Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 24 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून औद्योगिक आणि शाश्वत
विकासाला प्राधान्य देणं अत्यावश्यक- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; गटशेतीसाठी
विशेष धोरणाची घोषणा
·
मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध-उपमुख्यमंत्री
अजित पवार यांची ग्वाही
·
तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाचा
नांदेड इथं समारोप
·
कबड्डी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडवर मात करत भारतीय
महिला आणि पुरुष संघ अजिंक्य
आणि
·
खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा नेमबाज
सागर कातळेला सुवर्णपदक
****
कार्यक्षम
प्रशासनाच्या माध्यमातून औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणं अत्यावश्यक असल्याचं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिकमध्ये काल भारतीय उद्योग
महासंघ - सीआयआयच्या यंग इंडियन्स शाखेच्या संवादात मुख्यमंत्री बोलत होते. विकासाची
प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती मर्यादित न ठेवता, महाराष्ट्राच्या
सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यासाठी नव्या उद्योजकांसमोर मुख्यमंत्र्यांनी राज्याचा
विकासाचा रोडमॅप मांडला.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी
काल नाशिक इथं २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर
इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात
येत असून, यासंदर्भात प्रयागराजप्रमाणे लवकरच कायदा करण्यात येईल,
असं त्यांनी यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. कुंभमेळ्याच्या
अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या विकासासाठी तयार केलेल्या अकराशे कोटी रुपयांच्या
आराखड्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्यात
गटशेतीकरता धोरण आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सत्यमेव जयते
फार्मर कप २०२४चं पुरस्कार वितरण काल पुण्यात बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात, मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री माणिकराव
कोकाटे, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ यावेळी उपस्थित होते. गटशेतीच्या
माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल, असं मुख्यमंत्री
म्हणाले.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठवाड्याच्या
विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या नरसी इथं एका कार्यक्रमात
ते काल बोलत होते. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात
येतील, असंही त्यांनी सांगितलं. राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा
विरोधकांचा प्रचार खोटा असल्याचं सांगत, आपण स्वतः राज्याचा सात
लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडल्याचं पवार यांनी सांगितलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या
दौऱ्यावर येत आहेत.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा अभ्यासक्रम शासकीय शाळांमध्ये राबवण्याबाबत गैरसमज
दूर करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. ते काल नाशिकमध्ये
वार्ताहरांशी बोलत होते. या अभ्यासक्रमाबाबत अधिवेशनातच सर्व माहिती दिली जाईल,
त्यानंतर या अभ्यासक्रमाचं सर्वच स्तरात स्वागत होईल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला. यंदाच्या वर्षी पहिलीसाठी हा अभ्यासक्रम
सुरू करणार असून, तीन वर्षांत १२ वीपर्यंत त्याचा विस्तार करण्याचं
नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
नागपूर
शहरातली संचारबंदी काल पूर्णतः उठवण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी
ही माहिती दिली. या हिंसाचार प्रकरणी एकूण १३ एफ आय आर दाखल झाल्या असून, सामाजिक संपर्क
माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांनाही अटक केली जात असल्याचं, सिंघल
यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या
शिरूर कासार इथल्या आदिवासी पारधी वस्तीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या
पार्श्वभूमीवर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी
काल घटनास्थळाची पाहणी केली. आयोग या प्रकरणाची चौकशी करेल, असं
त्यांनी सांगितलं. मेश्राम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि सामाजिक न्याय विभागाकडून
येत्या पंधरा दिवसात कारवाई करण्याची सूचना केली.
****
छत्रपती
संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल कन्नड तालुक्यातल्या अंबाळा गावाला
भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आदिवासी बांधवांसाठीच्या योजना
तसंच सोयीसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले.
****
भारतीय
स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव
यांना काल हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. १९३१ साली २३ मार्चला लाहोरच्या
मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी या तिन्ही वीरांना अभिवादन केलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि अजित पवार यांनीही हुतात्मा क्रांतिकारकांना अभिवादन केलं.
****
अहिल्यानगर
इथं काल १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप मराठी भाषा मंत्री
उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. राज्य शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून, संत साहित्य
संमेलनासाठी दरवर्षी १५ लाख रुपयांचं अर्थासहाय्य दिलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केल्याबद्दल
वारकरी विठ्ठल पुरस्कार या कार्यक्रमात सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
****
नांदेड
इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित
मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर यांच्या उपस्थितीत
झालेल्या या समारोप सत्रात राज्यभरातून आलेले अनुवादक, लेखक आणि
भाषाभ्यासकांनी विविध ठराव मांडले. राज्यामध्ये अनुवाद अकादमीची स्थापना करण्यात येऊन
तिच्या मार्फत मराठीतून अन्य भाषेत आणि अन्य भाषेतून मराठीमध्ये भाषांतरांना उत्तेजन
देण्यात यावं, पूर्व प्राथमिक स्तरावरील सर्व शिक्षण मातृभाषेतूनच
देण्यात यावं, प्रत्येक शाळेत अवांतर वाचनासाठी काही तास राखून
ठेवण्यात यावेत, आदी ठरावांचा यात समावेश आहे.
****
भारताच्या
महिला आणि पुरुष संघांनी कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंडमध्ये काल झालेल्या अंतिम
सामन्यात पुरुष संघाने इंग्लंड संघाचा ४४ - ४१ असा, तर महिला संघानेही
इंग्लंड संघाचा ५७ - ३४ असा पराभव केला. आशिया खंडाच्या बाहेर पहिल्यांदाच झालेल्या
या स्पर्धेत आघाडीच्या कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता. २०१९ मध्ये मलेशिया इथं झालेल्या
विश्वचषक स्पर्धेतही भारताने महिला आणि पुरुष गटात विजेतेपद पटकावलं होतं.
****
नवी दिल्लीत
सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या सागर कातळे
याने १० मीटर एअर रायफल प्रोन मिक्स्ड एसएच वन प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. मोना
अग्रवाल हिने रौप्य तर दीपक सैनी याने कांस्यपदक जिंकलं आहे. सुमेधा पाठक हिनं १० मीटर
एअर पिस्तूल महिला एसएच वन प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. रुबिना फ्रान्सिसनं रौप्यपदक
तर अनिता कुमारीने कांस्यपदक जिंकलं. तिरंदाजीत शीतल देवीनं सुवर्ण, पायल नागनं रौप्य तर ज्योतीनं कांस्यपदक जिंकलं.
****
आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान
रॉयल्सला ४४ धावांनी पराभूत केलं. तर चेन्नई इथं झालेल्या अन्य एका सामन्यात चेन्नई
सुपर किंग्जनं मुंबई इडियन्सचा चार गडी राखून पराभव केला.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं काल जागतिक जल दिनानिमित्त वॉकेथॉन घेण्यात आला. पाणीपुरवठा आणि स्वच्छता
राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. मराठवाड्यातलं जलसंकट दूर
करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं, त्या यावेळी म्हणाल्या.
****
जागतिक
वन दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात काल २२ शाळांमधल्या दीड हजार विद्यार्थ्यांसोबत 'चला जाऊया
वनाला' हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना
वनांचं आणि पर्यावरणाचं महत्व पटवून देण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगर पोलिसांना राज्य शासनाच्या वतीने नवीन ३३ वाहनांचं लोकार्पण काल पालकमंत्री
संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. पोलीस दल अधिक सक्षम आणि बळकट करण्यावर शासनाचा
भर असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले.
****
हवामान
राज्यात
काल सर्वात जास्त ३९ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३६ पूर्णांक आठ तर परभणी तसंच धाराशिव इथं ३७ अंश
सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment