Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• संविधानाच्या अधिष्ठानामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम-विधान परिषदेतल्या विशेष चर्चेत सभापतींचं प्रतिपादन
• विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नियुक्त समितीच्या अहवालानुसार कारवाईची ग्वाही
• राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप
• विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज दाखल
• डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या 'नवी लिपी' काव्यसंग्रहाला नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर
आणि
• धाराशिव जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्याचा निर्णय
****
संविधानाचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली असल्याचं प्रतिपादन, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. काल विधान परिषदेत, भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल, या विषयावरच्या चर्चेला प्रारंभ करताना ते बोलत होते. आपली राज्यघटना पुढील काळात भावी पिढीसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
बाईट – विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे
****
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अंतिम आठवडा प्रस्ताववरच्या चर्चेला उत्तर दिलं. परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे, व्हीसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे, त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू, तसंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सहकारी उपनिबंधक कार्यालयातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व कामकाज डिजिटल केलं जाणार आहे, त्यासंबंधी आधी तीन आणि नंतर सहा महिन्यात संबंधीत कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले...
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते,
दरम्यान, मुंबई पोलीस विभागातल्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात क्रिकेटवर सट्टा सुरू असल्याचा आरोप, दानवे यांनी केला, यासंदर्भातले पुरावे त्यांनी एका पेन ड्राईव्हमधून सभापतींकडे सादर केले.
बाईट - विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नगरनाका ते केंब्रिज चौक या प्रस्तावित रस्त्याच्या कामाबाबत, चालू अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेऊन प्रस्ताव सादर करू, अशी माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काल अर्ज दाखल केला. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध होत आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभेनं वित्तविधेयक २०२५ काल पारित केलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देतांना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, करदात्यांच्या सन्मानासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी करात सूट दिल्याचं सांगितलं. नवीन आयकर विधेयकावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यताही अर्थमंत्र्यांनी वर्तवली.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक-कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या 'नवी लिपी' कविता संग्रहास, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा, यंदाचा नामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. राजेंद्र गोणारकर यांची विविध १३ पुस्तकं प्रकाशित आहेत. येत्या ३० मार्च रोजी नागपूर इथं विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुढाकार घेतला आहे. आता लवकरच जिल्ह्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तू तसंच साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे बचतगटांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात भोरकवाडीजवळ भरधाव दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांपैकी दोघे पिंपरीचे, तर एक जण नाशिकचा रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीडच्या जिल्हा कारागृहात असलेला आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याची बडदास्त ठेवल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी ही माहिती दिली.
****
ऑनलाइन बँकिंग तसंच एटीएम वापरताना दक्ष राहण्याचं आवाहन, भारतीय रिजर्व्ह बँकेचे अधिकारी आकाश काबरा यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं वित्तीय जागरुकता आणि साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. कोणताही अनधिकृत व्यवहार झाल्यास बँकेला ताबडतोब कळवावं, असं सांगतानाच, या संदर्भात रिजर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध चित्रफिती पाहून माहिती घेण्याचं आवाहन काबरा यांनी केलं
बाईट - भारतीय रिजर्व्ह बँकेचे अधिकारी आकाश काबरा
****
जालना जिल्ह्यातल्या अंशत: विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी काल मोर्चा काढला. यावेळी एका महिला शिक्षिकेसह चार शिक्षकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या सर्वांना ताब्यात घेतलं.
****
बीड जिल्ह्यातल्या आश्रम शाळा शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पंतप्रधान आवास योजना शहरी घटक अंतर्गत, प्रकल्प अहवाल यादीतल्या नागरिकांनी येत्या एक एप्रिल २०२५ पर्यंत बांधकामास सुरुवात करावी, अन्यथा प्रकल्प अहवाल यादीतून नाव वगळून अनुदान रक्कम शासनास परत करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक रोटेगाव जवळ रेल्वेमार्गाच्या कामासाठी आज लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही उशिरा धावतील, प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे.
****
हवामान
राज्यात काल सर्वात जास्त ४० पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३७ अंश सेल्सियस, छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक पाच, परभणी इथं ३८ पूर्णांक आठ अंश तर बीड इथं ३९ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment