचं महत्त्व आणि जलस्रोतांचं योग्य व्यवस्थापन याबद्दल जागरूकता
निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी
जागरूकता निर्माण करणे आणि कृती करण्यास प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
१९९२ मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरो इथं झालेल्या पर्यावरण आणि विकास परिषदेत संयुक्त
राष्ट्रांनी जागतिक जलदिनाची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या
वतीने आज हरियाणातील पंचकुला इथं बहुप्रतिक्षित जलशक्ती अभियानांतर्गत 'पावसाचं पाणी अडवू या - २०२५' ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
धाराशिव इथं आज गाळमुक्त धरण
आणि गाळयुक्त शिवार या विषयावर विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात
हा कार्यक्रम होणार आहे.
****
रोजगाराच्या संधी आणि कौशल्य
विकासाच्या मुद्द्यांवर काल राज्य सरकारनं जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग इथल्या आर्थिक
आणि राजकीय विभागाच्या शिष्टमंडळाशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. या
बैठकीत जर्मनीच्या औद्योगिक कामगारांच्या गरजा आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्राची
भूमिका, यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. राज्यातल्या कुशल
तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीसाठी कौशल्यं प्रदान करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं
अलीकडेच बाडेन-वुर्टेमबर्गसोबत एक करार केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयाच्या वतीनं दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. क्रांतीचौकानजीक
समता दर्शन वाचनालयात काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं
उद्घाटन झालं. मुलांवर वाचनाचे संस्कार करायचे असतील, तर आधी पालकांनी पुस्तकं वाचायला हवीत, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आज सकाळी भारतीय संविधान
- हक्क आणि कर्तव्य या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. तर दुपारी कथाकथनाचं सत्र होईल.
सायंकाळी या ग्रंथोत्सवाचा समारोप होत आहे.
****
बीड येथील डॉ. ओमप्रकाश शेटे
यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबाबतचा
शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
****
तुळजापूर इथलं श्री तुळजाभवानी
अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार राणाजगजितसिंह
पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि
महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
****
केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण
राज्यमंत्री रामदास आठवले हे आज संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत
दुपारी समाज कल्याण अधिकाऱ्यांसह बैठक आणि पत्रकार परिषद होईल. सायंकाळी नागसेनवन इथं
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाचं उद्घाटन आठवले यांच्या हस्ते
होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेत आज जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये
मालमत्ताकर वसुलीची वादपूर्व प्रकरणं तडजोडीअंती निकाली काढण्यात येणार असल्यानं, थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ या अभियानांतर्गत
बिहार राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे युवा कलावंत आज मुंबईतल्या राजभवनात
कला सादरीकरण करणार असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे
यांनी दिली. विद्यापीठाचे कुलपती, राज्यपाल सी. पी.
राधाकृष्णन आणि कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षी विविध राज्यांच्या वर्धापन दिनानिमित्त या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात येतं. गेल्या वर्षी ईशान्य भारतातील सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यापीठाच्या
संघानं सहभाग घेऊन एक लाखांचं पारितोषिक जिंकलं होतं.
****
नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या
खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्णपदकं आणि एक रौप्य
पदक पटकावलं. अकोल्याच्या चैतन्य पाठकनं शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं
गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं. मीनाक्षी जाधव हिनं गोळाफेकीत रौप्यपदक मिळवलं. बॅडमिंटनमध्ये
आरती पाटील आणि सुकांत कदम यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
प्रीमियर लीग अर्थात आएपीएल
क्रिकेटचा १८ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता
इथं, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
संघात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत १० संघ
एकूण ७४ सामने खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे.
****
हवामान
राज्यात काल सर्वात जास्त ४०
पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान वाशीम इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर
इथं ३७, परभणी तसंच बीड इथं ३८ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद
झाली.
****
No comments:
Post a Comment